कार्यकर्त्यांकडे सतरंज्या उचलण्याशिवाय आहेत हे पाच पर्याय.

घराणेशाही कोणत्या पक्षात नाही. सगळीकडे घराणेशाहीच आहे. कॉंग्रेस म्हणू नका, भाजप म्हणू नका, राष्ट्रवादी म्हणू नका की शिवसेना म्हणू नका. प्रत्येक नेत्याने आपआपल्या उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. बर हि घराणेशाही काय फक्त वरच्या पातळीवर चालते अस नाही तर सरपंचाचा पोरगा सरपंच होण्याच्या प्रवासापासून ते आमदार, खासदार, मंत्री, संत्री सगळीकडं हेच सुरूय. आत्ता या विरोध करायचा घराणेशाही पाडायची का टिकवायची हे लोकशाहीत असणाऱ्या बहुमतांच्या आकड्यावरुन ठरणार असतं. त्यामुळे अशा घराणेशाहीवर टिका करुन काहीही फायदा नसतो, 

असो पण कोणत्याही पक्षातून कोणत्याही नेत्याच्या मुलाचं/मुलीचं? नाव समोर आलं की दूसऱ्या पक्षातील लोकांकडून एका वाक्याचा धोशा सुरू होतो. ते वाक्य म्हणजे,

आत्ता चला कार्यकर्त्यांनी आत्ता सतरंज्या उचला.

आयुष्यभर कार्यकर्ते हे कार्यकर्तेच राहणार आणि तिकीट मात्र घराण्यातील व्यक्तीला मिळणार हा कार्यकर्त्यांना मुळ राग. त्यामुळे सतरंज्या उचलायचा ऑप्शन बऱ्यापैकी प्रत्येकाकडून हाडाच्या कार्यकर्त्यांना दिला जातो. 

पण कसय बोलभिडू हे तरुणांच माध्यम आहे. उगी तरुण कार्यकर्त्यांनी सतरंज्याच उचलणं आम्हाला देखील आवडणार नाही. म्हणून आम्ही विचार केला या तरुणांना वेगळा मार्ग दाखवायचा. तर आम्ही घेवून आलो आहोत असे पाच पर्याय. 

१) MPSC/ UPSC करणं.

हा एक सुंदर पर्याय आहे. नाहीच झालं तरी तीन वर्ष कलेक्टर झालोय आणि आमदाराला तू पाच वर्ष आहेस मी कायमचा आहे अस म्हणून दम देतोय अस स्वप्नतरी किमान दोन वर्ष पहाता येत. पण एक गोष्ट इथली खरी आहे ती म्हणजे खरच अभ्यास केला तर पदरात काहीना काही पडतं. उगी नेत्याच्या मागं देता का म्हणून हिंडण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा पंख्याखाली बसून दोन-चार वर्ष अभ्यास करा टेन्शन नाय. 

२) लग्न करून संन्याशी होणं.

लग्न करुन राजकीय संन्यास घेणं हे कधीपण चांगल. बायकोचं ऐकायचं. राजकारणाचा नाद लय वाईट म्हणून बायको म्हणली की गप्पगार शेतात कामाला जायचं. दोन वेळच काम करायचं आणि बायकोच्या हातच खायचं. कसं सगळं आयुष्य निवांत झालं पाहीजे. लग्न करण हा एक सतरंज्या उचलण्याहून बेटर ऑप्शन आहे. विचार करा. यंदा करायला सांगा तसही लग्नाचा मौसम आलायच.  

३) लोकांच्या भल्याचा आणि स्वत:च्या स्वार्थाचा स्टार्टअप सुरू करणं.   

