वालचंदनगरवाले वालचंद हिराचंद ! – भाग २

भारतीय औद्योगिक क्षेत्राचे मराठी पितामह. देशभक्त. दूरदर्शी. हट्टी. प्रेमळ पण तेवढेच चमत्कारिक. कष्टाळू पण बंडखोर. वालचंद हिराचंद हे असं अनेक गुणांनी बनलेलं रसायन होतं. एका ओळीत सांगायचं तर भारतातलं पहिलं विमान बनवणारा माणूस. भारतात पहिली कार बनवणारा उद्योजक. इंग्रजांच्या काळात त्यांच्या नाकावर टिच्चून संपूर्ण भारतीय असलेली जहाज कंपनी सुरु करणारा माणूस.

पहिल्या भागात आपण वाचलं त्यांनी संपूर्ण भारतीय कंपनी स्थापन करून एक बोट मुंबई ते लंडन सुरु केली. तिचं पुढे काय झालं ?

पहिला भाग महाराष्ट्राचा आवडता जैन माणूस !

बोट मार्सेल्सला पोचल्यावर वालचंद यांना जाणीव झाली की आपण कुणाशी पंगा घेतलाय. ब्रिटीश स्टीमशिपचा अध्यक्ष जेम्स mackay. अतिशय कठोर आणि कर्तव्यदक्ष. आपल्या स्पर्धेत कुणाला उभच राहू द्यायचं नाही अशी प्रतिज्ञा असलेला mackay. mackay ने वालचंद यांना सफाई कामगार सुद्धा मिळू दिले नाहीत. सळो की पळो करून सोडलं. कशीबशी बोट लंडनला पोचली पण mackay च्या धाकाने एकही ब्रिटीश कंपनी बोट दुरुस्त करायला तयार होईना. वालचंद अक्षरशः रडवेले व्हायची वेळ आली. पण हार मानण्याचा स्वभाव वालचंद यांचा कधीच नव्हता. खूप ओळखी काढून त्यांनी mackay चा इंग्लंड मधला शत्रू शोधला. त्याच्याकडून बोट दुरुस्त करून घ्यायचं ठरवलं. पण अडचण संपली नाही. एक दीड लाख नाही बोटीला चक्क सात लाख रुपये दुरुस्ती खर्च लागला आणि वेळ लागला पाच महिने. वालचंद लंडनला अडकून पडले. पण याच काळात त्यांनी ब्रिटीशांसोबत न्यायालयीन लढाया लढल्या. वर्तमानपत्रात बातम्या छापून आणल्या की महायुद्धात भारताने एवढी मदत करून सुद्धा ब्रिटीश समुद्रात भारतीय माणसाला व्यवसाय करू देत नाहीत. त्यांच्या या त्या काळातल्या पी आर मोहिमेचा, तिथे एवढ्यासाठी ठेवलेल्या स्वीटी नावाच्या सेक्रेटरीचा आणि वालचंद यांच्या चिकाटीचा परिणाम असा झाला की नवीन बोट खरेदी करायला निघालेल्या वालचंद यांना palace शिपिंग कंपनी विकून टाकायचं ब्रिटीश सरकारने ठरवलं.

द loyalty दुरुस्त होऊन भारतात परत येत असताना टाटा सारख्या उद्योगपतींनी ऐन वेळी आपला माल त्यात नेण्यास नकार दिला. खूप लोकांनी mackay ला घाबरून पुन्हा तिकीट रद्द केले. बोट प्रवासाला निघायला त्यात आवश्यक वजन असायलाच पाहिजे. वालचंद यांच्यावर पुन्हा लंडन मध्ये अडकून पडायची वेळ आली. पण त्यांनी पुन्हा हुशारीने १००० टन सिमेंट आणि ५०० टन कच्च लोखंड खरेदी केलं. तो माल मुंबईत विकू असं ठरवून. बोट निघाली. 

वालचंद यांच्यावर दबाव आणून mackay ने कंपनीच ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. पण त्या मिटिंग मध्ये वालचंद mackay ला माझी कंपनी विकणार नाही. पण तुमची कंपनी विकत घ्यायची माझी तयारी आहे असं सुनावलं. आमच्या मातृभूमीचा अधिकार असलेल्या समुद्रात आम्ही आमच्या बोटी मुक्तपणे चालवू शकतो. त्यासाठी तुमच्या मेहेरबानीची आम्हाला गरज नाही. एका ब्रिटीश अधिकाऱ्याला अस सुनावण्यासाठी किती धाडस लागतं त्याची आपण कल्पना करू शकतो. कारण वालचंद यांना रस्त्यावर यावं लागलं असत जर mackay त्याच्या योजनेत यशस्वी झाला असतां तर. पण वालचंद यांनी त्याची पण सोय केली. त्यांनी मिटिंग मधल्या गोष्टी थेट बॉम्बे क्रोनिकल मध्ये छापून आणायची व्यवस्था केली. सरकार मदत जाहीर करत आणि आतून अधिकारी असे त्रास देतात. या बातम्यांचा खूप मोठा परिणाम व्हायचा. माध्यमांच्या मदतीने दबाव आणणे ही वालचंद यांची एक हुकुमी खेळी होती. 

