मराठी साहित्यविश्वात दलित साहित्याला पायवाट निर्माण करून देणारा लेखक !

 

काही लोकं जन्म घेतात तेच मुळी आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणांनी जग बदलवून टाकण्यासाठी. मराठी साहित्य विश्वाविषयी लिहिता बोलताना पदमश्री दया पवार यांच्याविषयी असंच म्हंटलं जाऊ शकतं.

१९७८ साली दया पवार यांचं ‘बलुतं’ हे आत्मकथन प्रकाशित झालं आणि मराठी साहित्यविश्व ढवळून निघालं. मराठी साहित्यविश्वात दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण करून देण्याचा मान निर्विवादपणे ‘बलुतं’च्या निमित्ताने दया पवार यांच्याकडे जातो.

‘बलुतं’ ही जित्या-जागत्या संघर्षाची कहाणी होती.

आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि लेखक म्हणून केलेल्या संघर्षाला दया  पवारांनी ‘बलुतं’च्या माध्यमातून शब्दरूप दिलं आणि त्यांच्या याच आत्मकथनाने दलित समाजाला आत्मभान दिलं.

समाजात ‘दलित’ ही ओळख घेऊन जगणं आणि त्यासोबत येणारे अपमानाचे घोट पीत संघर्षाची वाट चालत राहणं किती आव्हानात्मक असून शकतं, याची कल्पना सुद्धा करता येणार नाही इतक्या विदारक परिस्थितीची जाण आपल्याला बलुतं करून देतं.

‘बलुतं’ फक्त मराठी साहित्यविश्वातच चर्चिलं गेलं असं नाही तर अनेक भारतीय भाषांसह इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या भाषांमध्ये देखील ‘बलुतं’चा अनुवाद झाला. ‘बलुतं’नंतरच हिंदी साहित्याने देखील मराठीतील दलित साहित्याची दखल घेतली. प्रख्यात हिंदी साहित्यिक कमलेश्वर यांनी ‘सारिका’ या हिंदी पत्रिकेत ‘मराठी दलित लेखन’ विशेषांक काढला.

भास्कर चंदावरकर यांनी १९८२ साली ‘बलुतं’वरच ‘अत्याचार’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली. सतीश पुळेकर आणि विभा जकातदार हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाची दखल घेण्यात आली.

दगडू मारुती पवार अर्थात दया पवार यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव या छोट्याशा खेड्यात झाला होता. अतिशय खडतर परिस्थितीचा सामना करत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. शिक्षण पूर्ण करताना देखील त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता.

‘कोंडवाडा’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होता. ‘बाई मी धरण धरण बांधिते, माझं मरण मरण कांडीते’ तर खूप गाजली. ‘बलुतं’ला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठीचा पुरस्कार देखील मिळाला. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बाबासाहेब’ हा चित्रपट देखील त्यांनी लिहिला होता. अरुण साधू हे या चित्रपटाचे सहलेखक होते.

२० सप्टेबर १९९६ रोजी दया पवार यांचं निधन झालं.

१९७८ साली प्रकाशित झालेल्या ‘बलुतं’ला यावर्षी ४० वर्षे पूर्ण होताहेत. त्यानिमित्ताने ‘पदमश्री दया पवार प्रतिष्ठान’मार्फत ‘बलुतंची चाळीशी’ साजरी करण्यात येतेय. येत्या २० सप्टेबर रोजी म्हणजेच दया पवारांच्या स्मृतीदिनी हा कार्यक्रम पार पडणार आहे.

हे ही वाच भिडू