१५ गोळ्या झेलूनही मातृभूमीसाठी लढत राहिलेल्या सैनिकाची अजरामर शौर्यगाथा !

२० मे १९९९.

देश कारगिलच्या युद्धाला सामोरा जात होता. लग्न होऊन केवळ १५ दिवसच झालेल्या योगेंद्र सिंह यांच्यासाठी सैन्यातून निरोप आला होता. निरोपात शक्य तितक्या लवकर कारगीलला रवाना होण्याविषयी सांगण्यात आलं होतं. १९ वर्षाच्या तरुण सैनिकासाठी हा कसोटीचा काळ होता. एकीकडे नुकतच लग्न झालं होतं आणि दुसरीकडे इतक्या कमी वयात देशासाठी लढायची संधी मिळाली होती.

कुटुंबियांचा निरोप घेऊन योगेंद्र सिंह यादव तात्काळ कारगिलला पोहोचले. त्यावेळी त्यांच्या ‘१८ ग्रेनेडीअर’ बटालियनवर ‘तोलोलिंग’ शिखरावर चढाई करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या बटालियनने २२ दिवस निकराचा लढा दिला.

२५ जवानांच्या हौतात्म्यानंतर  १२ जून १९९९ रोजी तोलोलिंगवर तिरंगा फडकवला. हा कारगिलमधला भारतीय सैन्याचा पहिला विजय होता.

पुढचं आव्हान मात्र अतिशय खडतर होतं. आता द्रास सेक्टरमधील सर्वात उंच समजल्या जाणाऱ्या ‘टायगर हिल’वर चढाई करण्याची योजना बनविण्यात आली होती. त्यासाठी बटालियनची तीन तुकड्यांमध्ये विभागणी करण्यात आली होती. अल्फा, बीटा आणि घातक.

योगेंद्र सिंह यांचा समावेश ‘घातक’ या तुकडीत करण्यात आला होता.

तोलोलिंगवर चढाईच्या वेळी योगेंद्र सिंह यांचं वय होतं अवघं १९ वर्ष. शिवाय त्यांचा सैन्यसेवेचा अनुभव देखील होता फक्त अडीच वर्षांचा. त्यामुळे त्यांना थेट रणभूमीवर लढण्यासाठी पाठविण्यात आलं नव्हतं. त्यांच्यावर जबाबदारी होती खालून बाकी सैन्यासाठी अन्नधान्य घेऊन जाण्याची. पण हे काम त्यांनी इतकं मनोधैयाने आणि जीवावर उदार होऊन पार पाडलं होतं की ‘टायगर हिल’सारख्या अत्यंत महत्वाच्या चढाईसाठी त्यांची ‘घातक’मध्ये निवड करण्यात आली होती.

२ जुलै १९९९.

‘घातक’ने मोठ्या त्वेषाने ‘टायगर हिल’वर हल्ला चढवला. भौगोलिक परिस्थितीच अशी होती की शत्रूच्या नजरेतून वाचण्यासाठी फक्त रात्रीच्या वेळीच चढाई करणं शक्य होतं. लपूनछपून  दिवस काढायचा आणि रात्री चढाई करायची अशी कसरत होती ती. शेवटी तिसऱ्या रात्री ते आपल्या ७ साथीदारांसह शत्रूच्या बंकरच्या अतिशय जवळ जाऊन पोहोचले आणि बंकर्सवर अदाधुंद फायरिंग करत एक बंकर नष्ट केलं.

तोपर्यंत शत्रूच्या दुसऱ्या बंकरमधून प्रतिहल्ला झाला. ५ तास घमासान युद्ध झालं आणि या हल्यात सोबतचे ६ साथीदार शहीद झाले. योगेंद्र सिंह यांच्यावर देखील गोळीबार झाला होता पण श्वास अजून चालू होता. पाकिस्तानी सैन्य ज्यावेळी सर्वजन मारले गेलेत का हे बघायला आलं, त्यावेळी पुन्हा त्यांनी गोळीबार केला. गोळ्या योगेंद्र सिंह यांच्या शरीरात पण त्यांनी थोडी देखील हालचाल केली नाही.

पाकिस्तानी सैन्याच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी आपण मारले गेलोय असं भासवत ते तसेच निपचित पडून राहिले.

