वाघ कसा दिसतो ?

PIC - RS

Bird Survey साठी STR  (Satpura Tiger Reserve) च्या Madhai Gate ला आम्ही सकाळीच पोहचल्यावर हळूहळू सर्व लोक दुपारपर्यंत जमा होत होते. काही लोक इथे आधीही येऊन गेलेले होते. Bird Survey दरम्यान जंगलात अनेक प्राणी दिसतील नशीबवान असलो तर वाघ दिसू शकतात आणि त्यातही चुरना भागात जंगल जास्त दाट असल्याने जे तेथे जातील त्यांना तर वाघ बघायची शक्यता जास्त आहे अशी चर्चा सगळ्यांमध्ये सुरु होती. त्यामुळे मीही वाघ बघायला मिळाला तर भारीच गोष्ट होईल, असा विचार करत होतो. 

 संध्याकाळी दोन-दोन जणांच्या टीम बनवून झाल्यावर ३ टीम चुरना कॅम्प वर मुक्काम करणार होत्या व एक टीम चुरना मार्गाने बोरी जाणार होती. सकाळी चारही टीम वेगवेगळ्या मार्गाने जंगलात फिरून Bird Survey चे काम करणार होत्या. मी सुहेल सर सोबत होतो आणि आम्हाला चुरना कॅम्प ला जायचे आहे माहित झाल्यावर प्रचंड आनंद झाला. व्याघ्रदर्शनाची आस अजूनच तीव्र झाली.

आम्हा आठ लोकांना दोन जिप्सी मध्ये बसवून आमचा ताफा चुरना दिशेने रवाना झाला तो पर्यंत दिवस मावळत होता घड्याळात साडे पाच वाजत आले होते. मदाई गेट सोडलं आणि गवताळ भागातून जिप्सी धूळ उडवत जात होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चितळ चरत होते. जिप्सीच्या आवाजाने त्यांच लक्ष आमच्याकडे गेले सगळे चितळ आमच्याकडे माना वळवून पाहत होते. जिप्सी गाड्या आणि माणसांची सवय असल्याने चितळ पळून गेले नाही. जिप्सी दूर गेल्यावर पुन्हा त्यांनी चरणे सुरु ठेवले. नंतर सागाचे जंगल लागले. २-३ मजली इमारतींएवढे उंच साग दाटीवाटीने उभे होते. पानगळ सुरु असल्याने सागांवर किरकोळ पाने दिसत होती. मध्ये मध्ये मोठी मोठी बांबूची बेटे पण दिसायची. STR चा साग आणि बांबू भारतात सर्वोत्तम मानला जातो. ह्या जंगलातील साग उंचीने खूप जास्त असल्याने त्याचे खोड पण चांगले जाडजूड असते त्यामुळे ब्रिटिशांनी रेल्वेच्या स्लीपर्स बनवण्यासाठी इथला साग खूप तोडला असं ड्राइवर सांगत होता. 

 मी जिप्सी मध्ये मुद्दाम मागे बसलेलो होतो. जिप्सी उघडी असल्याने आणि  चुरना जायला दीड तास लागणार असल्याने मी निवांत आजूबाजूचे जंगल पाहत होतो. काही वेळाने आम्हाला माकडांचा गोंधळ ऐकू आला. समोर पाहिले तर ४-५ माकडे रस्यावर बसलेली होती. जिप्सी त्यांच्याकडेच येतेय पाहून ती लगेच बाजूच्या झाडांवर चढली आणि जोर जोरात खेकसायला लागली.

आमच्या उजव्या बाजूला रस्त्याला लागूनच एक माकडाचे पिलू स्वतःला कसेबसे सावरत बसलेले दिसलेले. पिल्लू चांगलेच भेदरलेले दिसत होते. आम्ही गाडी त्याचा बाजूलाच उभी केली तरीही ते पळून गेले नाही. त्याच्या चेहऱ्यावर जखम झालेली दिसत होती आणि रक्त ओघळत होते. ते नक्कीच झाडावरून खाली पडलेले दिसत होते. मी बोललो गाडी जाऊद्या आपली, आपण गेलो कि पिल्लाची आई खाली येईल आणि त्याला उचलून घेऊन जाईल. गाडी सुरु झाली आणि ड्राइवर बोलला,

“एकदा का माकडाचे पिल्लू झाडाहून खाली जमिनीवर पडले कि कळप त्याला स्वीकारत नाही उलट सगळी माकडे त्याला मारून टाकतात.”

