तावडे सर एकदा म्हणाले होते, झेपत नसेल तर सोडून द्या.. 

जगातले आदरणीय, माननीय, सन्मानीय इतिहास रचणारे नेते आपल्या फॉलोअर्सना एकतरी नारा देत असतात. म्हणजे आपणाला काहीच देता आलं नाही तर नारा देवून का होईना फॉलोअर्स टिकवता येतो हे आदरणीय नेत्यांना माहित असतं. 

असा एक नारा आपणा सर्व विद्यार्थी वर्गाला तावडे सरांनी दिला होता, इतिहास त्यांना या नाऱ्यासाठी लक्षात ठेवेल. 

झेपत नसेल तर सोडून द्या.

दूर्देवाने आज तावडे सरांच नावच लिस्टमध्ये आलं नाही. वेटिंग लिस्टमध्ये तरी नाव येईल म्हणून तावडे सर वाट बघत बसले पण सर पहिल्यांदा नापास झाले. गुरूची विद्या गुरूंवरच उलटली. 

मागे ते काहीतरी झा T का काय असं पण म्हणाले होते. पुढे त्यांची भाषा बहरत गेली. शिक्षणाने प्रगती होते म्हणतात. मग शिक्षणमंत्री होण्याने किती प्रगती होत असेल याचं उदाहरण म्हणजे तावडे सरांच उदाहरण देण्यात येवू लागलं. त्यांना जीं आर हाच त्यांच्या पीआर चा भाग वाटायचा. त्यामुळे ते सतत काही ना काहीतरी जी आर काढत रहायचे.

त्यांनी एकदा सरकारी शाळेतल्या शिक्षकांना फुटबॉल सोबत मुलांची सेल्फी काढायची आज्ञा केली होती. आता ज्या शाळेत गोट्या खेळायला जागा नाही त्या शाळेत फुटबॉल कसा खेळायचा असा प्रश्न शिक्षकांना पडला. पण माणसाचं व्हिजन मोठं असलं पाहिजे हे तावडे साहेबांच वैशिष्ट्य. म्हणूनच विद्यार्थ्याने कष्ट करत बसण्यात त्यांना अर्थ वाटत नाही. ते थेट सोडून दे म्हणायचे.

तावडे सर खरंतर मुख्याध्यापक दावेदार होते. लोक समजत नसले तरी ते स्वतः नक्कीच समजायचे. इथेच घोळ झाला असणार. 

एकावेळी ते चार चार खाती सांभाळायचे. शिक्षण आणि खेळ अशी दोन खाती त्यांना देण्यात आली होती.

खेळाच्या शिक्षणाऐवजी खुपदा शिक्षणाचा खेळ होऊन जातो. पण तरी तावडे साहेब डगमगले नाहीत. सोबत सांस्कृतिक खातं पण मोठ्या जोशात सांभाळायचे. आजपर्यंत एकही शिक्षणमंत्री झाT असं जाहीरपणे बोलू शकला नव्हता. (इतकचं काय तर आम्ही तो शब्द लिहू देखील शकत नाही) मराठी भाषेचा अस्सल तडका जगाला दाखवला तो तावडे साहेबांनी. मुजोर संस्थाचालक पण कधी विद्यार्थ्याशी ज्या dashing पद्धतीने बोलू शकले नाहीत त्या पद्धतीने त्यांनी बोलून दाखवलं होतं. 

लोक म्हणाले होते की तावडेंनी त्या मुलाला अटक करायला सांगणे चूक होते.

असो,

तावडे सरांनी आम्हाला सांगितल होतं झेपत नसेल तर सोडून द्या. आत्ता आम्ही विद्यार्थी चांगला अभ्यास करून सांगतो तावडे सरांना कोणत्या गोष्टी झेपल्या नाहीत. 

  1. सरांचा विचार होता क्रीडा संकुल खाजगी कंपनीला देण्याचा. क्रीडा खात्याला क्रीडा संकुल चालवता येत नव्हतं. तुम्हाला क्रीडा संकुल झेपलं नाही. 
  2. आम्हाला वाटलं सरच विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न सोडवू शकतील पण हे देखील तावडे सरांना झेपलं नाही. 
  3. सत्तेत आल्यानंतर सिंचन घोटाळ्यातील आरोपींना अटक करण्याचा तावडे सरांनी शब्द दिला होता. तावडे सर सत्तेच्या नादात विसरून गेले. सरांना हे देखील झेपलं नाही. 
  4. सरांच्या काळात मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरांना मराठी शाळा चालवणं झेपलं नाही. 
  5. सांस्कृतिक मंत्री असताना जिभेवर लगान ठेवायला हवा, पण सरांनी झाT उच्चारून लगाम ठेवला नाही. सरांचा भाषा विषय देखील झेपला नाही. 
  6. खेळाऐवजी सरांनी सेल्फी काढायला सांगितले, साहजिक पोरं मैदानावर कमी अन् सेल्फी घेताना जास्त दिसले. सरांना हे देखील झेपलं नाही. 
  7. आणि सर्वात महत्वाच, आपण मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहोत ही लपवून ठेवण्याची पण सर इथे जोरात माशी शिंकली. इच्छा, अपेक्षा लपवून ठेवायला तुम्हाला झेपलं नाही. 

हे ही वाच भिडू. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here