देवानंद यांना ‘काळा कोट’ वापरण्यावर कोर्टाने बंदी का घातली होती..?

बंदी आणि चित्रपटसृष्टी हे नातं काही आपल्याला नवीन नाही. चित्रपटांमध्ये सिगरेट स्मोकिंगवरची बंदी असेल किंवा  वेगवेगळ्या शब्दांच्या वापरावरची बंदी. अशा बंदीच्या एक ना अनेक चर्चा सातत्याने आपल्या कानावर पडतच असतात. पण चक्क एखाद्या अभिनेत्याच्या  काळ्या रंगाच्या कोटच्या कोटच्या वापरावरची बंदी..? ती देखील कोर्टाकडून..? ऐकून चकित झालात ना ? परंतु अशा प्रकारची बंदी घालण्यात आली होती. ती देखील सदाबहार अभिनेता देवानंदवर.

देवावंद..!

सदाबहार हिरो. भारताचा ग्रेगोरी पेक. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला रोमँटिक सुपरस्टार.

एकेकाळी देवानंद दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या सोबतीने भारतीय फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करायचा. खरं तर देवानंदकडे ना दिलीप कुमार सारखी जबरदस्त अभिनयक्षमता होती ना राज कपूर सारखा तो ‘शो मन’ होता. तरी देखील  पब्लिकने त्याला सुपरस्टार बनवलं, ते त्याच्या स्टाईलमुळे. त्याचं देखणं रूप, त्याचं डोळे मिचकावत मान हेलावून बोलणं, त्याची हेअर स्टाईल, त्याचे कपडे, त्याचं हिरोईनच्या मागे भुंगा घालणं लोकांना जाम आवडायचं.

तर मग असं काय झालं होतं की कोर्टाने देवानंदच्या काळ्या कोटच्या वापरावर बंदी घातली होती ?

किस्सा आहे १९५८ सालातला.

‘कालापाणी’ चित्रपट रिलीज झाला होता. या पिक्चरमध्ये  साक्षात मधुबालासारखी अप्सरा “अच्छा जी मै हारी चलो मान जाओ  ना” असं म्हणत देवानंदला मनवत होती. दोघांचीही जादू रुपेरी पडद्यावर चालली. या जादूबरोबरच अजून एक गोष्ट प्रचंड गाजली, ती म्हणजे देवानंदचा काळा कोट.

या काळ्या कोटमध्ये देवानंद इतका आकर्षक दिसत होता की देशभरात काळ्या कोटची फॅशन सुरु झाली. त्याकाळातल्या तरुणी देवानंदसाठी पागल झाल्या होत्या. आपल्या लाडक्या देवला ‘काळ्या कोट’मध्ये बघण्यासाठी तो जिथे जाईल तिथे नुसती गर्दी उसळत असे.

काही उत्साही तरुणी तर भिंतीवरून उडया मारू लागल्या होत्या. अशा पद्धतीने तरुण मुलींनी  आपला जीव धोक्यात घालण्याचे प्रमाण एवढे वाढले की शेवटी कोर्टाला ह्स्तक्षेप करावा  लागला. देवानंदला सार्वजनिक ठिकाणी काळा कोट घालायला बंदी घालण्यात आली.

या बंदीबाबत २ मतप्रवाह बघायला मिळतात. बऱ्याच जणांच्या मते अशाप्रकारची बंदी घालण्यात आली होती कारण परिस्थिती खरोखरच हाताबाहेर गेली होती. पण काही जणांच्या मते हा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी करण्यात आलेला स्टंट होता.

‘कालापाणी’चा निर्माता स्वतः देवानंद होता. देवानंद आणि दिग्दर्शक राज खोसला यांनीच मिळून पिक्चरच्या प्रमोशनसाठी ही पुडी सोडली होती. मात्र देवानंदची लोकप्रियताच एवढी होती की त्या काळात कोणीही त्यावर शंका घेतली नाही. पिक्चर तुफान चालला, अनेक रेकॉर्ड झाले. देवानंदला पहिला फिल्मफेअर पण ह्याच फिल्मसाठी मिळाला.