त्यामुळे राजकारणात इतर कोणता घाट न दाखवता फक्त ‘कात्रजचा घाट’ दाखवला जातो. 

कात्रजचा घाट दाखवणे म्हणजे काय. राजकारणात ज्यांनी कात्रजच्या घाटाचा अनुभव घेतला आहे त्यांना विचारा संदर्भासहित सांगतील तिकीट देतो म्हणून सांगितलं आणि दिलं नाही, उभा केलं आणि पाडलं, पद देतो म्हणून सांगितलं वापर करून घेतला आणि फसवलं.

गोडीगुलाबीने गंडवण्याचा कार्यक्रम केला की त्याला कात्रजचा घाट दाखवला अस म्हणण्याची परंपरा आहे. कात्रजचा घाट दाखवण्यात माहिर असणारे राजकारणी म्हणून आजही शरद पवारांचा उल्लेख केला जातो.

तशी उदाहरणे खूप आहेत पण इथे एक छोट उदाहरण सांगतो. म्हणजे आपल्या लक्षात येईल कात्रजचा घाट कसा दाखवला जातो. 

राज्यात पुलोदचं सरकार होतं. शरद पवार मुख्यमंत्री होते. तेव्हा कोल्हापूरचे खासदार उदयसिंग गायकवाड होते.  कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या. कॉंग्रेसचे सदस्य मोठ्या प्रमाणात निवडून आले होते. विरोधी पक्षाचे देखील तुल्यबळ संख्या होती. अशा वेळी पुलोदचे काही सदस्य होते. गायकवाडांनी शरद पवारांना फोन केला. आपल्या सदस्यांनी पाठिंबा दिला तर आम्हाला ZP मध्ये सत्ता आणणं सोप्प होईल.

पवार म्हणाले, तुम्ही बिंनधास्त रहा. गायकवाड बिनधास्त राहिले आणि अध्यक्ष पुलोदचा झाला. पवारांनी गायकवाडांना कात्रजचा घाट दाखवला. 

आत्ता पुण्यात हा किस्सा घडला असता तर कात्रजचा घाट म्हणणं उचित होतं पण कोल्हापूरातल्या किस्स्याला देखील कात्रजचा घाट का म्हणायचं. तर भावांनो हि म्हण आहे. 

आत्ता मुळ मुद्यावर येवूया. या म्हणीला इतिहास काय आहे. 

इतिहास आहे शिवाजी राजांच्या गनिमी काव्याचा. इतिहासात एक पात्र होतं. अबू तालिब नावाचं. मिर्झा अमीर उल् उमरा हैबतजंग नबाब शाहिस्तेखान अबू तालिब अस संपुर्ण पदव्यांसकट त्याच नाव. आपण त्याला शाहिस्तेखान म्हणून ओळखतो. चौथीच्या पुस्तकात या गंडलेल्या फंटरचा धडा होता. शाहिस्तेखानाची फजिती हाच तो गंडलेला मुळपुरूष. 

शाहिस्तेखान हा औरंगजेबाचा मामा होता. मोठ्ठा सरदार होता. त्याला सरळ सरळ मैदानात हरवणं शक्य नव्हतं. तो बंगालचा सुभेदार होता. आज त्याची समाधी ढाका मध्ये आहे. त्याच्याकडे मोठ्ठ सैन्य होतं. प्रचंड सैन्य घेवून शिवाजी राजांना अटक करुन घेवूनच जायचं असा संकल्प करून तो स्वराज्यावर चाल करून आला होता. 

चाकणचा किल्ला जिंकून आपल्या लवाजम्यासहित त्यांने पुण्यात तळ ठोकला होता. काही केल्या तो इथून हलत नव्हतां. शिवाजीराजे तेव्हा कोंढाणा अर्थात सिंहगडावर मुक्कामी होते. तर शाहिस्तेखान लाल महालात मुक्कामी होता. शाहिस्तेखानाला समोरासमोर भिडणं अशक्य होतं. स्वराज्याचं मोठ्ठ नुकसान त्यामध्ये झालं असतं. म्हणून शिवरायांनी एक युक्ती केली. 

लालमहालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणूकीचा आसरा घेवून शिवराय आपल्या निवडक मावळ्यांसहित लाल महालात शिरले. महाराजांना लाल महालचे सर्व रस्ते तोंडपाठ होते. आतमध्ये हालचाल सुरू होताच शाहिस्तेखान जागा झाला. शाहिस्तेखानाला अंदाज आला तो पळून जावू लागला. मोक्याच्या क्षणी महाराजांनी घाव घातला त्यात शाहिस्तेखानाची बोटे तुटली. 

इथून पुढे जे घडलं त्याला कात्रजचा घाट दाखवणं म्हणतात. झालं अस की, 

आत्तापर्यन्त शाहिस्तेखानाच्या फौजेला हल्ला झाल्याची खबर मिळाली होती. प्रचंड मोठ्ठी फौज आल्यानंतर निभाव लागणं अशक्य होतं. महाराज निवडक मावळ्यांसहित सिंहगडाकडे रवाना झाले. पाठीमागे शत्रूचे सैन्य. त्यांना चकवा देण्यासाठी महाराजांनी बैलांच्या शिंगाना पेटत्या मशाली बांधल्या.

हे बैल कात्रजच्या घाटाच्या दिशेने सोडून देण्यात आले. मुघलांच सैन्य कात्रजच्या घाटाच्या दिशेने गेले. तोपर्यन्त महाराज सुखरूप कोंढाणा किल्ल्यावर पोहचले होते.

महाराजांच्या या गनिमी काव्यामुळे कात्रजचा घाट दाखवणे ही म्हण रुढ झाली. 

आत्ता दूसरा मुद्दा ही म्हण राजकारणात सर्वांर्थाने कधीपासून वापरली जावू लागली. तर जूने संदर्भ मिळत नाहीत पण स्वातंत्रोत्तर पुण्याच्या राजकारणात या म्हणीचा वापर केलेला दिसून येतो. पुण्यातील वर्तमानपत्रांनी आणि राजकारण्यांनी स्थानिक पातळीवर ही म्हण वापरली. नंतरच्या काळात ही म्हण संपुर्ण महाराष्ट्राच प्रसिद्ध झाली. 

फक्त दूर्दैव इतकच की महाराजांचा गमिमी कावा हा लोकांना शत्रूपासून वाचवणारा होता. तर राजकारणातला गनिमी कावा हा फक्त जिरवाजिरवीचा होता.  

बर जाता जाता इतकच सांगा यंदाच्या निवडणुकीत कोण कुणाला कात्रजचा घाट दाखवणार आहे.

कात्रजचा घाट दाखवण्याची अजून काही किस्से वाच भिडू

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here