जगप्रसिद्ध गांजा पिकवणारं गाव भारताचा कायदा मानत नाही पण अकबराची पूजा करतं..!!!

हिमाचल प्रदेशातील अतिदुर्गम प्रदेशातील ‘मलाना’ हे कुलूपासून ४५ किलोमीटरवर असलेले गांव. तुम्ही ज्यावेळी या गावाच्या हद्दीत प्रवेश करता त्यावेळी भारताचं संविधान तुम्ही मागे सोडलेलं असतं. कारण या गावात भारताचं संविधान लागू होत नाही. भारतातील कायदे आणि नियम यांच्याशी या गावाला कसलंही देणं-घेणं नाही. मलाना गांव भारतातील सर्वात प्राचीन लोकशाही व्यवस्था असल्याचा या गावातील लोकांचा दावा आहे. गावात साधारणतः ३०० कुटुंब असून गावाची लोकसंख्या ३००० इतकी आहे.

जुमलू देवतेची आणि अकबराची पूजा

या गावाला अतिशय प्राचीन इतिहास आहे. ‘जमलू’ नावाच्या ऋषीची या गावात पूजा केली जाते कारण पुरातन काळात याच ऋषीने या गावाचे नियम बनविले असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळेच या गावात खास ‘जमलू’ देवतेच्या पूजेसाठी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

असंही सांगितलं जातं की हे भारतातील असं एकमेव गांव आहे जिथे वर्षभारातून एकदा मुघल बादशहा अकबराची पूजा केली जाते, पण ही पूजा नेमकी का केली जाते याविषयी मात्र काही ठोस कारण सापडत नाही. असंही सांगतात की ही पूजा फक्त गावातील लोकच बघू शकतात, इतरांना ही पूजा बघण्याची परवानगी नाही.

भारताचा कायदा चालत नाही

या गावाची स्वतःची संसद आहे. आपल्या संसदेप्रमानेच या संसदेचे उच्च आणि कनिष्ठ असे दोन सभागृह आहेत. कनिष्ठ सभागृहाला ‘कनिष्ठांग’ तर ज्येष्ठ सभागृहाला ‘ज्येष्ठांग’ असं म्हंटलं जातं. संसदेच्या सदस्यांना जेठरा म्हणण्यात येतं. ही संसदच गावासाठी नियम आणि कायदे ठरवते.

कुठल्याही गोष्टीला प्रवेश केला तरी दंड

तुम्ही या गावात प्रवेश केला की गावातील लोकांच्या नजरा तुमच्यावर खिळलेल्या असल्याचं तुमच्या लक्षात येतं. हे लोक तुमच्यावर लक्ष ठेऊन असतात कारण तुम्ही जर कुठल्याही गोष्टीला स्पर्श केला तर तुम्हाला येथील कायद्यानुसार १००० ते २५०० रुपये दंड भरावा लागू शकतो. तशा पद्धतीचे बोर्ड जागोजागी गावात बघायला मिळतात.

या गावातील लोक स्वतःला सिकंदराच्या फौजेतील सैनिकांचे वंशज मानत असल्याने इतर लोकांना ते कनिष्ठ मानतात. त्यामुळे तुम्ही त्यांना स्पर्श करू शकत नाही. याच कारणामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक या गावाला भेट देतात परंतु ते गावात राहू शकत नाहीत. भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांना आपली निवासाची व्यवस्था गावाबाहेर तंबू ठोकून करावी लागते.

गावात तुमच्यासोबत काही बरं-वाईट झालं तर त्याची जबाबदारी संपूर्णतः तुमची असते. गावात प्रवेश करण्यापूर्वीच तशाप्रकारचा फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागतो.

याच गावात मिळतो जगातील सर्वात महागडा चरस / गांजा

जगभरात प्रसिद्ध असलेली ‘मलाना क्रीम’

या गावात मिळणारी ‘मलाना क्रीम’ जगभरात प्रसिद्ध आहे. ही मलाना क्रीम म्हणजे एक प्रकारची चरस असते. या चरसमध्ये उच्च गुणवत्तेचं नैसर्गिक तेल असल्याने ती सर्वोत्तम समजली जाते. ही चरस तुम्हाला जवळपास ८००० रुपये तोळा एवढी किंमत मोजून विकत घ्यावी लागते.

जगप्रसिद्ध असणाऱ्या या ‘मलाना क्रीम’ची विदेशात मोठ्या प्रमाणात तस्करी होते. ‘चरस’ शिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं गावात उत्पन्न घेतलं जात नाही.

 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here