टीम इंडिया या वर्ल्ड कप मध्ये दिसणार भगव्या वस्त्रात.

नुकताच लोकसभेचा आणि कॉंग्रेसचा देशातून निकाल लागला. मोदींची त्सुस्नामी की काय म्हणतात ती आली. भक्तांनी भगवा गुलाल उधळला. संसदेत सुद्धा भगवाधारी साधू साध्वी दिसत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे जाईल तिथे हे भगवे वादळ पोचलेले दिसतय. मिडिया मध्ये काही जण याला भगवी क्रांती म्हणत आहेत. कोणालाही इच्छा असली नसली तरी या भगव्या रथात बसावंचं लागणार आहे. मग भारतीय टीम मागे कशी राहणार??

या वर्षी इंग्लंड मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय टीम भगव्या वस्त्रात दिसणार आहे. चकित झालात?? मग पूर्ण बातमी वाचा. गडबड करू नका.

गेली अनेक वर्षे भारतीय क्रिकेट टीमची ऑफिशियल जर्सी आकाशी निळ्या रंगाची आहे. खरं म्हणजे अजूनही ती त्याच रंगाची आहे पण आयसीसीच्या एका नियमा मुळे काही सामन्यासाठी टीम इंडिया ला भगव्या कलरची जर्सी घालावी लागणार आहे. कसं काय हे सगळ बोल भिडू तुम्हाला समजावून सांगणार.

तर झालं असं की एके काळी क्रिकेट वाले फक्त पांढऱ्या कपड्यात खेळायचे. तो ब्लक अंड व्हाईटचा जमाना होता. बच्चन स्टाईल लॉंग बॉटम पँट आणि वर त्यात खोचलेला बटन वाला शर्ट. क्रिकेट सुद्धा ब्लॅक अँड व्हाईट प्रमाणे बोरिंग होते.

मग आला कलर टीव्हीचा जमाना. आयसीसीने फुटबॉलच्या धरतीवर क्रिकेटमध्ये रंग भरायचं ठरवलं. वेगवेगळ्या देशाच्या टीम कलरफुल झाल्या. मग काही वर्षांनी त्यावर जर्सी नंबर आले. फुटबॉल प्रमाणेच क्रिकेट मध्ये देखील १० नंबर, 7 नंबर हे महत्वाच्या खेळाडूना दिले जाऊ लागले.

त्या त्या देशाशी ते कलर आणि त्या त्या खेळाडूना ते ते नंबर जोडले गेले होते. उदाहरणार्थ भारतीय संघाला टीम ब्लू म्हणून ओळखलं जाऊ लागलं, १० हा सचिनचा नंबर म्हणून ओळखला जाऊ लागला. क्रिकेट न बघणाऱ्याना “अय्या हिरवी म्हणजे पाकिस्तानची टीम ना रे ” असे लडिवाळ अंदाज लावता येऊ लागले. 

सगळ काही व्यवस्थित चालल होतं.  मग परवा परवा आयसीसीला वाटलं बास झालं. लई दिवस आपण बॉस आहे हे दाखवून देणार काही केलं नाही. मग त्यांनी ठरवलं जर्सीमध्ये काही तरी बदल करू. काय पण बदल करायचं झालं तर फुटबॉलवाल्यांनी आधी काय केलंय हे बघान्र्या आयसीसीने जर्सीचा नियम सुद्धा परत फिफा कडून ढापून आणला.

फुटबॉल हा वेगवान खेळ आहे. त्यात खेळाडू फास्ट इकडून तिकडे बॉल मागे पळत असतात.  अनेकदा दोन्ही टीमच्या जर्सीचा कलर थोडा फार एकसारखा असतो मग टीव्हीवर किंवा स्टेडियममध्ये खेळ बघनाऱ्या प्रेक्षकांना नेमका आपल्या टीमचा प्लेअर कोणता हेच कळत नाही. तोंडात शिट्टी घेऊन पळणाऱ्या अंपायरला सुद्धा लई कन्फ्युजन होते.

मग फिफा ने नियम काय केला की मॅच खेळणाऱ्या दोन्ही टीमचा जर्सी कलर एक असला तर या दोन्ही पैकी जी यजमान टीम आहे ती आपल्या ऑफिशियल जर्सीमध्ये खेळणार. तर जी अवे टीम आहे त्यांनी दुसऱ्या रंगाची जर्सी घालायची.  यामुळ अंपायर वगैरे लोकांना सोपं पडू लागलं.

आता आपल्या क्रिकेट मध्ये एवढा काही मोठा इशू नाही. क्रिकेट हा खेळच एकदम निवांत आहे. अजून सुद्धा कसोटी मध्ये दोन्ही संघ पांढऱ्या कपड्यात खेळतात पण त्यामुळे कधी अम्पायरला काही प्रॉब्लेम आलंय असं ऐकलं नाही. पण तरी आयसिसीने पेंग्विन मुंबईत आणल्याप्रमाणे हा होम जर्सी अवे जर्सीवाला नियम क्रिकेट मध्ये आणला.

मग झालय असं की भारताला पण आपल्या होम जर्सी शिवाय दुसऱ्या रंगाची जर्सी आयसीसी कडून अप्रूव्ह करून घ्यायची. मग कुठला तरी रंग घ्यायचा म्हणून टीम इंडियाने भगवा केशरी नारंगी ऑरेंज म्हणतात तो कलर निवडला. विराट कोहली आणि कंपनी ही जर्सी इंग्लंड, श्रीलंका, अफगाणिस्तान या टीम विरुद्धच्या सामन्यात घालेल.

आता २२ जूनला अफगाणिस्तान बरोबर मच आहे. त्यांची देखील जर्सी आपल्या सारख्या रंगाची आहे पण या सामन्यात भारताऐवजी अफगाण त्यांची दुसरी जर्सी(जी लाल कलरची आहे) वापरेल. पण भारताच्या ३० जूनला होणाऱ्या एकेकाळी आपल्यावर राज्य करणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मात्र आपल्याला आपली भगवी वस्त्रे घालायला लागणार आहेत.

रंग दे तू मोहे गेरुआ

आता लगेच फेक्युलर लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढतील, भक्त लोक ‘मोदी है तो मुमकिन है ‘म्हणायला लागतील तर थांबा. हा भगवा इफेक्ट मोदिजींमुळे नाही.

भारताच्या जर्सी मध्ये आधी पासून आकाशी निळा रंगासोबत केशरी रंगाची पट्टी होती. यामुळे आयसीसीच्या बुक मध्ये भारताची जर्सी BLUE PLUS ORANGE अशीच लिहिलेली आहे. त्यामुळे टीम इंडियाने भगवा रंग निवडला यात आश्चर्य नाही. बघू हा पवित्र पावन रंग टीम ला वर्ल्ड कप मध्ये कितपत मदत करतोय ते.

हे ही वाच भिडू.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here