कसय धंदे तर सगळेच करतात. पैसे काहीच जण कमवतात. राजकारण पण सगळेच करतात. निवडून काहीजणच येतात. हि चार वाक्य म्हणजे दोन्ही दगडावर पाय ठेवण्याच सुत्र. काय करायचं असा एक छंदा सुरू करायचा की ज्यामध्ये लोकांच भलं होतय. त्यात तुम्हाला रोज वेगवेगळ्या लोकांना भेटायला लागतय. धंदा चालला की पैसे पण येतात काळजी करायचं कारण नाही. आणि माणसं पण जोडली जातात. मग काय करायचं योग्य क्षण बघायचा आणि आत्ता आपण राजकारण करणार म्हणून सांगायचं. म्हणजे अतीच इच्छा असली तर तुम्हाला कोण अडवणार बाबा.तसही पैसे कमवत असला तर राजकाऱण की पैसा यापैकी योग्य उत्तर तुमच्या मनाने तुम्हाला मिळेलच. 

४) अपक्ष उभा रहायचं.  

लातूरचा एक गडीय.  विजय प्रकाश कोंडेकर अस त्याच नाव. त्या माणसाचं ध्येय काय आहे तर तो गडी म्हणतोय की आपण अपक्ष लोकांनी एक झालं पाहीजे. आत्ता एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते राहून परत त्यांचा पोरगा तिथं येणार. त्यालाच तिकीट मिळणार आणि आपण सतरंज्या उचलत बसणार त्याहून भारी अपक्ष लढत रहायचं. लक्षात ठेवा अपक्ष लढून निवडून येत नाही हा गैरसमज दूर करा. मोदी लाटेत सुद्धा तीन अपक्ष खासदार निवडून आले होते. इतकच काय तर लोकसभेच्या पहिल्या इलेक्शनमध्ये अपक्ष खासदारांची संख्या तब्बल ३७ इतकी होती. त्यामुळं अपक्ष राहून निवडून येत नाही हा समज डोक्यातून काढून टाका . MPSC आणि UPSC च्या पोरांना ज्या भाषेत समजून सांगायला लागतय त्याच भाषेत सांगतो पाच वर्ष एक मतदारसंघ टार्गेट करुन काम करा, लोकांना भेटा. मगच उभा रहा. हि पब्लिक शंभर टक्के लक्षात ठेवतं. फक्त एक काम करा चुकून सगळं सेटल झालं तर परत तुमच्या पोराला, पोरीला,पुतण्याला, मेव्हण्याला, बायकोला उभा करु नका. तर कार्यकर्त्यांना संधी द्या. 

५) लावून धरायचं.

हे बघा कार्यकर्त्यांनो हा पण बेस्ट ऑप्शन आहे. पण हा प्रकार जुगार खेळण्यासारखा आहे. म्हणजे किती दिवस लावून धरू हा प्रश्न तुम्ही विचारणार असलात तर हे तुमचं काम नाही. असा स्वभाव माणसात असायला काही निकष लागतात म्हणजे तुम्ही दिवसभर एका एस्टीची वाट बघत फाट्यावर दुपारचे दोन तास थांबू शकता का? यारा हौं यारा सारखं गाणं पुर्ण ऐकू शकता का? ढिंच्याक पूजाचा अल्बम संपुर्ण बघून काढू शकता का? जर तुमच्याकडे या गोष्टी पहाण्याचा, ऐकण्याचा संयम असेल तर निश्चितच नेत्याच्या नातेवाईकाच्या मागे फिरण्याचा देखील संयम तुमच्याकडे आला असेल. काहीतरी मिळेल या इच्छेखातर मागंमागं करत राव्हा. श्रद्धा और सबुरी म्हणत आयुष्य काढा होवून जाईल कधी ना कधी खेळ. 

बस्स हे पाच पर्याय निवडा. आयुष्याला कंटाळू नका. लक्षात ठेवा राजकारण चालुय म्हणून या देशात कित्येकांची पोट दोन टायमाला व्यवस्थित भरत्यात. सो जस्ट चील. सतरंज्या तर सतरंज्या. काळजी करायचं काम नाही.   

हे ही वाच भिडू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here