असा आहे शरद पवारांवर बंदी घालणाऱ्या वारकरी परिषदेचा इतिहास..?

शरद पवार हिंदू विरोधी आहेत. ते देवाला मानत नाहीत. त्यामुळे त्यांना धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका, असे पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेने काढले आहे.

पूर्वीचे राज्यकर्ते साधना करणारे देवनिष्ठ, धर्मनिष्ठ, विनम्र होते. आताच्या नास्तिक राज्यकर्त्यांना बोलावून त्यांच्या हस्ते उद्घाटन करणे किंवा त्यांचे व्याख्यान ठेवून पांडुरंगाची अवकृपा करुन घेऊ नका. शरद पवार हे रामायणाची आवश्यकता नाही म्हणतात. मुख्यमंत्री असताना पांडुरंगाच्या महापूजेला गैरहजर राहतात. समर्थ रामदास स्वामींचा एकेरी उल्लेख करतात. देव, संत, व्रत, वारी, हिंदू धर्म यांचा अपमान करणाऱ्या, संत तुकाराम वैकुंठास गेले नाहीत, संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली नाही, असं पुस्तक-लेख लिहिणाऱ्या तथाकथित पुरोगामी संघटनांना त्यांचा सातत्याने पाठिंबा असतो. असे या पत्रकात लिहिले आहे.

यापुढे वारकऱ्यांना सावध राहावे व वारकरी प्रथम हिंदू आहे हे लक्षात ठेवावे.

असा आशय असणारे पत्रक आज समाजमाध्यमांमध्ये झळकले. राष्ट्रीय वारकरी परिषदेने काढलेले हे पत्रक वादाचा विषय ठरल्याने साहजिक हे वक्ते महाराज कोण आणि राष्ट्रीय वारकरी परिषद काय आहे.

राष्ट्रीय वारकरी परिषद या नावामुळे ही परिषद राष्ट्रीय स्तरावर वारकरी लोकांची संघटना असल्याचा भास होतो. संपुर्ण वारकरी समाजाचा यास पाठिंबा असावा अशी शक्यता निर्माण होते. मात्र राष्ट्रीय वारकरी परिषदेचे संस्थापक वक्ते महाराज व त्यांच्या अनुयायांमार्फत चालण्यात येणारी ही संघटना असून संपुर्ण वारकरी समाज यास बांधिल नसल्याचे वारकरी समाजातील लोकं सांगतात.

वक्ते महाराज हे जळगाव जिल्ह्यातील असून ते पुर्वीपासूनच हिंदूत्त्ववादी विचारांचे समर्थक असल्याचे सांगितले जाते. त्यांचे विचार नेमके कसे आहेत यासाठी आपण खालील किर्तन अभ्यासल्यास. 

यामध्ये कॉंग्रेस पक्षावर अश्लिल भाषेत टिका करणे, मुस्लीम समाजास कडवा प्रतिकार करणे याचसोबत मनुस्मृतीस धार्मिक ग्रॅंथ मानून मनुस्मृती जाळणाऱ्या व्यक्तींवर टिका करत असलेले वक्ते महाराज दिसून येतात. ते चर्चेच केव्हा आले याबद्दल माहिती घेतल्यानंतर समजते की अंधश्रद्धा निर्मुलन समितीने महाराष्ट्रात जादुटोणा विरोधी कायदा करण्याची मागणी केली होती. हा कायदा हिंदूविरोधी असल्याची टिका करत वक्ते महाराजांनी त्याविरोधा एल्गार केला. त्यानंतर महाराष्ट्रातील सामान्य माणसांस त्याचसोबतीने वारकऱ्यांनासुद्धा वक्ते महाराज यांच्याविषयी माहिती मिळाली. आज त्यांचे वय ८० हून अधिक असून आजही ते हिंदू धर्मांभिमानी भूमिकेतून किर्तन करत असल्याची माहिती दिली जाते.

महाराष्ट्र शासनाने फडणवीस सरकारच्या काळात वक्ते महाराजांना शासनाचा ग्यानबा तुकाराम पुरस्कार देवून गौरवले होते.

राष्ट्रीय वारकरी परिषद नेमकी काय आहे..?

राष्ट्रीय या शब्दामुळे संपुर्ण भारतातील वारकरी समाज असा अर्थ निघत असला तरी तो अखिल भारतीय सदाशिव पेठ अथवा अखिल भारतीय वरची आळी मित्र मंडळ याप्रमाणे गृहित धरावा लागतो. संपुर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातील किमान पाच सदस्य तरी राष्ट्रीय वारकरी परिषदेसोबत जोडून घेण्याचे धोरण असून यामध्येच परिषदेची व्यापकता स्पष्ट होते.

राष्ट्रीय वारकरी परिषदेमार्फत आजपर्यन्त काढण्यात आलेली निवडक पत्रके पाहिल्यास या परिषदेची वैचारिक भूमिका स्पष्ट दिसून येते.

१) २०१९ साली जाहीर करण्यात आलेल्या या पत्रकात दाभोळकरांच्या हत्येबाबत CBI ने आरोपी केलेल्या संजीव पुनाळकर यांना त्वरीत मुक्त करण्यात यावे अशी भूमिका या पत्रकात मांडण्यात आलेली आहे. 


 

2) वारीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांचा सहभाग हे वादाचे कारण ठरले आहे. अनेकदा वारकरी व्यक्तींकडून यास विरोध होताना दिसून त्याच पार्श्वभूमीवर दिनांक १८ जून २०१९ रोजी राष्ट्रीय वारकरी परिषदेने भिडे गुरूजी आणि धारकरी युवकांचे स्वागत करणारे हे पत्रक काढले होते.   


 

3) हिंदू धर्म यांचा अपमान करणाऱ्या नेत्यांना निवडणूकीत हिंदूंनी धडा शिकवावा अशा आशयाचे हे पत्रक आहे. 


4) 2018 साली राष्ट्रीय वारकरी परिषदेऐवजी राष्ट्रीय वारकरी सेना महाराष्ट्र अशा आशयाचे पत्रक असून त्यावर संस्थापक म्हणून हभप निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांचे नाव आहे. या पत्रकात औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व उस्मानाबादचे नामकरण धाराशीव तसेच अहमदनगरचे नामकरण अंबिकानगर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here