शिवरायांमुळे जळगावच्या मातीत केळी पिकवण्यास सुरवात झाली.

अस्सल झणझणीत चवीचा प्रदेश म्हणजे खानदेश. या झणझणीत भागात लोक मात्र गोड आहेत. याच भूमीत बालकवी जन्मले, याच भूमीत कवियत्री बहिणाबाई चौधरी घडल्या. कवी मनाच्या साने गुरुजींची ही कर्मभूमी होती. अहिराणीचा गोडवा प्रत्येक खानदेशी माणसाच्या उतरलेला असतोच. मात्र आणखी एक गोष्ट आहे जी या खानदेशकरांना गोड बनवते.

जळगावची केळी.

अख्ख्या भारतातल्या पन्नास टक्के केळी जळगाव जिल्ह्यात पिकते. इथून केळी थेट सीमेपार निर्यात होते. जगात कुठेही जा जळगावकरांना केळीसाठी ओळखलं जात. इतर ठिकाणीही केळीच उत्पादन घेतल जातं पण जळगावचा गोडवा तिथे नाही. अख्ख्या महराष्ट्रासाठी जळगावची केळी हा अभिमानाचा विषय आहे. अनेकदा प्रश्न पडतो की जळगावमध्ये केळी आली कशी?

याच उत्तर आहे मराठाशाहीच्या इतिहासात.

कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा  जाणता राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक धोरणं राबवली, राज्यात जलसंधारणाची अनेक कामं केली. त्याकाळी त्यांचे शेती विषयीचे विचार हे आजच्या काळातही विचार करायला लावणारे आहे.

महाराजानीआपल्या एका सुभेदाराला लिहिलेलं पत्र तर खूप प्रसिद्ध आहे, त्यात ते म्हणतात

” इमाने इतबारे स्वामीकार्य करावं अशी तू शपथ वाहिली आहेस, त्यानुसार भाजीच्या एका देठावरही मन न दाखविता रास्तपणे व योग्यपणे वागावे. रयतेचा वाटा रयतेला मिळेल आणि महसूल आपल्याला येईल ते करावे. रयतेवर काडीचाही जुलूम झाल्यास आम्ही तुझ्यावर राजी नाही हे नीट समजावे  “

असे हे छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पुढे विचार करणारे होते. त्यांनी तेव्हा घेतलेल्या निर्णयाची फळ आजही आपण चाखतो.

याच सर्वात मोठ उदाहरण म्हणजे जळगावची केळी.

६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. रयतेचे राजे छत्रपती बनले. पण या समारंभात प्रचंड मोठा पैसा खर्ची पडला होता. याची भरपाई करण्यासठी त्यांनी काही महत्वाच्या मोहिमा हाती घेतल्या त्यात पहिलीच मोहीम खानदेशाची होती.  खानदेशात असलेल्या ठाण्यांवर छापे मारून मराठ्यांनी मुघलांना जेरीस आणले.

या मोहिमेत अनेक खानदेशातील सरदार स्वराज्याशी जोडले गेले. पुढे लगेच झालेल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत ते सामील झाले.

साधारण १६७६-१६७७ दरम्यान शिवरायांनी आपल्या मावळ्यांसह कर्नाटक आंध्रप्रदेश तामिळनाडू पर्यंत भराऱ्या मारल्या. या मोहिमेत प्रचंड मोठा विजय देखील मिळाला. कुतुबशाही, आदिलशाही, दक्षिणेतील छोटया मोठ्या नायकांचा पराभव केला. आपले सावत्र बंधू व्यंकोजीराजेंच बंड मोडून काढल.

स्वराज्यासाठी ही मोहीम खूप महत्वाची ठरली. महाराज कितीही मोठ्या मोहिमेवर असले तरी त्यांच लक्ष चौफेर असायचं. परदेशी भागात आपल्या रयतेच्या भविष्यासाठी कोणती गोष्ट उपयोगी पडेल ते ती टिपून घ्यायचे. यातच त्यांना कारवार भागात केळीचे कंद मिळाले.

केळी हा प्राचीन काळापासून भारतात मिळणारे फळ आहे. त्याचे उल्लेख पुराणात आढळतात. त्याचा वापर देवकार्यासाठी होतो. 

मात्र शिवकाळात याचा उपयोग लढाऊ योध्यांसाठी खाद्य म्हणून केला जायचा. एकतर मोहिमेवर जाताना वाहून न्यायला सोपे असते. यात सर्व प्रकारची जीवनसत्वे मिळतात. प्रचंड उर्जा मिळते. शिवाय खायलाही अतिशय सोपे असलेले हे फळ प्रत्येक मावळा जवळ बाळगायचा. मुख्यतः कोकणात याच पिक यायचं, मात्र अनेकदा मोहिमेच्या वेळी केळ्यांची कमतरता भासायची.

दक्षिण दिग्विजयामध्ये शिवरायांनी हे केळीचे कंद वेगवगेळ्या भागातील सरदारांकडे दिले. यातच खानदेशातील रावेर तालुका व जामनेर तालुक्यात शेदुर्णी मधील काही सैनिक होते. त्यांनी आपल्या गावाकडे केळीची लागवड केली.

खानदेशातील काळी माती कसदार आणि सुपीक आहे. “माणूस पेरला तरी उगवून येईन”  अशी म्हण तिथे प्रसिद्ध आहे. या भागात तापी,पूर्णा, गिरणा या नद्यांच्या खोऱ्यात केळी तरारून आली. पुढे ब्रिटीशांनी खानदेशात कापूस आणला. पण विसाव्या शतकात कापूस मागे पडून केळीनेच टिकाव धरला.

आज जळगावच्या केळीला मंदीने ग्रासलंय.

अस्मानी आणि सुलतानी संकटाची टांगती तलवार जळगावच्या केळीवर लटकत असते. मात्र जळगावकर त्याच्याशी लढा देत आजही उभा आहे. शिवरायांचा वारसा सांगणाऱ्या खानदेशी माणसाने आणि खानदेशी केळीने अशा अनेक संकटाना त्याने मात केलीय आणि आपला गोडवा टिकवून ठेवलाय हे नक्की.

हे ही वाच भिडू.

2 COMMENTS

  1. आमच्या जळगांवच्या केळी वर बाकीचे जिल्ज्हा केळी विकतात

  2. Nice…one of many unknown history of our Shivaji Maharaj …..we are very thankful to JANATA RAJA…as banana cultivaturs, eaters, suppliers….. thanks again

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here