पण हे स्पष्टीकरण मला काही पटले नाही मी बोललो त्याची आई तर स्विकारेलच ना. त्याला तर तो बोलला नाही ,एकदा खाली पडले म्हणजे माकडीण पण त्या पिल्लाला स्वीकारत नाही. मानवी तर्क आणि भावनांचा विचार केला तर हे कोणालाच पटणार नाही. पण असच निरीक्षण मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या एका पुस्तकात केल्याचे आठवले.

बिचारे पिल्लू त्यामुळेच जास्त भेदरलेले दिसत होते. पिल्लाविषयी सहानभूती वाटत होती पण मानवी तर्क आणि नियमांनी जंगल काम नसते करत. जंगलाचे स्वतःचे नियम आहेत आणि ते जंगलातल्या प्रत्येक घटकाकडून फार शिस्तीने पाळले जातात. आपण जंगलात घडणाऱ्या सगळ्या घटनांना मानवी दृष्टिकोनातून नाही पाहू शकत. 

 

PIC- RAJPALSINGH

 

माकडाचे पिल्लू पाहून ५ मिनिट होत नाही तर ड्राइवर बोलला,

“भालू देखो!”

आमच्या उजव्या बाजूला रस्त्याला लागून एक अस्वली आणि तिच्या मागे तीच छोटेसे पिल्लू चालत जात होते. आमची उपस्थिती लक्षात येऊन अस्वली लगेच मागे पळत आली आणि पिल्लाला पाठीवर बसवले आणि पटकन जंगलात दाट झाडीमध्ये गायब झाली. फोटो काढायला वेळच मिळाला नाही कारण हे सगळं इतक्या पटापट झाले कि मी, ड्राइवर आणि अजून एक जण असे तिघंच अस्वली आणि तिच्या पिल्लाला पाहू शकलो. आपल्याकडे बोथ्याच्या जंगलात गेल्या वर्षी प्राणिगणना करताना अस्वले पहिली होती पण बोथ्याची आणि इथली अस्वले एकाच प्रजातीचे असूनही इथली अस्वले आकाराने बऱ्यापैकी मोठी आहेत. कदाचित उत्तम अधिवास क्षेत्रामुळे इथल्या अस्वलांचा आकार मोठा होत असेल. पुढे थोडं गेल्यावर ६-७ रानडुकरे दिसली.

 STR च्या पश्चिमेला तवा जलाशय आहे त्याच पाणलोट क्षेत्र पकडून जवळपास १० टक्के भाग या जलाशयाने STR चा व्यापलेला आहे. गेला पावसाळा विशेष झालेला नसल्याने पाणलोट क्षेत्र बऱ्यापैकी कोरडे झालेले होते. त्यावर हिरवळ होती. गवत खायला अनेक तृणभक्षी प्राणी तेथे येतात.

तेथून जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला रानगवा चरताना दिसला. पाळीव बैलापेक्षा आकाराने आणि वजनाने तिप्पट असलेला तो एक नर होता. थोडा वेळ गाडी थांबवून सगळ्यांनी फोटो काढले. आमची गाडी तेथे थांबलेली त्याला पसंत नसावे कारण लगेच तो फुत्कार करून गाडी कडे चालायला लागला. आम्ही सगळेच घाबरलो. कारण रानगवा माणसांवर हल्ले करण्यात कु-प्रसिद्ध आहेत. आमच्याकडे येण्यासाठी त्याने २-३ हि पावले टाकले नसतील तर लगेच आमच्या ड्राइवरने सराईतपणे गाडी सुरु करून रस्यावर गाडी पळवायला सुरु केली होती. गाडी निघून गेली पाहताच रानगवा पुन्हा मुकाट्याने खाली मान घालून चरायला लागला आणि गाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हायसे आले. 

 

Pic – RAJPALSINGH

 

मागे बसल्याने अंगावर धूळ खूप उडत होती तरीही मी जिप्सी सफारी मस्त enjoy करत होतो. बरेच प्राणी दिसत होते आता फक्त वाघ तेवढा दिसावा अशी कामना करत होतो.

  आम्हाला जंगलात येऊन अर्धा तास झाला असेल आणि चुरना यायला अजून एक तास बाकी होता. दिवस पण बऱ्यापैकी मावळत होता. सहा वाजून गेले होते. आम्ही अजूनही जलाशयाच्या डाव्या बाजूने जात होतो. अचानक उंच गवत दिसायला. दोन्ही बाजूला ४-५ फूट उंच गवत आणि त्याच्या मधून आमची जिप्सी जात होती. अचानक माझ्या बाजूला बसलेले सुहेल सर बोललो,

“अरे वो देखो टायगर.”

