ठाकरे घराण्याच्या बंडखोर राजकारणाची सुरवात व्यंगचित्रांपासून झाली.

बाळासाहेब ठाकरेंची आजच्या महाराष्ट्राला शिवसेनाप्रमुख, ठाकरी शैलीत सभा गाजवणारे हिंदुहृदयसम्राट अशी ओळख आहे, पण त्यांच पहिलं प्रेम व्यंगचित्रकला होतं. याच मार्मिक चित्रांमुळे महाराष्ट्रात एका वेगळ्या बंडखोरीचा पाया त्यांनी रचला. फटकाऱ्यांची हि भाषा पुढे त्यांच्या राजकारणाचा पाया देखील झाली आणि ओळख देखील. १९८५ साली त्यांनी व्यंगचित्र काढायची बंद केली तरिही आज देखील व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे अशी वेगळी ओळख लोकांच्या मनात आहे.

व्यंगचित्रकला हि लोकशाहीची भाषा मानली जाते. पण त्यासाठी व्यंगचित्रकार हि तेवढ्याच ताकदीचा असावा लागतो. व्यंगचित्रकारानां समाजातल व्यंग लगेच टिपता येणं अपेक्षित असते. मात्र तेच व्यंगचित्रकारांने दाखवलेले व्यंग समाजाला झेपेलच असं नाही. आणि सरकार या संस्थेला तर व्यंगचित्रकारांशी जास्तच वावडे असते.

आज हे सगळं आठवण्याच कारण म्हणजे बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे. त्यांनी आजकाल फेसबुकवर आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून सध्याचे भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यावर टीका चालवली आहे.

मोदींना प्रसिद्धी विनायक दाखवलेलं कार्टून तर विशेष गाजलं.

जेव्हा कार्टून गाजतं तेव्हा त्याचा अर्थ त्याच्यावर भरपूर टीका झाली आहे हे ओळखायचं. राज ठाकरेंना सुद्धा अशी टीका ट्रोल सेनेकडून झेलावी लागली. ती टीका योग्य कि अयोग्य हा विषय वेगळा.

बाळासाहेबांना चित्रकलेचा वारसा वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या कडून मिळाला. बाळासाहेबांची व्यंगचित्रातील गती पाहून प्रबोधनकारांनी त्यांना शिक्षणाचा आग्रह देखील धरला नाही. ते इंग्रजी ७वी पर्यंतच शिकले. बाळासाहेबांना जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिकायचे होते. त्यांच अॅडमिशन सुद्धा झालं होतं. साठ रुपये फी सुद्धा भरली होती. जे.जे स्कूल ऑफ आर्ट हे भारतातील सर्वात बेस्ट मानले जाते. कोणत्याही चित्रकाराला तिथे प्रवेश घेण्याचे स्वप्न पडणे यात आश्चर्य नाही.

एकदा त्यांच्या घरी सुप्रसिद्ध चित्रकार दिग्दर्शक बाबुराव पेंटर आले होते. त्यांनी प्रबोधनकारांच्या घरी एक चित्र पाहिलं. त्यांनी विचारलं कि हे पेंटिंग कोणी काढल? तर तेव्हा प्रबोधनकार म्हणाले “बाळ नी काढलं”

बाबुराव पेंटर बाळासाहेबाना म्हणाले, “काय करतोस तू?”

बाळासाहेब म्हणाले “जेजे स्कूलला प्रवेश घेतलाय. उद्या पासून तिकडे जाणार आहे.”

बाबुराव पेंटर म्हणाले प्रबोधनकाराना म्हणाले,

“याचा हात चांगला आहे. आर्टस्कूल मध्ये त्याला फुकट पाठवू नको.”

बाळासाहेबांच स्वप्न अधूर राहील. मात्र त्याचा त्यांना कधी पश्चाताप झाला नाही. उलट त्यांना आर्ट स्कूल मध्ये शिकून आपल्या रेषा बिघडल्या असत्या हे जास्त पटलं होत.

