तो बंडखोर कवी होता विद्रोही लेखक होता त्याहूनही गोव्याच्या राजकारणातला वाघ होता.

विष्णू गेल्याची बातमी धडकली. 23 वर्षाची गाढ मैत्री संपली .

कधी पणजीतल्या कुठल्याशा लहान बारमध्ये बसण्यासाठी त्यानं केलेला फोन, निसर्गाबाबत अधिक माहिती हवी असली की तो मला त्याच्या कार्यालयात बोलवायचा मी असेल त्या अवतारात हजर व्हायचो आणि मग त्याला हव्या असणाऱ्या विषयांवर आम्ही गप्पा मारायचो. गोवा विधानसभेचा उपसभापती आणि आमदार असूनही माझा हा मैतर कोठेही भेटलाकी मला कडकडून मिठी मारायचा, माझ्याकडे पाहिलं की त्याच्या डोळ्यात मैत्रीचा अभिमान चमकून जायचा.

बातमी धडकल्यावर सुरवातीला पटलंच नाही, सगळं कसं डोळ्यासमोर तरळू लागलं. विष्णू असा कसा जावू शकतो या विचाराने कासावीस होऊन मी फोनाफोनी केली, बातमी कन्फर्म झाल्यावर ओल्ड मंकचा पेग भरला. कारण मरण्यापूर्वीच विष्णूने लिहून ठेवलं आहे.

मी मरण्यापुर्वी,
सुतकी भावनांचे मुखवटे घालुन
हॉस्पीटलात येऊच नये नातेवाईकांनी
किंबहुना कळवूच नका नातेवाईकांना
एंट्री द्या फक्त मित्रांना,
प्रत्येक व्हिजीटरला हॉस्पिटलच्या खर्चाने दारू मिळेल अशी व्यवस्था करा.

चिअर्स विष्णू …. म्हणत मी विष्णूसोबतचा राहिलेला पेग भरत होतो आणि त्याच्या आठवणी माझ्या मनाभोवती पिंगा घालत होत्या. 

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु होती काहीसा अस्वस्थ विष्णू मेरशीच्या सभेत उगवला. तेही थेट व्यासपीठावर…. लाखो, करोडो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा सम्राट जमलेल्या लोकांपुढे माफी मागत होता. ‘बसून बोलतो ‘ असं सांगत होता.

त्याच क्षणाला माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. वाघ संपला, वाघ गेला, वाघाची डरकाळी आता बंद झाली अशी कोल्हेकुई करणाऱ्यांना मी एवढच सांगू शकतो, वाघ हा वाघ असतो, तो भीत नाही….. गवत खात नाही म्हणून तर तो राजा असतो हा वाघही तोच आहे. अशी भाषणाची सुरवात केल्याने मनाला बरं वाटलं आणि मग राजकीय भाषणातुन कवी, कवीतून, कीर्तनकार, कीर्तनकारातुन अनेक भाषांतून फिरणारा भाषांतरकार असं करत राजकीय व्यासपीठावर त्याने चक्क आजारपणात असताना चाळीस मिनिटातच भाषण केलं.

एरव्ही राजकीय व्यासपीठावर मुख्य भाषणाच्या सुरवातीलाच लोक काढता पाय घेतात. इथमात्र उपस्थित सोडाच भाषणाचे शब्द कानावर पडणारा प्रत्येक माणूस सभेकडे खेचू लागला होता. खरेतर विष्णूच्या प्रकृतीच्या काळजीची हि बेल होती. 

अलीकडं विष्णूचं पिणं वाढलं होतं. त्यामुळे प्रकृतीही हाताबाहेर गेली होती. मी अनेकवेळा सार सोडून केरळमध्ये निसर्गउपचार केंद्रात भरती होण्याचे सल्ले त्याला दिले होते. सल्ले ऐकले तर तो विष्णु कसला ? अनेक क्षेत्रात लीलया मुशाफिरी करणारा हा डॉन अवघा पन्नाशीत हतबल होतांना मी पहिला होता.

कलाकारीला जणू हा शापच आहे. सामाजिकरणाच्या अनेक अंगामधून कलासक्त जीवन जगणारे समाजाला खुप कमी काळ मिळतात. ऐन तारुण्याचा उंबरवठ्यावरच विष्णूने अनेक प्रयोग केले होते. कोणताच राजकीय पक्ष त्याला दूरचा नव्हता. एकाचवेळी तो हि बाजु आणि दुसऱ्या बाजू अशा अगदी टोकांच्या विचारधारासुद्धा समाजमनाला समजावून सांगायचा, यामागे त्याची तपश्‍चर्या होती.

राजकीयदृष्ट्या देशाच्या तुलनेत गोवा सुरवातीपासून काहीसा वेगळा आहे. देश स्वातंत्र्यानंतर चौदा वर्षांनी मुक्त झालेला गोवा नेहरू, गांधींना साथ देण्याऐवजी बांदोडकर, काकोडकरांसारख्या बहुजनांच्या हातात घट्ट होता.