रस्त्याच्या उजवीकडून, जलाशयाच्या बाजूने एक वाघ रस्त्याकडे चालत येत होता. ड्राइवर ने गाडी जागेवरच थांबवली. सगळेच एकदम स्तब्ध होऊन वाघ पाहत होते. मी पहिल्यांदाच खुल्या जंगलात वाघ पाहत होतो.

वाघ गवतातून चालत रस्त्यावर आला गाडी पासून अंदाजे ६०-७० फूट अंतरावर असेल. मला वाटलं तो रस्ता ओलांडून डावीकडे गवतात शिरेल आणि दिसेनासा होईल. पण नशिबात व्याघ्रदर्शनाची वेळ इतकी अल्प नव्हती. वाघ रस्त्यावर लागून आमच्या पुढे रस्त्यावर चुरना दिशेने चालायला लागला.

मी अक्षरश: श्वास रोखून सगळं पाहत होतो. वाघ चालायला लागल्यावर मग लक्षात आलं कि कॅमेरा आपल्या गळ्यात लटकवलेला आहे आणि आपण फोटो काढायला पाहिजे.

एव्हाना इतरांच्या कॅमेराचे शटर cluck cluck आवाज करायला लागले होते. एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळ्याचा चष्मा खाली नाकावर सरकवून कॅमेरा डोळ्याला लावला. छाती जोरात धडधडत होती हात कापत होते त्यामुळे धड फोटो पण काढता येत नव्हते. २-३ दीर्घ श्वास घेतले, वाघ प्रत्यक्ष बघतोय म्हणून नशिबाचे मनोमन आभार मानले आणि मग वाघ फोकस करून फोटो घ्यायला सुरवात केली.

 ड्राइवर बोलला,

“ही वाघीण आहे आणि समोर २ km अंतरावर एक नाला आहे त्यात तिने तिची ३ पिल्ले लपवलेली आहेत. आता हि तिकडेच जात असेल.”

वाघीण आमच्या समोर शांतपणे चालत होती. आमची किंवा आमच्या गाडीची फारशी दखल तिने घेतलेली दिसत नव्हती. साठ-सत्तर मीटर चालत गेली कि मध्येच ती थांबायची बाजूच्या गवतावर मूत्र विसर्जन करायची. आपल्या प्रदेशाची सीमा इतर वाघांना दर्शविण्याचा त्यामागे हेतू होता.

जंगलाचा हा भाग माझा आहे इथे राहणे आणि शिकार करणे हा माझा अधिकार आहे यात दुसऱ्या कोणी येऊ नये आणि आलाच कोणी तर त्याला हाकलून लावायची धम्मक माझ्यात आहेत हा धमकीवजा संदेश ती मुत्राच्या शिडकाव्यातून जंगलातल्या इतर शिकारी प्राण्यांना देत होती.

जेव्हा वाघीण माजावर म्हणजे गर्भधारणेसाठी उत्सुक असते तेव्हा परिसरातील नर वाघांना आपण समागमासाठी तयार आहोत आणि जोडीदार शोधतोय हे कळविण्यासाठी मात्र ती झाडाच्या बुंध्यावर शक्य तितक्या उंचीवर मूत्राचा फवारा मारते. तेव्हा खाली जमिनीवर ती मूत्र विसर्जन करीत नाही. जेणेकरून हवेद्वारे तिच्या मूत्राचा विशिष्ट वास दूरपर्यंत पसरेल आणि नर वाघ तो पकडतील व त्या वासाच्या सहाय्याने ते वाघिणीपर्यंत पोहचतील. मात्र गर्भार राहिल्यावर पुन्हा माजावर येईपर्यंतच्या काळात ती खाली जमिनीवर मूत्र विसर्जन करते त्यावेळेस फक्त आपल्या प्रदेशाची सीमा निश्चिती करणे हाच तिचा हेतू असतो. 

 

PIC- RAJPALSING

विशेष सांगायची गोष्ट म्हणजे वाघाच्या मूत्राचा वास बासमती तांदळाच्या भातासारखा येतो. रस्त्याच्या बाजूला जिथे ती वाघीण मूत्राचे शिडकावे करत जायची तिथे आमची गाडी आली कि तो वास यायचा. जणूकाही बाजूला बासमती तांदूळ शिजत आहे असं वासाहून वाटायचे. वाघांविषयीची हि बाब मला पहिल्यांदाच माहित होत होती.  

