शस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी आले.

नागनाथ नायकवडी आणि जी.डी. बापू लाड हे दोघे म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांचे दोन सेनापतीच. देशासाठी प्राणांची बाजी लावण्यास तयार असलेल्या शेकडो तरुणांच्या फौजेच्या माध्यमातून त्यांनी जनांदोलनाची उभारणी केली. तासगावच्या मामलेदार कचेरीवर ८ हजार लोकांचा मोर्चा गेला आणि मामलेदाराला गांधी टोपी घालून कचेरीवर तिरंगा फडकवण्यात आला.

जनतेच्या या रेट्यापुढे प्रशासन हतबल झाले. तासगावचा विजय मोठा होता. इस्लामपूरच्या कचेरीवरदेखील आठ सप्टेंबरला चार हजारांचा जमाव चाल करून गेला. कचेरीवर तिरंगा फडकावणे एवढाच त्यांचा उद्देश होता पण  बिथरलेल्या इंग्रज सरकारने पोलिसांना गोळीबाराचे आदेश दिले .

शांततेच्या मार्गाने निदर्शने करणाऱ्या  जमावावर पोलिसांनी बेछूट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात २ क्रांतिकारक शहीद झाले तर इतर अनेक जण जखमी झाले.चार हजारांचा जमाव बंदुकीच्या गोळ्यांसमोर टिकणं शक्यच नव्हतं. काही वेळेतच जमाव पांगला.

नागनाथ अण्णा मात्र या घटनेने अत्यंत व्यथित झाले.

आपण निशस्त्र आणि सरकारकडे बंदुका हे असमान युद्ध त्यांनी नाकारलं. बंदुकीच्या गोळीला गोळीनेच उत्तर द्यायचं या धारणेतून  पुढच्या लढाईसाठी बंदुकांची गरज त्यांच्या लक्षात आली. नागनाथ अण्णांनी शपथ घेतली की,

“आता परत येईल ते शस्त्र घेऊनच…!”

कोल्हापुरातील  मित्राच्या मामाकडे बंदूक  मिळू शकते असं ते ऐकून होते. त्यांनी सरळ कोल्हापूरचा रस्ता धरला आणि मित्राला बंदुकीसाठी गळ घातली. मित्राने तयारी दर्शविल्यानंतर दोघेही बंदूक मिळविण्यासाठी मामाच्या गावी गडहिंग्लजला जाऊन धडकले. परंतु मामाकडे बंदूक नव्हती.

राष्ट्रीय कार्यासाठी बंदूक लागणार असल्याने मामांना देखील नकार देताना वाईट वाटलं पण त्यांनीच पुढचा रस्ता दाखवला. आपल्या मेव्हण्याकडे बंदूक मिळू शकेल असं त्यांनी सांगितलं. अण्णांना घेऊन पायीच मेव्हण्याच्या घराच्या दिशेने निघाले. परंतु तिथे पोहचून देखील निराशाच हाती लागली. मामांच्या मेव्हण्याने बंदूक देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.

अण्णा निराश झाले परंतु ते काही एवढ्याने हार मानणाऱ्यातले नव्हते.

बंदुकीच्या शोधात त्यांनी थेट गोवा गाठायचा निर्णय घेतला.  गोव्याच्या दिशेने जात असताना  बांद्याजवळ एका हॉटेलात चहा पिताना त्यांच्या कानावर ‘बंदूक’  हा शब्द पडला. बाजूच्याच टेबलवर दोघे जण चहा पित होते. थोडासा अंदाज घेऊन अण्णा त्या टेबलापाशी गेले. टेबलावरील इसमांना आपली ओळख सांगितली आणि राष्ट्रीय कार्यासाठी आपल्याला बंदूक हवी आहे असं देखील सांगितलं. आपल्याला बंदूक कुठे मिळू शकेल याची त्यांच्ब्याकडे चौकशी केली. त्या दोघांपैकी एक इसम अण्णांच्या शस्त्र मिळवण्याच्या उद्देशाने प्रभावीत झाला. महादेव शेट्टी त्या इसमाचं नांव. त्यानेच अण्णांची ओळख बाळ मणेरकर यांच्याशी करून दिली.

गोवा त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. पोर्तुगीज सरकारात हत्यारांची तस्करी मोठ्या प्रमाणावर चालत असे. बाळ मनेरकारांचे मेव्हणे बापू नार्वेकर हे देखील शस्त्रांच्या तस्करीत होते. अण्णांनी नार्वेकरांना गाठलं आणि त्यांच्याकडून २ इटालियन बनावटीचे रिवाल्वर विकत घेतले आणि पोर्तुगीज गोवा सोडला. गोवा हा त्यावेळी सीमावर्ती भाग असल्याने तिथे पोलिसांचा  मोठ्या प्रमाणात राबता असे. त्यामुळे मुख्य रस्ता न पकडता नागनाथ अण्णा डोंगरदऱ्या मार्गे एका वाटाड्याच्या मदतीने भारतीय हद्दीत पोहोचले. शस्त्र मिळविण्याची शपथ घेऊन घर सोडलेले अण्णा तब्बल दीड महिन्यांच्या कालावधीनंतर बंदूक घेऊन घरी पोहोचले.

पुढे साताऱ्यात स्थापण्यात आलेल्या प्रतिसरकारच्या माध्यमातून इंग्रज सरकारला जरब बसवली गेली. एक यशस्वी समांतर सरकार साताऱ्यात स्थापल्यानंतर सरकारच्या अंमलबजावणीसाठी तुफान सेना उभारण्यात आली. या सेनेमध्ये साधारणतः ५००० सैनिकांचा समावेश होता.

अर्थातच सेनेसाठी शस्त्रास्त्रे देखील आवश्यक होती पण तो प्रश्न बाळ मनेरकर बापू नार्वेकर यांच्या बरोबरच्या संबंधातून केव्हाच कायमचा सुटला होता. नागनाथ अण्णा, जी. डी. बापू राजमती पाटील आणि इतर क्रांतिकारक लोक याच मार्गाने गोव्याहून हजारो शस्त्रे आणू लागली. प्रतिसरकारला कधीच शस्त्रास्त्रांचा तुटवडा भासला नाही.

नागनाथ अण्णांनी बनवलेली ही नाती अशाप्रकारे प्रतिसरकारच्या कामी आली. केवळआपल्या जिद्दीच्या जोरावर प्रचंड अशा इंग्रज सरकारलाडोक्यावर घेणाऱ्या क्रांतिवीर नागनाथअण्णा यांच्या जयंती निमित्त त्यांना मानाचा मुजरा !

हे ही वाच भिडू. 

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here