मी चार वर्ष MPSC त झटलो, आज माझ्या कंपनीचा टर्नओव्हर महिन्याला दहा लाखांचा आहे..!! 

दिपक सिसाळ या तरुणाने सांगितलेली त्याची गोष्ट, तो MPSC करत होता. पुण्यात राहिला. लायब्ररी लावली अभ्यास केला. एका टप्यावर निर्णय घेतला आणि बाहेर पडला, पुढे काय झालं ते त्याच्याच शब्दात.

आई वडिलांनी त्यांची जबाबदारी पार पाडत असताना कधीच आमच्यावर त्यांचे निर्णय लादले नाहीत. शिक्षणाच्या बाबतीत किंवा करीयरच्या बाबतीत तुम्हाला जे बर वाटतय ते करा असच सांगितलं. त्याचा सगळ्यात मोठ्ठा फायदा झाला तो म्हणजे आज जे काही आहे ते आईवडिलांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच. दबाव नाहीतर अपेक्षांच्या ओझ्याखाली मरुन जाण्यापेक्षा आम्ही स्वत:च्या पायावर ठेचकळत का होईना जगतोय याच समाधान वाटत.

पण कस असतं, आपल्याला कोणीच काही बोलत नाही याच टेन्शन वेगळं असतं. बोलत नाहीत म्हणल्यानंतर आपण काहीतरी केलं पाहीजे म्हणून MPSC करायचा निर्णय घेतलेला. माझी दहावी पर्यंतची शाळा पलूस मध्ये झाली. अकरावी बारावी आर्ट्स मध्ये झाली कारण MPSC मुळे ते अकरावी, बारावी आर्टस् मधेच करायचे ठरलेलं होते, पण आर्टस् तस कमीपणाच समजलं जायचं म्हणून बारावीनंतर BBA केलं. कारण जरा English चा एक टच पण मिळतोय. BBA करायचं खरं कारण म्हणजे त्याकाळी एक क्रेझ होती. ती म्हणजे BCA आणि BBA ची. आणखीन महत्वाचं म्हणजे Engineering एवढं ते अवघड नाही आणि आर्टस् एवढं कमी नाही.

BBA झालं ते सांगलीतल्या चिंतामणराव कॉलेज मध्ये. ते झाल्यावर घराकडं आलो होतो. MPSC तर करायची असली तर सगळे पुण्याला जायचे पण मी कोल्हापूरला गेलो. घरालेच दोन्ही चुलत भाऊ PSI झालेले. त्यामुळं MPSC असं वेगळे कोणी आयडॉल नव्हतं. जे दोघे होते ते घरचेच. त्यातला एकाने सांगितले होते कि, पुण्यात येण्याची काही गरज नाही कोल्हापुरात माझी ओळखीची आहेत. मग कोल्हापुरला गेलो. तिथं स्टडी सर्कल क्लास लावला पण तिथं सहा महिने काढल्यावर पुण्याला गेल तरच होईल अस वाटायला लागलं.

सहा महिन्यातच पुण्यात आलो. पुण्यात मी जोरदार अभ्यास  सुरू केला आणि दिड महिन्यात PRE काढली. पुण्यात  कोणताच क्लास लावला नव्हता. जो काय क्लास करायचा तो कोल्हापुरात झालेला. प्लस पुण्यात जो भाऊ होता त्याच्या मित्रांनी सांगितलेलं. काय करायचं आणि काय नाही. म्हणून क्लास न लावता अभ्यास सुरू केला. त्याच्या जीवावरच मी पहिली PRI काढली. 

सकाळी ७ ते ७:३० च्या दरम्यान मी लायब्ररीत जायचो. ११ ते १२ वाजेपर्यंत तिथेच असायचो. ते एक रुटीन पडलेलं. सुरवातीला मी ६ महिने नवी पेठत होतो, पण स्वारगेटला कस जायचे ते सुद्धा मला माहित नव्हतं.

आमच्या डोक्यात चोवीस तास एकच, ते म्हणजे MPSC एके MPSC.

त्या पेक्षा वेगळे एक जग आहे हे माहीतच नव्हतं. त्यामुळं एकच तोटा झाला, बाहेरच जग कळलं नाही, कारण डोक्यात प्री, मेन्स, क्लास, लायब्ररी, पुस्तकं इतकच असायचं. हे सगळ चार वर्ष चालू होतं. त्या चार वर्षात प्री झाल्या. त्यात पास झालो. मेन्स पण पास झालो. शेवटी लटकायचो आणि परत तोच खेळ सुरू व्हायचा. दुर्देवाने म्हणा नायतर सुदैवाने पण एकपण पोस्ट निघाली नाही.