दहा मिनिटे झाली असतील वाघीण आमच्या समोर चालत होती आणि आमची गाडी पुरेसे अंतर ठेवून तिच्या मागे तिच्याच गतीने जात होती. नंतर एक उजवीकडे उतार असलेले वळण लागले आणि पुन्हा रस्ता वर येऊन डावीकडे वळण घेत होता. आम्ही मागेच थांबलो त्यामुळे वाघिणीचे चांगले फोटो काढता आले. वर डावीकडे वाघिणीने वळण घेतल्यावर एका उंच सागाच्या झाडावर माकडे आवाज करत होती.

वाघासारख्या शिकारी प्राण्याला पाहून माकडे इतर प्राण्यांना सावध करत असतात. रस्त्याच्या बाजूला गवताच्या पलीकडे चरत असलेले चितळ माकडाच्या आवाजाने सावध झाले आणि एका क्षणात परिस्थितीचा अंदाज येऊन जंगलात दिसेनासे झाले. गाडीची उंची आणि त्यातही मी उभा राह्ल्याने आणि माझी उंची सव्वा सहा फूट असल्याने उंच गवत असूनही आजूबाजूला काय सुरु आहे हे मला स्पष्ट दिसत होते.

पुढे काही अंतरावर रस्त्याच्या डावीकडे गवतापलीकडे जंगलाच्या बाजूने रानगव्याचा कळप चरत होता. उंच गवतामुळे वाघीण त्यांना नक्कीच दिसत नव्हती पण वाघीण ला मात्र रानगवे चरत असल्याची जाणीव होती कदाचित वासाने तिने ओळखले असेल. ती डावीकडे गवतात दबकून सावध पावले टाकायला लागली आणि शिकार करण्याच्या पवित्र्यात होती आणि तेवढ्यात एक माकड जोरजोरात ओरडायला लागले. माकडाच्या आवाजाने रानगवे सावध झाले आणि कळपातील मुख्य नर  (Alfa Male) जोरात फुत्कार करायला लागला. कळपातील माद्या आणि पिल्ले पळत दूर गेली मात्र नर जागेवर उभा होता.

मुख्य नरावर कळपाच्या रक्षणाची जबाबदारी असल्याने तो परिस्थितीचा अंदाज घेत होता. माकडे हि जंगलातील वॉचमन असतात कोणताही शिकारी प्राणी त्यांना दिसला कि घाबरून झाडावर उंच जातात आणि तेथून जोरात आवाज करून सगळ्या जंगलाला सावध होण्याचा इशारा देतात. बर नेमका कोणता प्राणी आहे हे मात्र माकडांच्या आवाजातून नेमके कळत नाही. वाघ, बिबट्या, लांडगा, अस्वल, रानकुत्री कि किरकोळ भेकड असो दिसलं कि आवाज करायचा एवढं काम माकडे तत्परतेने करतात. कधीकधी जर एखादा साप झाडावर चढला आणि तो माकडांना दिसला तर हे पूर्ण जंगल डोक्यावर घेऊन जोरजोरात आवाज करायला लागतात.

एकूण काय तर माकडांच्या आवाजाने काहीतरी धोका आहे आहे हे लक्षात येते पण त्या धोक्याचे स्वरूप नेमके किती आणि केवढे आहे? याचा अंदाज इतर प्राण्यांना येत नाही. त्यामुळे माकडांच्या आवाजावर विसंबून न राहता  परिस्थितीचा अचूक अंदाज घ्यावा म्हणून मुख्य नर आपल्या  भारदस्त शरीर, मजबूत-टोकदार शिंगे आणि जबरदस्त ताकदीवर विश्वास ठेवून आपल्या जागेवरच ठाम उभा होता आणि वाघ असला म्हणून काय झाले तरी एवढ्या मोठ्या नराची शिकार करणे त्याला शक्य नसते. 

