वाजपेयी अडवाणींना म्हणाले,” फिर सुबह होगी “

 नेहरूंचा काळ सुरु होता. इंग्रज भारत सोडून गेले याला फार वर्ष झाली नव्हती. स्वातंत्र्यलढ्याची पुण्याई म्हणून लोक डोळे झाकून कॉंग्रेसला मतदान करत होते. लोकसभेत कॉंग्रेसचे ४९४ पैकी ३७१ खासदार निवडून आले होते. त्यानंतरचा सर्वात मोठा पक्ष होता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया २७ खासदार. बाकीच्या पक्षांची अवस्था खूपच वाईट होती.

भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे नाव होते जनसंघ. त्यांचे पूर्ण देशभरातून फक्त ४ खासदार लोकसभेसाठी निवडले गेले होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेची राजकीय बाजू व्यक्त या पक्षाची स्थापना झाली होती. श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांचे नेते होते. नेहरूंच्या मंत्रीमंडळात काही काळ ते मंत्री देखील होते. पण तात्त्विक मतभेदामुळे त्यांनी राजीनामा दिला. पुढे काश्मीर मधल्या आंदोलनावेळी झालेल्या कारावासात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नंतर जनसंघाची जबाबदारी त्या पक्षाच्या युवा नेत्यांवर येऊन पडली. दिनद्याल उपाध्याय हे त्यातल्या त्यात अनुभवी नेते होते. बाकी बलराज मधोक, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी हे सगळे नेते तेव्हा खूप तरुण होते.

अवघे ३३ वर्षाचे अटलबिहारी वाजपेयी तेव्हा जनसंघाची संसदेमधली तळपती आवाज म्हणून ओळखले जायचे. फक्त ४ खासदारांच्या पक्षातला हा नेता खुद्द पंतप्रधानांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारायचा. तर नेहरूसुद्धा भावी पंतप्रधान असे गंमतीने म्हणत त्यांचं कौतुक करायचे. जनसंघाचे अनेक कार्यकर्ते वाजपेयी आपल्या पक्षाला देशाच्या राजकारणात मोठ स्थान मिळवून देतील या बद्दल आशा बाळगून होते.

बसलेले- अटलबिहारी वाजपेयी, भैरोसिंह शेखावत. उभे असलेले- लालकृष्ण अडवाणी

साल होत १९५८. 

दिल्ली महानगरपालिकेच्या कसल्या तरी निवडणुका होत्या. खर तर ही निवडणूक खूप लहान होती पण पक्ष बांधणीसाठी महत्वाची होती. जणसंघाने आपला स्टार प्रचारक अटलबिहारी वाजपेयींना प्रचारासाठी उतरवल होतं. त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र लालकृष्ण अडवाणी देखील निवडणुकीसाठी मेहनत घेत होते. ठिकठिकाणी मोहल्ला सभा झाल्या. लोकांना घराघरात जाऊन भेटून मतदानासाठी साद घालण्यात आली.

निकाल लागला तेव्हा कळाल जंगजंग पछाडूनही जनसंघाचा मोठा पराभव झाला होता. कॉंग्रेसलाच लोकांनी भरभरून मते दिली होती.

जनसंघाचे सगळे कार्यकर्ते निकाल बघितल्यावर निराश झाले . सगळे वेगवेगळ्या दिशेला पांगले. तेव्हा अडवाणी वाजपेयी यांच्यासोबत राहत होते. दोघे संध्याकाळी खोलीवर आले. एवढी तयारी करूनही हा पराभव कसा आला हेचं त्यांना समजत नव्हत. अडवाणींनी वाजपेयींना विचारलं,

“अब क्या? कहा जायेंगे?”

वाजपेयी म्हणाले,

“चलो सिनेमा देखेंगे.”

जवळच असलेल्या पहाडगंज भागातल्या इम्पेरियल थिएटरला ते आले. कोणता सिनेमा वगैरे त्यांना ठाऊक नव्हते. फक्त थिएटरच्या अंधारात आपली निराशा लपवावी म्हणून हे दोघे आले होते. वाजपेयींनी दोन तिकिटे काढली. दोघेही आत शिरले. थोड्याच वेळात  पाट्या पडू लागल्या. सिनेमाच टायटल दिसल. पिक्चरच नाव होतं,

“फिर सुबह होगी”

वाजपेयी आणि अडवाणी दोघानीही थक्क होऊन एकमेकाकड पाहिलं. वाजपेयींच्या डोळ्यात चमक होती. राज कपूर ,माला सिन्हा अभिनित तो सिनेमा या दोन्ही नेत्यांना खूप आवडला. आज पराभवाचा अंधार आहे पण कधीना कधी विजयाची सकाळ होईलच हा आत्मविश्वास घेऊनचं ते दोघे थिएटरमधून बाहेर पडले. कवीमनाच्या वाजपेयींच्या मनात कविता आकार घेत असावी.

पुढे अनेक वर्षांनी वाजपेयींनी ती कविता आपल्या प्रचार घोषणेत बदलली.

“अंधेरा छटेगा, सुरज निकलेगा, कमल खिलेगा.”

सत्तेत यायला त्यांना पन्नास वर्षे लागली. पण हा प्रसंग ते दोघेही कधी विसरू शकले नाही. लालकृष्ण अडवाणी आजही आपल्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी नेहमी हा किस्सा सांगातात.

हे ही वाच भिडू.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here