आजही जेजे स्कूल मध्ये बाळासाहेबांची चित्रे अभ्यासली जातात.

बाळासाहेबांनी व्यंगचित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेतले नाही. पण त्यांच्यावर इंग्लंडचे जगप्रसिद्ध कार्टूनिस्ट डेव्हिड लो ची चित्रे पाहून पाहून व्यंगचित्रकलेत प्राविण्य मिळवले. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडच्या इव्हनिंग स्टँडर्ड या वर्तमानपत्रात डेव्हिड लो ने काढलेले कार्टून जगप्रसिद्ध आहेत. विशेषतः हिटलर आणि मुसोलिनी वर काढलेले कार्टून आजही अभ्यासले जातात. असं म्हंटल जात की ब्रिटन जिंकल्यावर ज्या लोकांना हिटलर मारणार होता त्या सुप्रसिद्ध ब्लॅक लिस्ट यादीत डेव्हिड लो चं नाव वरच्या क्रमांकावर होते. १९६२ साली राणीच्या वाढदिवसाला त्यांना नाईटहूड देऊन “सर” हि उपाधी देण्यात आली.

बाळासाहेब मान्य करतात कि त्यांच्या व्यंगचित्रावर डेव्हिड लो चा प्रभाव आहे. राज ठाकरे  शाळेत असताना बाळासाहेबांची व्यंगचित्रकला कॉपी करायचे. ते पाहून बाळासाहेबांनी छोट्या राजला डेव्हिड लोच्या चित्रांचे पुस्तक आणून दिले. बाळासाहेबांनी राज मधला व्यंगचित्रकार घडवला. फक्त राज ठाकरेच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात व्यंगचित्रकला बाळासाहेबांनी रुजवली.

त्यांनी १३ ऑगस्ट १९६० मध्ये मराठी माणसाचा आवाज म्हणून ” मार्मिक” हे व्यंगचित्र साप्ताहीक सुरु केले.

मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते त्याचे पहिले प्रकाशन करण्यात आले होते. त्यात त्यांनी व्यंगचित्रातून मारलेले राजकीय फटके आजही लोकांना लक्षात आहेत. यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, जॉर्ज फर्नांडीस, आचार्य अत्रे, शरद पवार कोणीही या फटक्यातून सुटले नव्हते. याच मार्मिकमधून सुरु केलेल्या प्रवासाची परिणीती अखेर १९६६ ला शिवसेना स्थापन्यामध्ये झाली.

१९८५ पासून व्यंगचित्र काढायचे बाळासाहेबांनी बंद केले. मात्र त्यांच्या व्यंगचित्राना आजही महाराष्ट्र मिस करतोय. आजच्या राजकीय आणि सामजिक परिस्थितीवर बाळासाहेबांचे फटकारे पाहायला इथल्या जनतेला नक्कीच आवडल असतं. जेष्ठ कार्टूनिस्ट मंगेश तेंडूलकर म्हणतात तसे,

“त्यांच्या व्यंगचित्रामध्ये आर. के. लक्ष्मणसारखी सौजन्यशील मस्करी नाही. डायरेक्ट मुस्काडीत भडकवणं आहे “.

जगभरातून अशी मुस्काडीत भडकवणारी व्यंगचित्र काढत, बंडखोरी झाली. पण बाळासाहेब आणि राजठाकरे यांच्या व्यंगचित्रातली वेगळी गोष्ट म्हणजे त्याला राजकारणाची असणारी पार्श्वभूमी. बाळासाहेब व्यंगचित्रातून राजकारणात आले तर राज ठाकरेंनी राजकारणातल्या एका उतरत्या ? काळात व्यंगचित्रांनी जाब विचारण्यास सुरवात केली. ते मुख्य प्रवाहाच राजकारण करत असल्यानेच आपण त्या चित्रातून राजकारणाच्या उद्देशाला आणि फायद्यातोट्यांना बाहेर काढू शकणार नाही हे देखील तितकचं सत्य.

हे हि वाच भिडू. 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here