वाघीणला उभ्या असलेल्या नराचा अंदाज आला आणि ती पुन्हा आपल्या रस्त्याला लागली. मी मात्र थोडा नाराज झालो आतापर्यंत TV वर वाघाला शिकार करताना पहिले होतो आणि आता प्रत्यक्ष जंगलात वाघाची शिकार पाहण्याची संधी हुकली होती. पण वाघ बघायला मिळाला हेही नसे थोडके म्हणून खूप समाधानी वाटत होते. चांगलीं वीस मिनिटे झाली असतील वाघीण आमच्या समोर चालत होती आणि आम्ही तिच्या मागेमागे. चांगलाच अंधार पडायला लागला होता. आम्हाला अजून बरंच दूर जायचे असल्याने ड्राइवर चिडचिड करत होता. त्याला वाघ रोजच दिसतात त्यामुळे त्यामुळे त्याला वाघ पाहण्याचे कौतुक न वाटणे स्वाभाविक होते.

नाही म्हणता आम्ही सगळेच वाघ पाहण्याच्या सुखद धक्क्यातून बऱ्यापैकी सावरलो होतो. सगळ्यांना वाघाचे फोटो पण अपेक्षेपेक्षा भरपूर मिळाले होते. अंधार बराच पडत होता त्यात आम्हाला अजून बराच प्रवास करायचा होता आणि आमचे व्याघ्रदर्शन भरपूर वेळ चालले होते त्यामुळे हि वाघीण केव्हा रस्त्याच्या बाजूला जाते आणि आम्ही समोर जाऊ शकू याचीच सगळे वाट पाहत होते. शेवटी समोर रस्ता डावीकडे नव्वद अंशात वळत होता तिथे वाघीण रस्ता सोडून उजवीकडे नव्वद अंशात वळाली आणि जंगलात दिसेनासी झाली. 

 ड्राइवरने गेयर टाकला’ accelerator वर पाय ठेवला आणि भरधाव वेगात मागे धूळ उडवत आमची जिप्सी जंगलातून अंधार चिरत निघाली. त्या दिवशी नशिब फारच जोरावर होते. वाघीण जाऊन १० मिनिटे होत नाही आली तर २ सायाळ आमच्या गाडीसमोरून रास्ता ओलांडून गेले. त्या दिवशी नशीब जोरावर होते म्हणायचे कारण एकच कि त्या दोन तासाच्या प्रवासात वाघासोबत इतरही बरेच प्राणी बघायला मिळाले. रात्री आठ वाजता चुरना कॅम्पला पोहचलो. जेवण करून झोपायला दहा वाजले. रस्त्यात वाघिण पाहिल्याच्या प्रसंगाची दृश्ये डोळ्यांसमोर तरळत केव्हा झोप लागली समजलेच नाही. 

 दुसऱ्या दिवशी वॉचटॉवर रस्त्यावर एक नाल्या जवळ आम्ही गाडी थांबवली आणि  पक्षी निरीक्षण  करण्यासाठी तेथे उतरलो असता नाल्याच्या काठावर मगर दिसले आम्हाला पाहताच पाण्यात शिरले. नदीतील म्हणजे गोड्या पाण्यातील मगरे आकाराने फारच छोटी असतात. तिथं बाजूच्या जंगलात माकडाचा आवाज यायला लागला. कोणीतरी शिकारी प्राणी असल्याचा तो संकेत होता. ड्राइवर बोलला बिबट्या किंवा वाघ असेल. पण जंगल दाट असल्याने आम्हाला दिसत काहीच नव्हते.

माकडाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करत आम्ही पक्षी निरीक्षण सुरूच ठेवले. तेवढ्यात ड्राइवरला वाघ नाला ओलांडून जाताना दिसला. आम्ही बघे पर्यंत तो पुन्हा जंगलात नाहीसा झाला होता. लगेच २ मिनिटात वाघ ज्या बाजूला नाला ओलांडून गेला होता तिकडेच कावळे ओरडायला लागले. वाघाने काल परवा केलेली शिकार लपवून ठेवली असेल आणि कावळ्यांना ती सापडल्याने ते त्यावर ताव मारत असतील पण वाघ तिथं आल्याने वाघाने कावळ्यांना हाकलून लावले असेल त्यामुळे ते आवाज करत होते. पुन्हा थोडक्यात वाघाला पाहण्याची संधी थोडक्यात हुकली होती.

PIC -RAJPALSING  

दुपारी आम्ही धाई कॅम्पला पोहचलो. तिथं असलेल्याला कर्मचाऱ्याला आम्ही काल वाघ बघितला असे सांगितले तर तो बोलला त्याचे फोटो आहेत का? मी लगेच कॅमेरा on करून त्याला फोटो दाखवले. त्याने त्याच्या जवळचे एक booklet काढले त्यात STR मधल्या वाघांचे डावी आणि उजवीकडून घेतलेले फोटो होते. ते फोटो सगळे Trap Camera मधून घेतलेले होते.