मनाशी निश्चय पक्का झाला होता जोपर्यंत जिवंत राहू तोपर्यंत लढत राहू. पाकिस्तानी सैन्याला आता याची खात्री झाली होती की तुकडीतील सर्वच भारतीय सैनिक मारले गेले आहेत. ते आपली पुढची योजना बनवत होते, ज्यात भारतीय सैन्याच्या बंकरवर हल्ला करण्याचा समावेश होता. ही सर्व योजना योगेंद्र सिंह ऐकत होते. शरीरात कसलीही शक्ती राहिलेली नव्हती. बंदुकीच्या गोळ्यांनी शरीर रक्ताच्या थारोळ्यात होतं. अशाही परिस्थितीत ही माहिती त्यांना आपल्या साथीदारांना जाऊन सांगायची होती.

त्यावेळी संकट टळलंय असं वाटत असतानाच पुन्हा एक पाकिस्तानी सैनिक भारतीय शाहीद जवानांपाशी पोहोचला आणि त्याने अदाधुंद गोळीबार केला. ४ ते ५ गोळ्या परत त्यांना लागल्या. एक गोळी छातीत जाऊन धडकली.

आता एक गोष्ट कळून चुकली होती की वाचण्याची शक्यता जवळजवळ नाहीच अशा वेळी पाकिस्तानी सैनिक परतत असताना योगेंद्र सिंह यांनी होती नव्हती शक्ती एकवटून एक हँड -ग्रेनेड त्याच्यावर फेकली. ग्रेनेड फुटली आणि तो सैनिक मारला गेला. इतर ही अनेकजण या हल्ल्यात मारले गेले.

या हल्ल्याने पाकिस्तानी सैन्य सावध झालं. एवढ्याच वेळेत योगेंद्र सिंह यांनी रायफल घेतली आणि गोळीबार सुरु केला. कसलीही हालचाल करायची शक्ती नसलेला माणूस आलटून पालटून वेगवेगळ्या ठिकाणाहून फायरिंग करत होता. वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळीबार होत असल्याने पाकिस्तानी सैन्याचा असा समज झाला की भारतीय सैन्याची दुसरी तुकडी येऊन पोहोचली आहे. त्यामुळे त्यांनी तिथून पळ काढला.

twitter

यादरम्यान योगेंद्र सिंहांना जवळपास १५  गोळ्या लागल्या होत्या. फक्त श्वास चालू होता. उठून उभं राहणं देखील शक्य नव्हतं, पण डोक्यात फक्त एकच गोष्ट होती की शत्रूच्या योजनेची माहिती आपल्या साथीदारांपर्यंत पोहोचवून भारतीय सैन्यावरचा संभाव्य हल्ला टाळायचा आणि आपल्या साथीदारांचे प्राण वाचवायचे.

आजूबाजूला आपल्या साथीदारांचे मृतदेह पडलेले होते. योगेंद्र सिंहांना रडू कोसळलं होतं. पण आपल्या तुकडीतील साथीदारांच्या मृतदेहावर अश्रू गळायला देखील वेळ नव्हता, कारण लवकरात लवकर भारतीय सैन्याला शत्रूच्या योजनेची माहिती द्यायची होती.

समोरचा रस्ता दिसत नव्हता. शरीरात कसलीच ताकत नव्हती अशाही स्थितीत ते सरपटत सरपटत पुढे सरकत होते. एका नाल्यातून सरपटत ते शेवटी भारतीय सैन्याच्या तळापर्यंत पोहोचले आणि तिथे जाऊन त्यांनी शत्रूसैन्याच्या हालचालीची आणि योजनेची माहिती भारतीय सैन्याला दिली. माहिती पुरवल्यानंतरच ते बेशुद्ध झाले. पुढे त्यांना हॉस्पिटलमध्ये हालविण्यात आलं. ३ दिवसानंतर ज्यावेळी ते शुद्धीत आले, त्यावेळी त्यांच्यापर्यंत एक बातमी पोहोचली होती.

बातमी होती भारतीय विजयाची. ‘टायगर हिल’वर तिरंगा फडकाल्याची.

युद्धात योगेंद्र सिंह इतक्या वाईट पद्धतीने  जखमी झाले होते की त्यांचं जिवंत वाचण हाच मुळात एक चमत्कार होता. पूर्णपणे बरं होण्यासाठी पुढची १६ महिने त्यांना त्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. मातृभूमीच्या संरक्षणार्थ त्यांनी मृत्यूशी दिलेल्या लढ्याची दखल घेत भारत सरकारकडून त्यांना ‘परमवीर चक्र’ देऊन गौरविण्यात आलं.

एवढ्या कमी वयात हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिलेच सैनिक ठरले.

हे ही वाचा भिडू