मध्ये एक-दोन वर्षे MPSC ची अॅड नव्हती. वाट बघून एक अॅड आली त्यात ६९ जागा होत्या. पुन्हा मुलांची मारामार सुरू झाली. या सगळ्यात डिप्रेशन आलं. जे काही ओळखीचे होते त्यांच्यापासून मुद्दाम दूर गेलो. लायब्ररीत भांडण व्हायची. कुणासोबतच पटत नव्हतं. सकाळची सुरवात तर चहावाल्याबरोबर भांडूणच व्हायची.

आत्ता कळतं, कुणाबरोबरच पटत नव्हतं त्याचा खरा राग स्वत:वरच होता. चार वर्षात सकाळी लवकर उठायचं. कुणाशी बोलायचं नाही. लायब्ररीत जायचं आणि वाचायचं इतकच चालू होतं. बर प्रत्येकाला आयुष्यात एखादी गर्लफ्रेंन्ड असावी अस वाटतं पण हे जेव्हा वाटायचं वय होतं तोपर्यन्त माझ्यातला इनोसंन्स गेलेला.

यावर एक उपाय दिसला तो लायब्ररी सोडायचा. रुम सोडायचा. नवी पेठ सोडायचा. आयुष्यात तेच ते सुरू असल्यान MPSC च्या पोरांच्यात रहायच नाही असा निर्णय घेतला.

ओंकारेश्वर पुलाजवळच्या विठ्ठल मंदिराच्या कट्ट्यावर एकटाच बसायचो. किती तरी वेळ आणि एकटच रडायचो. रडू येत नव्हतं कारण कुणाला काही सांगता येत नव्हत. धड रडता येत नव्हतं. चारचौघांच्यात जावून मज्जा करावी तर तसपण काही नव्हतं. त्या दिवसात जे काही होत होतं ते सांगता येत नाही असच होतं.

एकदिवस कट्यावर बसूनच ठरवलं की घराकडं जायचं ते पण कायमचं. कारण ती जी अॅड होती त्यानंतर अॅड येण्याचे कमी चान्सेस होते. आणि MPSC ची पूर्ण प्रोसेस होण्यासाठी एक ते दिड वर्षे जाणार होते.

अभ्यास तर भरपूर होत होता. पण आता वाचतोय त्यातली चार पानं पण लक्षात राहत नव्हती. त्याच दिवशी कट्यावर बसून हिशोब मांडलेला. आपली अजून दोन ते तीन वर्ष जाणार. आधीच चार वर्ष यात घालवली होती. तेव्हा विचार केलेला दोन तीन वर्षात पोस्ट निघल. म्हणजे २५ व्या वर्षी पोस्ट आणि २८ व्या वर्षी लग्न. सरळ गणित होतं पण फिसकटलं. आत्ता २५ व्या वर्षी पण तिथच होतो. म्हणजे २८ व्या वर्षी पोस्ट आणि ३० व्या वर्षी लग्न. त्यात पोस्ट निघाली नाही तर…?

हिशोब लागला आणि घराकडे यायचा पक्का निर्णय घेतला. 

त्या नंतरचा असा एक विचार केला,

गावात येवून फक्त शेती करत राहणं उपयोगाच नाही याची जाणीव होती. आमची बागायती शेती होती. ती पण २० एकर. या शेतीला धरुन आपण काहीतरी बिझनेस करायला हवा असा डोक्यात विचार येत होता.

वडिलांचा इंजिनीरिंगचा व्यवसाय MIDC मध्ये होता. १९९८ नंतर त्यांनी तो भाड्याने देऊन टाकला होता. एके दिवशी माझा भाऊ फुड प्रोसेसिंग एग्झिबिशन पहायला गेलेला. त्याने तिथे फुड प्रोसेसिंगची माहिती घेतली आणि मला कळवलं. तो माझ्या मागे उभा राहिला. तसे घरचे सगळेच पहिल्यापासून सपोर्ट करण्यासाठी असायचे. भावाने सांगितलं आपण टॉमेटोवर प्रोसेसिंग करायला हवी. पुर्वी आम्ही आमच्या शेतात टॉमेटो घ्यायचो. हे टॉमेटो कधी २ रुपये किलो जायचे तर कधी ६० रुपये किलो.

आपल्या मालावर आत्ता आपणच प्रोसेसिंग करायला हवं हे जाणलं. 