जंगलात वनविभागाचे कर्मचारी प्राण्यांचे नेहमीचे रस्ते अथवा पाणवठ्याच्या ठिकाणी दोन ट्रॅप कॅमेरे समोरासमोर लावतात. त्या कॅमेरा समोरून एखादा प्राणी गेल्यास त्याचा फोटो काढला जातो. या कॅमेरातून एखादा मिनिट व्हिडिओ शूटिंग पण घेता येते. motion sensor अथवा  infrared sensor किंवा  light beam चा trigger म्हणून वापर करण्याच्या  तंत्राने हे ट्रॅप कॅमेरे काम करतात. त्यात बॅटरी सेल टाकावे लागतात आणि मेमरी कार्ड चा स्लॉट असतो. तर त्या कर्मचाऱ्यांकडील booklet मध्ये  STR मधील सत्तावीस वाघांचे एकाच वेळी डावीकडून आणि उजवीकडून काढलेले फोटो होते. प्रत्येक वाघाच्या अंगावरील पट्टे वेगवेगळे असतात अगदी आपल्या बोटांच्या ठश्यांप्रमाणे.

 त्याने लगेच booklet ची पाने चाळायला  सुरवात केली. काल वाघ पहिला ती वाघीण होती हे मुद्दाम मी सांगायचे टाळले पण त्याने कॅमेरातील फोटो पाहूनच हि वाघीण असल्याचे लगेच सांगितले. मीही त्याच्यासोबत कॅमेरा मधल्या फोटोतील वाघिणीच्या अंगावरील पट्टे त्याच्या जवळील booklet मधील कोणत्या फोटो सोबत जुळतात ते शोधायला लागलो. मी काढलेल्या फोटो मध्ये वाघिणीची डावी बाजू स्पष्ट आलेली होती. दोनच मिनिटात एका फोटो सोबत कॅमेरातील वाघिणीचे पट्टे अचूक जुळाले. आम्ही पाहिलेली वाघीण T3 Female असल्याचे सिद्ध झाले. कॅमेरातील फोटो आणि booklet मधील फोटो दोघांचा सोबत मोबाइलने काढलेला फोटो पोस्ट सोबत टाकत आहेच. STR मध्ये वाघांच्या संवर्धनासाठी तंत्रज्ञानाचा उत्तम वापर वनविभागाकडून  होत असल्याचे लक्षात आले. 

Bird Survey च्या निमित्ताने दोन दिवस दाट आणि मानवी स्पर्शापासून कोसो दूर असलेल्या जंगलात फिरता आले. खऱ्या अर्थाने जंगल अनुभवता आले.

हे ही वाच भिडू.

16 COMMENTS

 1. खूप मस्त लिहिलंस तू भिडू…. आवडलं…. मनमौजी पणे जगण्याचा मार्ग सापडला खरा तुला… आता असच सरफास ट्रेक च वर्णन लिहिशील, आम्हाला निदान वाचताना तरी सरफास अनुभता येईल… पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…. लव यू भिडू…

 2. खूप छान लिहिले आहे राजपाल. फोटो पण अप्रतिम आहे…

 3. अस वाटलं की मी स्वतः जंगल सफारीचा अनुभव घेत आहे कॅमेरा के साथ साथ कलम भी बहुत खुबीसे चला ना सिक ग ये भिडू .Eagerly waiting for next article and happy journey

 4. It is very great that you always spend time with enjoyment and hobby with your job. And also share experience and photos with us. Very nice writing too. Keep it up Rajpal.

 5. लेखकराव अभिनंदन. असेच घरमसाठ फिरा. खूप खूप लिहा. आशिर्वाद.

 6. इन्स्टाग्रामवर तुझी कलाकारी पाहत होतोच पण हा नवा पैलू पाहायला मिळाला तुझ्या कलेचा.
  कौतुकास्पद आहे.

  – Sachidanand J.

 7. सर्वांचे धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया पुढील लिखाणासाठी मला प्रेरणादायी असणार आहेत.

 8. या लेखाच्या मध्यमातून तुझ्या लेखन कौशल्याचं दर्शन तर घडतच,शिवाय तू ज्या प्रकारे वर्णन करतो असे वाटते की आपण स्वतः तिथे आहोत.
  बहोत बढिया ‘भिडू’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here