जेव्हा एका बी-ग्रेड सिनेदिग्दर्शकाने सलमान खानला ऑफिसमधून हाकललं होतं…!!!

सलमान खान. फिल्म इंडस्ट्रीतला हुकुमाचा एक्का. त्याच्या केवळ नावावर कुठलाही सिनेमा सुपर-डुपर हिट होतो. कुठलाही निर्माता त्याच्या चित्रपटावर कितीही पैसा ओतायला हशी-ख़ुशी तयार असतो. आजघडीला जरी सलमान इंडस्ट्रीतला ‘सुलतान’ असला तरी आपल्या  कारकीर्दीच्या सुरुवातीला मात्र काम मिळविण्यासाठी सलमानने बराच संघर्ष केलाय. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात एका बी-ग्रेड फिल्म  बनवणाऱ्या दिग्दर्शकाने आपल्याला ऑफिसमधून हाकलून दिलं होतं, अशी माहिती सलमान खाननेच मागे एका पत्रकार परिषदेत बोलताना दिली होती.

सलमान सुरुवातीच्या काळात चित्रपटात काम मिळविण्यासाठी खूप संघर्ष करत होता. खूप सारे प्रयत्न करून देखील त्याला कुठलंही काम मिळत नव्हतं. अनेक दिग्दर्शकांकडून नकार ऐकून तो वैतागला होता. शेवटी कामाच्या शोधात कंटाळलेल्या सलमानने बी-ग्रेड चित्रपटात काही संधी मिळतेय का, याचा शोध घ्यायला सुरुवात केली.  शोधता-शोधता त्याला असं समजलं की आनंद गिरधर नावाचा निर्माता-दिग्दर्शक ‘द ग्रॅज्यूएट’ नावाची बी-ग्रेड मुव्ही बनवतोय. आनंद गिरधर हे या मुव्हीत शिक्षकाची भूमिका साकारू शकेल अशा कलाकाराच्या शोधात होते. सलमान थेट जाऊन आनंद गिरधरना भेटला. त्यावेळी तो साधारणतः १७-१८ वर्षांचा होता. पहिल्या भेटीतच गिरधर यांनी सलमानला नकार दिला, कारण त्यांच्या मते या भूमिकेसाठी तो खूपच तरुण होता. सलमानला तर अजून मिसरूड फुटायचं बाकी होतं.

गिरधरनी नकार दिला पण सलमान काही ऐकायला तयार नव्हता. त्याला कुठल्याही परिस्थितीत काम हवं होतं, त्यामुळे तो गिरधरना आपल्याला ही भूमिका देण्यात यावी यासाठी विनंती  करत होता. वयाने मोठा दिसण्यासाठी  खोट्या मिश्या वापरता येतील असंही त्याने गिरधरना सांगितलं. शेवटी हा पोरगा ऐकतच नाही हे बघून चिडलेल्या गिरधर यांनी त्याला शेवटचं विचारलं की, आता तू निघातोयेस की, सिक्युरिटी बोलावू निराश आणि हताश सलमान ऑफिसमधून बाहेर पडला.

काही वर्षांनी जेव्हा सलमानने इंडस्ट्रीत बऱ्यापैकी जम बसवला त्यावेळी या दोघांची परत भेट झाली. अर्थात तोपर्यंत सलमान ही घटना आणि गिरधर या दोहोंनाही विसरला होता. गिरधर यांना मात्र हा पोरगा चांगलाच लक्षात होता. सलमानकडे बघत ते हसले आणि म्हणाले की, मी तोच, ज्यानं तुला ऑफिसमधून हाकललं होतं सलमाननेही हसून गिरधरना मिठी मारली आणि त्यांच्या त्या वेळच्या नकारासाठी धन्यवाद दिले. याच घटनेनं आपलं आयुष्य बदललं आणि भविष्यात असल्या प्रसंगांना सामोरे जावं लागणार नाही याची काळजी घेतली, असं सलमान मानतो.

 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here