संघाची माणसं कशी ओळखावीत…

source- facebook

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् ।

भारत माता की ज्जै !!! वंदे मातरम् !!!

हे भारतमाते आम्ही एक पाप करण्यास चाललो असून या पापातून आम्हास तू अगोदरच अटकपुर्व जामिन दे !!!

आम्ही याचना करतो की माझ्या बंधूना हा लेख सहन होवो. त्यांच्या देशसेवेच्या महान कार्यात थोडासा विरंगुळा म्हणून आम्ही चार शब्दांचा हा मजकूर लिहीत आहोत. सदरहू मजकूर सहन करण्याचं धाडस त्यांना दे !!!

“जिथे माणसाची मती संपते तिथे माणूस देवाचा सहारा घेतो” अस इसवी सनाच्या कोणत्या तरी तिथीस लोकहितवादींनी आपल्या पत्रात नमुद केलेले आहे. उत्तराधुनिक काळात त्या वाक्याचं रुपांतर “जिथे माणसाची मती संपते तिथे तो पवार साहेबांचा हात आणि संघाचा माणूस शोधू लागतो, अस झालेलं आहे.

पैकी पवार साहेबांचा हात कानून के हातसें लंबा असल्याने आम्ही त्याचा नेमकां ठावठिकाणा शोधू शकलो नाही मात्र “अरे हा तर संघाचा माणूसय” या वाक्याच्या मुळाशी जाण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला.

आम्ही प्रचंड चिंतन करुन संघाचा माणूस कसा ओळखावयाचा याचे सर्वसाधारण निकष तयार केले. ते तुमच्या समोर मांडत आहोत. सदरहू भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा हि विनंती !!!

 

(Photo/Aijaz Rahi)

१) तुमचा दूरचा मामा, दूरचा काका, तुमच्या सासऱ्याचा मित्र, तुमच्या मावसबहिणीच्या नवऱ्याचा चुलता वगैरे वगैरे तत्सम नातेसंबध असणारी व्यक्ती तुम्हास भेटून, जेवायला बोलवा हो एकदा करुन बळजबरी तुमच्या घरी जेवायला येवू लागली तर वेळीच ओळखून जा ती व्यक्ती संघाची असू शकते. सदरची व्यक्ती पहिल्या पंगतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय काढून पुढच्या पंगतीपासून कायमस्वरुपी गोलवळकर गुरूंजींचा विषय काढणारी असते.

२) वडिलांचा गावाकडून किंवा बायकोचा माहेरकडून अचानक फोन आला आणि ती व्यक्ती आपणास सांगू लागली, “अरे खूप छान बोलतात रे ते, तू एकदा ऐकून तरी घे.” तर तुम्ही ओळखून जा ती व्यक्ती संघाची असू शकते.

३) हर दूसऱ्या शब्दागणिक नेहरूंनी किती लाखोंचा प्रदेश म्लेच्छांना दिला, तर तिसऱ्या शब्दागणिक ट्रिपल तलाक, दर चौथ्या शब्दागणिक चीनकडून आपण हरलो आणि दर दहाव्या शब्दागणिक म्लेच्छांच खूप लाड केले, अशी वाक्यरचना करणारा मनूष्य पुर्णविराम संपताच ओळखावा, की हा संघाचा असू शकतो.

 

source-facebook

 

४) तुम्ही सदरच्या व्यक्तीपुढे पाच म्हणाला तर नमाज, तीन म्हणाला तर शादी असे उत्तर आले तर ओळखून जावू शकता की हा संघाचा मनूष्य आहे.

५) तुम्हास गर्दीतून एखादा संघाचा व्यक्ती शोधावयाचा असल्यास आम्ही सांगतो ती कृती तुम्ही करु शकता. या गर्दीस ऐकू जाईल या आवाजात तुम्ही जोरात आवाज द्या, “दिवा लावलां देवापाशी” जर गर्दीतून कोणत्याही इसमाने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले, उजेड पडला तुळशीपाशी तर ओळखून जा हा तंत्रज्ञानयुगीय संघाचा इसम आहे.

६) मी कुठे म्हणालो असे…. तुमचे बरोबरच आहे पण….. नाही !! जिथं मोदि चुकतात तिथे चुकच म्हणायला हवं… ते एक छान केलं मोदिंनी… अशी वाक्य अध्येमध्ये पेरणारे गृहस्थ संघाचे असण्याची शक्यता असते.

) आणि सर्वात शेवटी म्हणजे मोदि चुकत आहेत पण इंदिरा गांधीनी आणिबाणी लावून चूकचं केलेली अस सांगणारा माणूस पुर्वाश्रमीचा संघीय व सध्या समाजवादी असू शकतो. 

आपण देखील आपलं अगाध ज्ञान देवून आमचं चिंतन वाढवू शकता !!!

ता.क. 

  • संघाच्या माणसांप्रमाणे अंघोळीच्या साबणावरुन विद्यापीठातला कॉम्रेड ओळखणे, ड्रायक्लिनर्सवाल्याकडे जावून राष्ट्रवादीवाल्यांची कपडे अचूक वेचणे, शिवसैनिक आणि भिमसैनिकांचे वर्गीकरण करणं, नवजात कॉंग्रेसी तेरा सेकंदात ओळखणे अशा काही कृप्त्या आम्ही आपणासमोर सादर करणार आहोत. तोपर्यन्त आपल्या भावना शमवाव्यात ही राजकिय विनंती. कारण की प्रत्येकाचे दिवस येणार आहेत.
  • लेखन व लेखक पुर्णत: काल्पनिक अाहे. शोधायचा प्रयत्न करु नये. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here