गावडोंगरीच्या मानसीवरचा विष्णु अवघ्या पंचविशीत महाराष्ट्र गोमंतक पक्षासोबत उभा होता. त्यामागं त्याची घट्ट धारणा होती गोव्यात प्राथमिक शिक्षण मराठीतुन दिल जावं याच बाळकडूच्या आधारावर आणि मायममतेवर पोसलेला विष्णू मराठीवर निस्सीम प्रेम करायचा. शाळकरी वयात ज्ञानेश्वरी आणि तुकारामाचे अभंग त्याला तोंडपाठ होते, एवढचं नव्हे तर त्याच्या महाविद्यालयातील अख्खे वाचनालय त्याने वाचूक काढले होते.

पुढे याच अभ्यासाच्या आधारे गतकाळातील समाजव्यवस्थेची चिरफाड करणारी ग्रंथसंपदा त्यानं उभारली. पन्नासाहून अधिक पुस्तकं त्याच्या पोथडीत होती. त्यात साहित्याचे सर्व प्रकार होते. कथा, कविता, कादंबऱ्या, नाटकं, एकांकिका लिहिणारा विष्णू अध्यात्मातही तितकाच रमायचा.त्याच्या व्यंगचित्रांची फटकार जितकी ताकदवान होती. तितकाच विडंबनकार म्हणूनही तो लोकांना आपला वाटायचा. आपला मुद्दा सरळ पटवून देण्यात त्याची हातोटी होती.

गोव्यातली सामाजिक व्यवस्था काहीशी मागासलेली आहे.. इथली मंदिर अजूनही उच्चवर्णीयांच्या ताब्यात आहेत. आणि इथला माणुस कट्टर देवभक्त आहे. यातुन निर्माण झालेली शोषणाची आणि पिळवणूकीची कडी विष्णूला तोडायची होती. इथल्या कष्टकरी बहुजनांनां स्वाभिमान बहाल करायचा होता.यासाठी विष्णू अध्यात्माचा आधार घेऊन समाज व्यवस्थेवर प्रहार करायचा त्यावेळी बाप्पा हो … … देव कोनाले भेटला का ? असा पंढरपुरच्या वाळवंटीमध्ये (वारीमध्ये ) खडा सवाल करणारा गाडगेमहाराज त्याच्यात दिसायचा.

विष्णूकडे उपजतच चित्रकला होती. गणपतीच्या दिवसात तो चक्क चित्रशाळांमध्ये गणपती रंगवायचा आणि गोवा तसेच महाराष्ट्रात मोठा सांप्रदाय असणाऱ्या पद्मनाभ संप्रदायात तो कीर्तन आणि प्रवचन करायचा. 80 च्या दशकात त्याची व्यंगचित्रं गाजली होती. त्याचा धसका अनेक राजकीय पक्षांनी घेतला होता.

तो व्यवस्थेला सरळ हात घालायचा त्यामुळे तुका अभंग अभंग या नाटकाने राष्ट्रीय स्तरावर मोठा वाद निर्माण केला होता. त्यात ब्राम्हणांच्या टोळीने तुकारामांचा खुन केला आहे, असं दाखवलं होत त्यामुळे ती कृती वैकुंठ मानणाऱ्यांना   हादरा होती. यामुळे या नाटकांवर बंदी घालण्यात आली होती. त्याबरोबरच सुदिरसुक्तमधुन सरळसरळ ब्राम्हणी व्यवस्थेची चिरफाड करीत कटु वास्तवाचं दर्शन घडवलं होत.

ते मासे खातात
आम्ही मासे खातो
ते दारू पितात
आम्ही दारू पितो
ते बायकांना भोगतात
आम्हीही बायकांना भोगतो
ते नाहतात
आम्हीहि नाहतो
पण नहल्यानंतर ते पवित्र होतात
आम्ही मात्र भ्रष्टच उरतो
नाही तर त्यांनी देवळाच्या गाभाऱ्यात जाऊन देवाला कस शिवलं असतं ?
आणि आम्ही बाहेरून दर्शन घेऊन कशाला सटकलो असतो …
फरक आहेच त्यांच्यात आणि आमच्यात…

गोव्यातली समाजव्यवस्था आजही तशीच आहे आणि त्याला थेट भिडणारा हा कवी माणूस म्हणून खूप ग्रेट होता. कवितांचे कार्यक्रम आणि कविसंमेलन त्याचा आवडता विषय. एकटा विष्णू रात्रभर कवितेचे जागरण करायचा आणि त्यातूनच त्याला काव्यहोत्रसारखी कल्पना सुचली.

