त्यांच्या एका गोळीने पुढे दया नायक ते प्रदिप शर्मांसारखे एन्काऊंटर स्पेशॅलिस्ट तयार झाले.

प्रदिप शर्मा, दया नायक, साळसकर असे कित्येक अधिकाऱ्यांची नाव आली की पहिला शब्द येतो तो एन्काउंटर स्पेशॅलिस्ट. कित्येक गुंडाचा य़शस्वी खातमा करुन या अधिकाऱ्यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डला वेळीच वेसण घातली. पण भारतात या एन्काउंटर सुरवात कधी आणि कशी झाली विचारलं की अनेकांकडे उत्तर नसतं. हि गोष्ट त्याच पहिल्या गोळीची ज्यामुळे भारतात एन्काउंटरचा प्रकार सुरू झाला.

दिल्लीचे माजी पोलीस कमिशनर अजय राज शर्मा हे देशात एन्काऊंटरची सुरुवात करणारे पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. १९७० साली त्यांनीच चंबळच्या खोऱ्यातील ‘जंगा-फुला’ गँगचं  एन्काऊंटर घडवून आणत उत्तर प्रदेश पोलीसमध्ये कार्यरत असलेल्या महाबीर सिंह या आपल्या शूरवीर पोलीस अधिकाऱ्याच्या ‘जंगा-फुला’ गँगमधील ‘गुल्लो’ या महिला डाकूने केलेल्या हत्येचा बदल घेतला होता.

नेमकं काय झालं होतं..? 

अजय राज शर्मा यांनीच दिलेल्या माहितीनुसार, सत्तरच्या दशकात चंबळच्या खोऱ्यात सक्रीय असलेल्या ‘जंगा-फुला’ गँगने एका शाळकरी मुलांच्या बसचं अपहरण केलं होतं. या बसमध्ये उत्तर प्रदेश पोलिसमध्ये कार्यरत असलेले महाबीर सिंह हे देखील होते.

अपहरण केल्यानंतर गँगच्या डाकुंनी महाबीर सिंह यांना बसमधून निघून जाण्यास सांगितलं. परंतु महाबीर सिंह हे आपल्या नावाप्रमाणेच शूर-वीर होते. ही बस आपल्या मृतदेहावरूनच जाईल असा पवित्रा त्यांनी घेतला.

हातात कुठलंही शस्त्र नसताना महाबीर सिंह ‘जंगा-फुला’ गँगच्या २५-३० डाकुंना त्यांनी आवाहन दिलं. त्यातल्या एका डाकूशी त्याची रायफल हिसकावताना त्यांची झटापट झाली. प्रकरण हाताबाहेर जातंय असं लक्षात आल्यानंतर गँगमधील महिला डाकू गुल्लो हिने निशस्त्र महाबीर सिंह यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

अजय राज शर्मा ज्यावेळी घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी आपल्या शूरवीर पोलीस अधिकाऱ्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बघून त्यांना रडूच कोसळलं.

त्यावेळीच अजय राज शर्मांनी मनाशीच प्रतिज्ञा केली की महाबीर सिंह यांच्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा आणि आपल्या डोळ्यातून गाळलेल्या अश्रूच्या प्रत्येक थेंबाचा बदला घ्यायचा.

‘ऑपरेशन चंबळ घाटी’.

१९७० सालच्या जून महिन्यात अजय राज शर्मा यांना प्रमोशन मिळालं आणि ते उत्तर प्रदेशचे पोलीस अधीक्षक झाले. त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी ‘ऑपरेशन चंबळ घाटी’ हातात घेतलं. जबाबदारी होती अर्थातच शर्मा यांच्यावरच.

या ऑपरेशनसाठी शर्मा यांना मुबलक प्रमाणात शस्त्रास्त्रे पुरविण्यात आली. ऑपरेशनसाठी आपल्या पसंतीनुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या टीमची निवड करण्याची सूट देण्यात आली. हाताशी सगळं काही होतं, फक्त त्या भागात चांगलं ऑफिस नव्हतं अशावेळी शर्मांनी थेट आगरा सर्किट हाउसलाच आपलं ऑफिस बनवलं.

बदला पूर्ण करण्यासाठी केली उत्तर प्रदेशची सीमा पार केली

काही दिवसातच बातमी समजली की ‘जंगा-फुला’ गँग राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील ‘तोर’ या गावात थांबलेली आहे. जशी बातमी मिळाली तशी अजय राज सिंग आपल्या टीमला घेऊन ‘तोर’च्या दिशेने निघाले.

कायदेशीर कचाट्यात अडकू नये यासाठी त्यांनी थेट धौलपूरच्या अॅडीशनल एसपीच्या घरी बस्तान बसवलं. प्रकरण राजस्थान पोलिसांच्या अखत्यारीत येत असूनही शर्मा यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश पोलिसांनी तेर गावाला घेरलं आणि ‘जंगा-फुला’ गँगच्या डाकुंवर गोळ्यांचा वर्षाव सुरु झाला.

दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु झाला. विशेष म्हणजे हे सगळं भर दिवसा घडत होतं. दिवस मावळेपर्यंत ‘जंगा-फुला’ गँगमधील ३ कुख्यात डाकू पोलिसांच्या गोळीबारात ठार झाले होते.

या पोलीस चकमकीची बातमी समजल्यानंतर भरतपूरचे  पोलीस अधीक्षक नारायण सिंह देखील लवाजमा घेऊन घटनास्थळी पोहोचले. विशेष म्हणजे त्यांनी शर्मा यांच्या तुकडीसाठी मोठ्या प्रमाणात जेवणाची व्यवस्था केली.

नारायण सिंह यांच्या या कृतीने आपल्या मनात त्यांच्याविषयी असलेला आदर अजूनच वाढल्याचं अजय राज शर्मा सांगतात. दुसऱ्या राज्यातील पोलीस अधिकारी आपल्या सीमेत येऊन कारवाई करत असताना त्या राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडून शक्यतो मनाचा इतका मोठेपणा दाखवला जात नाही.

पुढचे २२ तास पोलीस आणि ‘जंगा-फुला’ गँगमध्ये गोळीबार होत राहिला. या कारवाईमध्ये ‘जंगा-फुला’ गँगचे जवळपास १३ डाकू मारले गेले. या कमी नारायण सिंह यांच्या अनुभवाचा देखील फायदा झाला.

अजय राज शर्मांनी महाबीर सिंह यांच्या हत्येचा बदला ‘जंगा-फुला’ गँगमधील १३ डाकूंचा खातमा करून पूर्ण केला !

हे ही वाच भिडू

 

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here