झांबरे पाटलांच्या जमिनीवर “शनिवार वाडा” उभा राहिला..?

पुण्याचा शनिवार वाडा. फक्त पुणेकरांचच नव्हे तर अख्या महाराष्ट्राचं अभिमानाचं प्रतिक. एकेकाळी “सात मजली कलसी बंगला” असं शनिवार वाड्याचं वर्णन केलं जायचं. इथं बसूनच पेशव्यांनी पार दिल्लीपर्यन्तचा कारभार हाकला, मराठी मावळ्यांची घोडी अटकेपार पोहचली.

आज या शनिवार वाड्याकडे पाहिलं तर बुलंद असा दिल्ली दरवाजा दिसतो पण आतमध्ये फक्त इतिहासाचे पडके भग्न अवशेष उरलेले आहेत.

हि गोष्ट “वैभवशाली इतिहास असणाऱ्या शनिवारवाड्याची.”

बाळाजी विश्वनाथ भट हे साताऱ्याच्या छत्रपती शाहू महाराजांनी नेमलेले पहिले पेशवे. ते सासवडवरून राज्यकारभार सांभाळायचे. स्वराज्याची घडी बसवता बसवता त्यांच अकाली निधन झालं. त्यांच्यानंतर त्यांचा कर्तबगार मुलगा पहिला बाजीराव याच्या हाती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे दिली. अवघ्या वीस वर्षाच्या बाजीरावाला पेशवा बनवण्यास इतर सरदारांचा विरोध होता पण शाहू राजांना बाजीरावाची धडाडी माहित होती.

श्रीमंत बाजीराव सुद्धा सासवडमध्ये बसून राज्य हाकू लागले. त्यावेळी सासवडला पाण्याचे दुर्भिक्ष होते. पेशव्यांना वंशपरंपरागत पुण्याची जहागीर चालत आली होती.

छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्याचे बाजीरावास आकर्षण होते. उत्तम हवामान, मुबलक पाणी, सासवड पेक्षा मोठे म्हणून आपली राजधानी पुण्याला हलवण्याचा निर्णय तरुण पेशव्याने घेतला. यासाठी आपले पुण्याचे कारभारी बापुजी श्रीपत यांना पत्र धाडले,

“पुनियात राहावे लागते करिता राहते घर व सदर सोपा व कारकुनाचे घर कोटात तयार करावे.”

शनिवार वाडयाची जागा कशी ठरली याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते.

“पेशवा बाजीराव मुठानदीच्या काठी घोड्यावरून जात होते. त्यावेळी त्यांना तिथे एक ससा शिकारी कुत्र्याचा पाठलाग करत आहे असे दृश्य दिसले. आश्चर्याने हे पाहणाऱ्या पेशव्यांनी या जागी काही तरी विलक्षण आहे याची खुणगाठ मनाशी बांधली आणि वाडा इथेच बांधायचा असे ठरवले.”

मुठा नदीकाठची मुर्तजाबाद पेठेची जागा झांबरे पाटलांकडून विकत घेण्यात आल्याच सांगण्यात येतं.  शिवाजी महाराजांचे बालपण गेलेला लाल महाल इथून जवळच होता. लाल महालासाठीची जागा देखील झांबरे पाटलांकडूनच विकत घेण्यात आली होती. शहाजी महाराजांनी १६३६ मध्ये झांबरे पाटलांकडून जागा विकत घेतली होती.

१० जानेवारी १७३०, माघ शु.३ शके १६५१ या जागेचे भूमिपूजन आणि विधिवत पायाभरणी झाली.

पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पाच्या देखरेखीखाली दुमजली चौसोपी वाडा उभा राहू लागला. शिवरामकृष्ण लिमये यांनी या वाड्याची आखणी केली होती. आज जी आपल्याला नऊ बुरुजांची तटबंदी दिसते ती तेव्हा बांधलेली नाही. छत्रपती शाहुनी परवानगी नाकारल्यामुळे वाड्याचं तटाचं काम अर्धवट राहिलं. ते पुढं बाजीरावांचे सुपुत्र बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवा यांनी पूर्ण केले.