पुढे वालचंद यांना टाटांनी संपर्क साधला आणि वालचंद कंपनी टाटा construction मध्ये विलीन झाली. वालचंद पार्टनर होते. ते एकटेच टाटा construction चं काम बघू लागले. तानसा धरणासारखे काही मोठे प्रकल्प राबवले. बोरघाट बोगदा प्रकल्प त्यात महत्वाचा. कारण तोपर्यंत कुठल्याच भारतीय कंपनीने बोगद्याचं काम केलं नव्हतं. वालचंद यांची प्रवासाची आवड इथे कामी आली. त्यांनी लंडन मधल्या भुयारी रेल्वे व इतर बोगद्यांच्या कामाच्या तपशीलवार नोंदी ठेवल्या होत्या. त्या बोरघाट प्रकल्पात त्यांना कामी आल्या.

सर दोराब टाटा यांनी एक दिवस वालचंद यांना सांगितलं की तुमचे परिश्रम आणि आमचं नाव हे बरोबर नाही. बिझनेस चांगला चालू आहे. टाटा आपले शेअर्स तुम्हाला द्यायला तयार आहे. तुम्ही तुमची कंपनी चालवा. वालचंद यांनी शेअर्स परत घेतले पण कंपनीचं नाव बदललं नाही. शेवटी टाटांचकडून सात आठ वेळा पत्र आली तेंव्हा वालचंद यांनी प्रीमियर construction असं नाव केलं. वालचंद यांनी सिंदिया, टाटा अशी नाव आपल्या फायद्यासाठी ठेवली होती. पण या नावांना वालचंद यांचाहि तेवढाच फायदा झाला. वालचंद आणि त्यांच्या सहकार्यांना पंडीत नेहरू, गांधीजी, सरदार पटेल अशा मोठ मोठ्या नेत्यांचा पाठिंबा होता. ह्या प्रत्येकाने वालचंद यांच्या उद्योगातल्या कुठल्या ना कुठल्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं. आशीर्वाद दिले. 

वालचंद यांच्या स्वप्नांना बळ दिलं. पण वालचंद यांची स्वप्नं एका मागोमाग एक चालूच होती. त्यांनी बिर्लांच्या स्पर्धेत आघाडी घेऊन पहिली कार रस्त्यावर आणली. फियाट. त्यात सुद्धा असंख्य अडचणी होत्या. पण वालचंद यानी बाजी मारली. अगदी हेन्री फोर्डशी भेटून त्यांनी चर्चा केली. 

मग त्यांनी विमान निर्मितीचं स्वप्न बघितलं. ते सुद्धा एका विमान प्रवासात त्यांनी फायनल करून टाकलं. आणि मैसोरच्या राजाच्या सहकार्याने पूर्ण केलं. पहिलं स्वदेशी ग्लायडर उडालं. ब्रिटीशांनी त्यांना किती त्रास दिला याची कल्पना सुद्धा करवणार नाही. अमेरिकेकडून कच्चा माल घ्यायचा नाही अशा जाचक अटी टाकल्या होत्या. पण स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं की वालचंद कधी मागे हटले नाहीत. आज त्यांनी सुरुवात केलेला विमान निर्मिती कारखाना बेंगलोरला दिमाखात उभा आहे. त्यांच्या रावळगाव साखर कारखान्याच तंत्रज्ञान बघून देशात इतर अनेक उद्योग उभे राहिले. 

त्यांचा संघर्ष, त्यांचे डावपेच यासोबतच जोड होती राष्ट्रभक्तीची. पण वैयक्तिक आयुष्य मात्र आणखी वेगळ होतं. लहानपणी आई वारली. त्यांना थेट शेळीच दूध पाजलं जायचं. आणि खरं वाटावं म्हणून शेळीला स्त्रीचे कपडे घातले जायचे. यातला गमतीचा भाग सोडला तर कौटुंबिक आयुष्यात एक दुख होतं सतत. आईची माया नव्हती. पुढे मुल आणि मुलगी लहान असतानाच वारले. बायको सुद्धा बाळंतपण असतानाच वारली. त्यांनी दुसरं लग्न केलं. त्या बायकोला ते लकी म्हणायचे. तिला मुलबाळ होऊ शकलं नाही. पण त्यांनी बायकोवर खूप प्रेम केलं. बऱ्याच प्रवासात त्यांची बायको त्यांच्या सोबत असायची. देवळातला तिजोरीतला  पैसा उद्योगासाठी वापरला पाहिजे असं म्हणणारे वालचंद खूप मोठे व्हिजनरी होते. 

कुणी असं म्हणेल की ते हेन्री फोर्ड होऊ शकले नाहीत, टाटा होऊ शकले नाहीत. त्याला कारण तसच होतं. वालचंद यांना एकाच जन्मात सगळं व्हायचं होतं. आणि त्यांनी एका जन्मात जेवढ्या गोष्टी केल्या, जेवढ्या गोष्टींची या देशात मुहूर्तमेढ रोवली तेवढी इतर कुणीही केलेली नाही. आणि कुठल्याच उद्योगपतीने एवढा प्रखर राष्ट्रवाद दाखवला नाही. म्हणून वालचंद थोर होते.