घरची परस्थिती चांगली असल्याचा फायदा मला झाला. सुरवातीला जागा आणि बिल्डिंग असून साधारण ८० लाख ते १ करोड पर्यन्तची इन्व्हेस्टमेंट होती. MIDC मध्ये असणाऱ्या जागेवर आणि बिल्डिंगवर ६० लाख रुपयांचे कर्ज मिळाले.  लोकांना वाटतं ६० लाखांचे कर्ज मिळाले यात कसला संघर्ष आला पण आयुष्यात कधीच काही न बोललेले आईवडिल, भावाचा असणारा विश्वास आणि त्यात MPSC सोडून आपण घेतलेला वेगळा निर्णय या सगळ्यांमध्ये अपेक्षांच ओझ सर्वात जास्त होतं. त्यामुळच रात्रीची झोप उडून गेलेली.

१९ ऑक्टोंबर २०१६ ला शेवटी हा बिझनेस सुरू केलं. १९ ऑक्टोंबरला बिझनेस चालू झाला आणि ८ नोव्हेबरला नोटबंदी झाली. सुरू केलेला बिझनेस बसतोय अस वाटायला लागलं. आमचा बिझनेस ज्या व्यक्तींबरोबर होते ते साधारण होलसेल व घावूक व्यापारी असायचे. रोजची आवकजावक असल्याने त्यांचा सगळा व्यवहार कॅशमध्ये व्हायचा. नोटबंदी नंतर सगळ मार्केट डाऊन पडलं. डिसेंबर जावून जानेवारी आला तरी जुन्या व्यवसायिकांच व्यवहार सुरळीत होत नव्हते. त्यात आमच्यासारख्या नवीन लोकांनी काहीतरी मिळवणं शक्यच नव्हतं.

पण मार्च एडिंग नंतर हळुहळु सुरळीत व्हायला लागलं. हळुहळु बिझनेस सेट करत गेलो. आजचं सांगायच झालं तर आजचा टर्नओव्हर महिन्याला दहा लाख आहे. आज माझ्याकडे २५ लोक काम करतात. या २५ जणांचा पगार ६ हजारांपासून ३० हजारांपर्यन्त आहे. 

MPSC करत असल्याचा मला सगळ्यात महत्वाचा फायदा झाला म्हणजे मी प्रोडक्ट घेवून एखाद्याच्या दारात दहावेळा गेलो तरी माणसं विचारत नव्हती. पण तरी आपण दारावर जायच असत हे MPSC मधून शिकलो. काही झालं तरी लाजायचं नाही. MPSC मुळं नकळत का होईना धाडस करायचा एक अॅटिट्यूड तयार झालाच. लावून धरायची गोष्ट मला तरी मिळाली. तीच घेवून यात उतरायचं ठरवलेलं. आत्ता पण माझ्यासारखे लय जण अडकून आहेत. पळपूटा म्हणतील, घरचे काय म्हणतील म्हणून त्याच लायब्ररीत त्याच पुस्तकात तोंड घालून बसतात.

मला फक्त एवढच वाटतं आपल्या क्षमता ओळखायला आल्या पाहीजेत. एका टप्यावर कळतं की आत्ता नाही जमणार त्यावेळी PLAN B ची तयारी करुन उतरायला पाहीजे. कारण MPSC मध्ये तितकं झटायला तर सगळेच शिकतात. 

आपल्याही आजूबाजूला अशीच माणसं असतील, ज्यांनी स्वतच: विश्व निर्माण केलं असेल. कदाचित तुमचही आयुष्य असेच असेल तर लिहून पाठवा, तुमची कथा, तुमच्या माणसांची कथा bobhidu1@gmail.com वर.

हे ही वाचा. 

13 COMMENTS

  1. खूप छान निर्णय घेतला सर
    मी हि असाच MPSC करत होतो आता मी पण एक व्यवसाय सुरु केलाय पर्यटनाचा… खूप सारी मुलं MPSC मध्ये अडकली आहेत तेच तेच करत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे…तुमचा व्यवसाय पाहायला नक्की येऊ…

  2. लै भारी कोल्हापूरकर 💐💐… माझ्या पण मनात अधून मधून विचार येत असतो mpsc सोडण्याचा आपलं स्वतः च काहीतरी चालू करण्याचा .. हा लेख वाचून मस्त वाटलं … धन्यवाद बोलभीडू नक्कीच mpsc मधील जबरदस्तीने लायब्ररीत बसलेल्या युवकांना मार्गदर्शन होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here