दुर्देवाने आज भारताच्या पहिल्या सुपरस्टार क्रिकेटरला कितीजण ओळखतात हा प्रश्न पडतो.

ब्रिटीश लेखक नेव्हिल कार्डस यांनी ज्यांच्याबद्दल ‘द मिडसमर नाईटस ड्रीम ऑफ क्रिकेट’ असं म्हणून ठेवलंय ते महाराजा रणजीत सिंह हे भारतातील पहिले सुपरस्टार क्रिकेटर होते.

रणजीत सिंह यांनाच भारतीय क्रिकेटचे जन्मदाते देखील म्हंटलं जातं. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेटचा हा जन्मदाता, भारतीय संघासाठी एकही सामना खेळला नव्हता. त्यांनी आपलं बहुतांश क्रिकेट इंग्लंडच्या ससेक्स क्लबसाठी खेळलं होतं.

क्रिकेट हे पहिलं प्रेम नव्हतंच

१० सप्टेबर १८७२ रोजी गुजरातमधील नवानगर संस्थानातील राजघराण्यातला त्यांचा जन्म. रणजीत सिंह यांचा जन्म क्रिकेटच्या जन्माच्या फक्त ५ वर्षांपूर्वीचा. क्रिकेटच्या इतिहासातील पहिली कसोटी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान १८७७ साली खेळवली गेली होती.

त्याकाळी फक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्येच क्रिकेट खेळलं जायचं. भारताचा आणि या खेळाचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. असलाच तर तो इतकाच की क्रिकेटच्या  जन्मदात्या इंग्लंडचं भारतावर राज्य होतं आणि हेच गोरे लोक पुढे भारतात क्रिकेट घेऊन येणार होते. जो खेळ भविष्यात भारताचा धर्म वैगेरे बनणार होता.

तर ते असो, रणजीत सिंह यांच्याविषयी सांगायचं तर किशोरवयापर्यंत त्यांना क्रिकेटमध्ये फारसा रस नव्हता. असण्याचा संबंधही नव्हता. सुरुवातीच्या काळात त्यांना टेनिस खूप आवडायचं पण रणजीत सिंह ज्यावेळी आपल्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेले त्यावेळी त्यांना क्रिकेट आवडायला लागलं आणि हळूहळू या खेळात रस निर्माण झाल्याने ते क्रिकेट खेळायला लागले.

इंग्लंडच्या संघातील निवडीला विरोध.  

अल्पावधीतच ते उत्तम क्रिकेट खेळायला लागले आणि त्यांची इंग्लंडच्या ससेक्स क्लबकडून खेळण्यासाठी निवड झाली. इथे क्रिकेट खेळताना त्यांनी अतिशय प्रभावी कामगिरी केली. रणजीत सिंह यांच्या ससेक्ससाठीच्या कामगिरीने प्रभावित होऊन त्यांना इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात स्थान देण्यात यावं अशी मागणी करण्यात येऊ लागली.

१८९६ साली त्यांची इंग्लंडच्या संघासाठी निवड झाली. परंतु याविरोधात काही वंशवादी आवाज देखील उठले. त्यांचा जन्म भारतातील असल्याने त्यांना इंग्लंडच्या संघात स्थान देण्यात येऊ नये,असं मत नोंदवण्यात आलं. त्यामुळे पहिल्या सामन्यासाठीच्या संघातून त्यांना वगळण्यात आलं, मात्र दुसऱ्या सामन्यासाठीच्या संघात मात्र ते निवडले गेले.

पहिल्या सामन्यासाठी संघ निवडण्याचा अधिकार लॉर्ड हॅरीस यांच्याकडे होता. त्यांनीच रणजीत सिंह यांच्या नावाला भारतीय असल्या कारणाने विरोध केला होता. दुसऱ्या सामन्यासाठी संघ निवडण्याचा अधिकार मात्र त्यांच्याकडे नव्हता.

पहिल्याच सामन्यात नोंदवले अनेक विक्रम. 

रणजीत सिंह

इंग्लंडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्यांची संघात निवड झाली होती. या दौऱ्यातील मँचेस्टर येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात त्यांची अंतिम ११ खेळाडूंमध्ये निवड झाली आणि आपल्या पहिल्याच सामन्यात त्यांनी दमदार कामगिरी नोंदवत टीकाकारांची तोंडं बंद केली. त्यांनी पहिल्या डावात ५२ रन्स आणि दुसऱ्या डावात नॉट आउट १५४ रन्स फटकावल्या.

आपल्या या पहिल्याच सामन्यात त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावे केले. इंग्लंडच्या संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा पहिला भारतीय, आपल्या पहिल्याच सामन्यात पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक झळकावणारा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर, पहिल्याच सामन्यात  नॉट आउट शतक झळकावणारा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आणि ओल्ड ट्रँफोर्डच्या मैदनावर १५० पेक्षा अधिक धावा फटकावणारा पहिला क्रिकेटर असे विक्रम त्यांनी आपल्या नावे केले.

वर्णद्वेष आणि वंशभेदामुळे नाही होऊ शकले इंग्लडचे कॅप्टन

इंग्लंड आणि ससेक्ससाठी खेळताना त्यांनी विस्मयकारक कामगिरी नोंदवली. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये  ७२ शतके आणि १०९ फिफ्टीज  ठोकल्या. त्यांची  हीच कामगिरी त्यांना इंग्लंडच्या कॅप्टनपदी बसवण्यासाठी पुरेशी होती परंतु इंग्लंडच्या निवड समितीतील काही वंशवादी आणि वर्णद्वेषी सदस्यांमुळे इंग्लंडचे कर्णधारपद भूषविण्याची रणजीत सिंह यांची इच्छा अपूर्णच राहिली.

१९३३ साली रणजीत सिंह यांचं निधन झालं. भारतीय क्रिकेटच्या जन्मदात्या खेळाडूच्या सन्मानार्थ देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्वाच्या स्पर्धेला ‘रणजी ट्रॉफी’ असं नाव देण्यात आलं. १९३४ साली सुरु झालेली ही स्पर्धा पूर्वी ‘द क्रिकेट चॅम्पिअनशिप ऑफ इंडिया’ या नावाने ओळखली जात असे.

हे ही वाच भिडू