डॉ. लहानेंनी पळवून लावलं होतं जे.जे. रुग्णालयातील भूत !!!

सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी आपल्या भारतीय वैद्यकिय क्षेत्रात आपल्या नावाचा एक अलौकिक ठसा उमटवला आहे. खेड्यापाड्यातील अनेक रुग्णांवर नेत्ररुग्णाना नवी दृष्टी मिळवून देण्याचं श्रेय पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे जातं. रुग्णांना नवी दृष्टी देण्याबरोबरच अंद्धविश्वासू लोकांना देखील डोळस भूमिका घ्यायला लावण्याचं श्रेय तात्याराव लहानेंना जातं.

सन १९९४ दरम्यानचा हा किस्सा, डॉ. तात्याराव लहाने नुकतेच मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नियुक्त झाले होते. सतरा ते अठरा तास काम करत ते पुर्ण वेळ रुग्णालयातच घालवत असतं. आदल्या दिवशी रुग्णांची तपासणी करुन त्यांना अॅडमिट करुन घ्यायचं आणि दूसऱ्या दिवशी त्या रुग्णांची शस्त्रक्रिया करायची अस कामाचं स्वरुप ठरलेलं असायचं. पहिल्या दिवशी जितके रुग्ण अॅडमिट होत त्यापैकी जवळजवळ सर्वच स्त्री रुग्ण रात्रीच्या दरम्यान हॉस्पीटलमधून पळून जात असल्याचं तात्याराव लहानेंच्या लक्षात आलं.

तात्याराव लहानेंनी नेमकी ही काय भानगड आहे याचा शोध घेण्यास सुरवात केल्यानंतर त्यांना माहिती पडलं की जे.जे. रुग्णालयात भूत असून रात्रीच्या वेळी ते अनेक स्री रुग्णांना दिसतं. साहजिकच रात्रीच्या त्या अंधारात अनेक स्रीया पळ काढत असतं. डोळस असणारे डॉ. तात्याराव लहानेंनी त्याच क्षणी या भूताला पडकण्याचं आव्हान स्वीकारलं.

आवस्येचा मुहूर्त साधून डॉ. लहानेंनी मुद्दाम काही स्री रुग्णांना अॅडमीट करुन घेतलं. ज्या स्री रुग्णांच्या कक्षात हे भूत दिसत असत त्या कक्षात लहाने अंगावर पांघरून घेवून एका पलंगावर झोपून गेले. रात्रीच्या तीनच्या दरम्यान भूत भूत म्हणून स्रीयांचा आरडाओरडा चालू झाला. डॉ. त्या भूताच्या दिशेनं पळाले. समोर पाहतात तर चक्क स्री कक्षातली वार्डन.
आपलं काम हलकं व्हावं म्हणून रात्रीचं भूत बनून आगाऊ काम करण्याचा प्रकार ही वार्डन करत असत. डॉ. तात्याराव लहानेंनी सर्वांसमोरच या भूताचं खर रुप उघडकीस आणलं.

या आठवणीबद्दल सांगताना डॉ. तात्याराव लहाने हसत हसत सांगतात, आजतागायत जे.जे. रुग्णालयात पाऊल टाकायची हिंम्मत कोणत्याच भूताची झाली नाही.

तात्याराव लहाने यांनी हा किस्सा एका दिवाळी अंकाच्या मुलाखती दरम्यान सांगितला होता. आजपर्यन्त लाखों शस्त्रक्रिया करुन अनेकांना डोळस बनवणाऱ्या या अवलियाने माणसांना खऱ्या अर्थाने डोळस बनवण्याचं देखील काम केलं आहे.