दोन वर्षात वाडा उभा राहिला. सन २२ जानेवारी १७३२ ला वास्तुशांत करून पेशवे बाजीराव आपल्या कुटुंबकबिल्यासह वाड्यात राहायला आले. वाड्याचे नाव ठेवण्यात आले शनिवार वाडा. वाड्याच्या बांधकामाला १६,११० रुपये इतका खर्च आल्याच पेशव्यांच्या दफ्तरी नोंद आहे.

बाजीराव पेशवेंच्या काळात मोठमोठ्या मोहिमा आखण्यात आल्या आणि मारण्यात ही आल्या. उत्तरेत मराठी सत्तेची धाक निर्माण झाली.

बाजीरावांच्या नंतर नानासाहेब पेशव्यांनी पेशवाईच्या वैभवाचा कळस अनुभवला. याच पेशव्यांच्या कारकिर्दीत रघुनाथराव मराठी सत्तेचा झेंडा अटकेपार गाडून आले. या विजयाबरोबरच पानिपतचा दुःखद पराभव सुद्धा नानासाहेब पेशव्याच्या कारकिर्दीतच शनिवारवाड्याने बघितला.

नानासाहेब पेशव्यांनी शनिवारवाड्याचा सुप्रसिद्ध दिल्ली दरवाजा उभारला. वेगवेगळे महाल उभारले. त्यांच्यानंतर आलेल्या प्रत्येक पेशव्याने या वाड्याच्या सौंदर्यात भरच घातली.

शनिवारवाड्याचा मुख्य प्रासाद सहा मजली होता. येथे उभे राहून श्रीमंत माधवराव पेशवे पर्वतीच्या मंदिराचा देखावा पहात. इथून त्याकाळच्या पूर्ण पुणे शहरावर नजर ठेवता येत असे. गणपती रंग महाल इथे दरबार भरायचा. याशिवाय आरसे महाल, नाचाचा दिवाणखाना, हस्तिदंती महाल, नारायणरावाचा महाल, रघुनाथ रावांचा दिवाणखाना अशा अनेक देखण्या वास्तू होत्या. गणपती रंग महालच्या सौंदर्याचे वर्णन इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहून ठेवले आहेत.

पेशव्यांच्या या राजवाड्याचे प्रमुख आकर्षण होते इथले कारंजे. युरोपमधल्या रोमचा राजवाडा सोडला तर अशी उद्याने आणि कारंजे कुठेच नव्हते. या कारंजाची निर्मिती अतिशय कल्पकतेने आणि कलात्मकरित्या करण्यात आली होती.

यातला सर्वात प्रसिद्ध होता हजारी कारंजा. सोळा कमलदले आणि त्याच्यावर बसवलेल्या १९६ तोट्यामधून हा कारंजा उडत असे. अनेक राजेमहाराजे खास हा अविष्कार पाहण्यासाठी थांबायचे.

नाना फडणीसांनी सवाई माधवराव पेशव्यासाठी हे कारंजे आणि मेघडंबरी ही इमारत उभारली होती. पेशव्यांच्या या प्रासादात त्याकाळात हजारो लोकांची उठबस होती. शेकडो लोकांच्या पंगती उठत होत्या. लाखोंचा दानधर्म चालायचा. शनिवारवाड्याच्या शाही श्रीमंतीची चर्चा देशभर होती.

दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठी सत्ता इंग्रजांकडून पराभूत झाली. दिल्लीदरवाज्यावरचा भगवा उतरवण्यात आला आणि त्या जागी युनियन जॅक झळकू लागला. इंग्रजांना या पेशव्यांच्या वाड्याबद्दल कोणतीही आस्था नव्हती. असला तर रागच होता. त्यांनी शनिवारवाड्याची कोणतीही देखभाल घेतली नाही.

२१ ऑक्टोबर १८२८ रोजी शनिवार वाड्याला महाभीषण आग लागली. कोणीही ही आग विझवण्याचा प्रयत्न केला नाही. सात दिवस आगीत वाडा धुमसत होता. मराठी साम्राज्याच्या सन्मानाच्या शेवटच्या आशा अग्नीप्रलयात राख झाल्या होत्या..

हे ही वाच भिडू. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here