युवराजने ६ सिक्स मारले त्याच्या आधी फ्लिन्टॉफने त्याला कोणती शिवी दिलेली?

१९ सप्टेंबर २००७. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्डकपची भारत विरुद्ध इंग्लंड मॅच. धोनीने टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली होती. गंभीर आणि सेहवागने सुरवातीपासून धडाका लावला होता. चौदाव्या ओव्हरला १३६ धावावर सेहवागच्या रुपात भारताची पहिली विकेट पडली.

पुढच्या दहा-वीस रन्समध्ये गंभीर आणि उत्थप्पा देखील आउट झाले. झटक्यात रनरेट खाली आला. इंग्लंडला वाटलं मॅच थोडीफार कंट्रोलमध्ये आली. आता क्रीजवर धोनी आणि युवराज होते. ते दोघेही रनरेट वाढवण्याचा प्रयत्न करू लागले.

भारताचा पुराना शत्रू ऑल राउंडर अँड्र्यू फ्लिन्टॉंफ बॉलिंगला आला. स्लेजिंग वगैरे करून विरोधी टीमच्या खेळाडूंची खोड काढायची त्याची सवय जुनी होती. त्याच्या मुळेच गांगुलीने काही वर्षांपूर्वी लॉर्डसवर शर्ट फिरवला होता.

या स्पर्धेत युवराज अजून आपल्या खऱ्या रंगात आला नव्हता. त्याचा फॉर्म थोडा वाईटच चालेला. काही महिन्यांपूर्वी इंग्लंडच्याच मस्कारेन्ह्सने युवराजला एका ओव्हर मध्ये सलग पाच सिक्सर मारले होते. युवीच्या डोक्यात ते घुमत होतं. त्यात फ्लिन्टॉफशी त्याची खडाजंगी झाली.

झालं काय की फ्लिन्टॉफच्या ओव्हरमध्ये युवराजने दोन फोर मारले. ट्वेंटी ट्वेंटीच्या मानाने ते नॉर्मलच होतं. तशी ती ओव्हर  फ्लिन्टॉफने चांगलीच टाकली होती. पण काय झालं कुणास ठाऊक. फ्लिन्टॉफ आणि युवराज मैदानात भांडताना दिसले. धोनी युवराजला अडवत होता पण युवी तरी  फ्लिन्टॉफला बॅट दाखवत त्याच्या अंगावर धावून जात होता.

मग न भूतोनभविष्यती अशी घटना घडली.

त्या भांडणाने पंजाबी मुंडा युवीला चांगलच भडकवल. भडकलेल्या युवीचा बॉम्ब त्यानंतर बॉलिंगला आलेल्या बिचाऱ्या ब्रॉडवर पडला. युवराजने एका पाठोपाठ एक सलग सहा लंबे लंबे सिक्सर त्याला मारले. त्यादिवशी भारतात दुसरी दिवाळी झाली. युवराजच्या प्रत्येक सिक्स बरोबर फटाक्यांची माळ फुटत होती. आणि इंग्लंडमध्ये  फ्लिन्टॉफच्या नावे शिव्यांची लाखोली वाहिली हात होती.

युवराजने अवघ्या १२ बॉलमध्ये अर्धशतक झळकवले आणि विश्वविक्रम नोंदवला. पुढे त्याला  फ्लिन्टॉफनेच आउट काढलं पण तोवर उशीर झाला होता. भारताने ती मॅच सहज जिंकली. युवराजला त्या मॅच मध्ये जो फॉर्म गवसला त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. धोनीने पहिला वर्ल्डकप उचलला यात युवराजचा सगळ्यात मोठा वाटा होता.

त्या दिवशी  फ्लिन्टॉफने युवीला काय म्हटले हे मात्र सिक्रेटच राहिले. अनेकांनी युवीला प्रश्न विचारला की असं काय म्हणाला फ्लिन्टॉफ की टू एवढा चिडलास. युवराज नेहमी हसून उत्तर द्यायचं टाळायचा. पण सुप्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवालच्या शो मध्ये मात्र तिच्या लडिवाळ आग्रहापुढे युवी पाघळला आणि तो फेमस संवाद त्याने सांगितला.

जेव्हा फ्लिन्टॉफची ओव्हर संपली तेव्हा त्याला युवीने दोन फोर ठोकल्या होत्या हे आपण वर पाहिलं. त्यानंतर  फ्लिन्टॉफ  त्याला सहज म्हणाला,

“Those were f***ing ridiculous shots.”

युवराज त्याला म्हणाला,

“F*** You.”

फ्लिन्टॉफ चमकला. त्याला कधी कोणी उलटी शिवी दिली नव्हती. त्याने युवराजला विचारलं,”Excuse Me.” युवराज म्हणाला,

“भावा तुला जे ऐकू आलं मी तेच म्हणालो. फ* यु.”

टोपी घालून आपल्या फिल्डिंग पोजिशनला जात असलेला फ्लिन्टॉफ म्हणाला,

“परत बोललास तर तुझा गळा कापीन.”

इंग्लंडच्या खेळाडूंना कधी कोणाच ऐकून घ्यायची सवय नव्हती. त्यात  फ्लिन्टॉफ तर अति माजुरडा. युवराजपण गरम डोक्याचा होता. धोनी त्याला थांबवत होता पण हा गडी काही ऐकला नाही. अंपायरच्या समोर त्याने दणदण पावले टाकीत फ्लिन्टॉफच्या दिशेला गेला आणि त्याला बॅट दाखवून म्हणाला,

“ही बॅट बघितलीस. तुला माहित आहे का की मी तुला ती कुठे मारणार आहे?”

फ्लिन्टॉफ बिचार पळाला आणि ब्रॉड तावडीत सापडला. युवराजने त्या मूडमध्येच बॅटिंग केली आणि इतिहास घडला.

हे ही वाच भिडू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here