हैदराबादेतील रोडला डोनाल्ड ट्रंप यांच्या मुलीचं नांव का देण्यात आलंय …?

 

हैदराबादेतील एका गावातील नागरिकांनी सरकार आणि प्रशासन यांच्या विरोधातील असंतोष व्यक्त करण्यासाठी ‘गांधीगिरी’चा अनोखा मार्ग अवलंबलाय. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या डागडुजीचे काम या गावातील नागरिकांनी श्रमदानातून पूर्ण केलं आणि रस्त्याला चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची कन्या इवांका ट्रंप आणि स्थानिक लोकप्रतिनिधी केटीआर यांचं नांव दिलंय. जाणून घ्या नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि रस्त्याला इवांका ट्रंप यांचं नांव का देण्यात आलंय…

नेमकं प्रकरण काय आहे..?

हैदराबादजवळ मॅरेडपल्ली नावाचं एक गांव आहे. हे गांव हैद्राबाद महापालिकेच्या हद्दीत येतं. गावातून जाणाऱ्या २०० मीटर रस्ताच्या डागडुजीचं काम गेल्या अनेक  दिवसापासून प्रलंबित होतं. गावकऱ्यांनी यासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडे बऱ्याचवेळा  तक्रारी केल्या होत्या, पण प्रशासनाकडून त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत होतं. कामासाठी वारंवार पाठपुरावा करूनही ते होत नसल्याने चिडलेल्या गावकऱ्यांनी मग श्रमदानातून हे काम पूर्ण कारायचा निर्णय घेतला. गावातील साधारणतः ५० लोकं एकत्र आले, रस्त्याच्या कामासाठी म्हणून त्यांनी ४००० रुपये जमवले. सकाळी १० ते दुपारी १२.३० अशा अडीच तासाच्या अवधीत रस्त्यावरील खड्डे बुजवले, आवश्यक तिथं रस्त्याचं रुंदीकरण केलं. फक्त रस्त्याचं काम करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी रस्त्याचं नामकरण देखील केलं. गावकऱ्यांनी रस्त्याला तेलंगणाचे नगर प्रशासन आणि ग्रामीण विकास मंत्री ‘कालवकुंतला तराका रामा राव’ अर्थात केटीआर आणि डोनाल्ड ट्रंप यांच्या कन्या इवांका ट्रंप यांचं नांव दिलं. रस्ता ‘केटीआर-इवांका ट्रंप रोड’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

इवांका ट्रंप आणि केटीआर यांचंच नाव का..?

नोव्हेंबर २०१७ मध्ये एका परिषदेसाठी इवांका ट्रंप हैदराबादेत आल्या होत्या. इवांका ट्रंप यांचं हैदराबादेत जंगी स्वागत करण्यात आलं. शिवाय त्या हैदराबादेतील ज्या रस्त्यावरून प्रवास करणार होत्या त्या रस्त्यांचं रुपडं एका रात्रीत पालटलं.  संबंधित रस्त्यावरील ६००० भिकाऱ्यांना रस्त्यावरून हटवण्यात आलं. तेलंगणाचे नगर प्रशासन आणि ग्रामीण विकास मंत्री केटीआर यांनी स्वतः लक्ष घालून कोट्यावधी रुपये खर्च करून या रस्त्यांचं नुतनीकरण केलं. इवांका ट्रंप आल्या आणि गेल्या.

केवळ इवांका ट्रंप यांच्या दौऱ्याने गरज नसलेल्या रस्त्यांवरही लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला, पण आपण इतक्या दिवसांपासून पाठपुरावा करूनही आपल्या रस्त्याचं काम होत नसल्याने मॅरेडपल्ली गावातील लोकांनी एक अभिनव कल्पना लढवली. त्यांनी थेट इवांका ट्रंप यांना भेटीचं आवाहन केलं. इवांका ट्रंप काही आल्या नाहीत आणि प्रशासनही लक्ष द्यायला तयार नाही, म्हणून मग गावकऱ्यांनी स्वतःच रस्त्याच काम पूर्ण केलं आणि त्याला इवांका ट्रंप आणि केटीआर यांचं नांव दिलं. रस्त्याचं काम सुरु असतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर उपलब्ध आहे, त्यात गावकरी काम करताना दिसताहेत. सोबतच हातात पोस्टर घेऊन उभा असलेली एक व्यक्ती देखील बघायला मिळते. पोस्टरवर लिहिलेलं आहे की, “ना या रस्त्यावर इवांका ट्रम्प आल्या, ना सरकारने रस्त्याच्या डागडुजीचं काम केलं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here