गोव्यातल्या मांडवी किनाऱ्यावर विष्णूने देशभरातल्या कवींचे रात्रंदिवस चालणारे काव्यहोत्र भरवले होते या मित्रांनो या कवितेच्या अग्निकुंडात सामील व्हा, असे आवाहन त्याने करताच हजारो कवी दिवसरात्र अनेक व्यासपीठांवर लाखो कविता सादर करीत होते. कवितेच्या इतिहासातला तो विक्रमच होता. रामदास फुटाणे, फ. मु. शिंदे, संभाजी भगत, किशोर कदम यांची मैत्री तर खूप दाट होती. यांच्या अनेक मैफिलीचा मी साक्षीदार आहे. 

विष्णू साहित्यावर जेवढा प्रेम करायचा तेवढाच दारूवरही… पण अख्या बाटल्या रिजवुन विष्णुला कधी बरळला मी पाहिलं नाही. जितका तो प्यायचा तितका तो सतर्क व्हायचा. हि त्याची खासीयत होती. न पिता विष्णू जितक्‍या आत्मयतेनं तुकारामांचे अभंग म्हणायचा तितकाच तो पिऊन वैश्विकतेचे धडे द्यायचा.

त्याच्यात बंडखोर कवी, विद्रोही लेखक होता पण विष्णूला रागवताना कोणी पाहिलं नसेल. आपली मतं तो अत्यंत परखडपणे तत्वनिष्ठ पद्धतीने मांडायचा त्यामुळेच तो अनेकांना खराखुरा वाघ वाटायचा. अनेक राजकर्ते, कथित समाजसेवक आणि जातीनिष्ठ माथेफिरू त्याला वचकून असायचे.

विधानसभेतले सामान्यांचे प्रश्न मांडायचा आणि तो मांडताना आपला पक्ष आडवा आला तरी तो कचरायचा नाही. विष्णू शिवसेनेचा मुख्य प्रवक्ता होता. विष्णू शिवाजीभक्त होता, त्यामुळे त्यांचा लेखणीतून निर्माण झालेले शिवगोमंतांक नाटक गाजलं होत. त्यानं खरंखुरा कष्टकरी रयतेचा शिवाजी उभा केला होता. विष्णू बाळासाहेबांचा प्रिय होता. त्यांच्यातील मैत्रीचे किस्से गाजले होते.

विष्णू युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष होता आणि भाजपचा आमदार होता आणि गोवा विधानसभेचा उपसभापती होता. अशी वादग्रस्त राजकीय पार्श्वभुमी असतानाही विष्णूनं माणसांवरच प्रेम थांबवलं नाही. त्याला राजकीय महत्वकांक्षा होती पण वेळ साधता येत नव्हती. बांदोडकरांच्या बहुजन संघटनाला विष्णूने सुरवात केली होती. अशातच विष्णूला काळानं घेरलं होत.

काव्यहोत्राच्या वेळचे किस्सेही खूप गाजली होती देवळात भक्त बनणं आणि दारू दुकानात बेवडा हि विष्णूची खासियत. कलाकारांची शिस्त असणाऱ्या कलाअकादमीत दारूला बंदी आहे, म्हणुन विष्णुनं मांडवी किनाऱ्यावर कवी कलावंतांना मदिरेची सोय केली होती. ” प्या मनसोक्त आणि मग गा ” असा किंग मोमोचा संदेश विष्णूने त्यावेळेस दिला होता.

विष्णूचं हे काव्यपुराण मांडवीतल्या क्रुजमध्येही गाजले होते . त्यानं कवींना चक्क नदीच्या मध्यभागी कविता सादर करण्याची संधी दिली होती. विष्णू उत्तम खवय्या होता आणि लोकांना भरविण्यात त्याच्या हातखंडा होता. त्यामुळे अस्सल गावठी मासे केळीच्या/ हळदीच्या पानात  उकडुन / भाजून तो आपल्या मित्रांना खिलवत असे.

तुकारामांच्या मृत्युनंतरही तुकारामांचे अभंग जनमाणसात तरुण आहेत. तशाच विष्णूच्या कविताही सामान्यांच्यात घुमत राहतील.

माझा मैतर निपचिप झोपला आहे. तो शांत झोपला आहे, तुक्‍याच्या अभंगांची साधना करीत असावा असं वाटतयं. तो आता कधीच भेटणार नाही मला, माझी नजर मात्र त्याला आकाशात शोधतीय, त्याच्या कवितेच्या ओळीच होत्या त्या….मला जाळू नये, किंवा पुरू नये.

फुलांच्या मुलायम हातांनी भिरकावून द्यावं,
आभाळाच्या कॅनवासवर,
तिथे आधीच असलेल्या तुकोबाने,
हात पुढे करीत मला झेलून द्यावं,
नि एवढचं म्हणावं,
आपण जिवंत आहोत,
विठू कधीच मेला होता.

  • अनिल पाटील

हे ही वाचा भिडू.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here