सरकारे येतात जातात पण रामविलास पासवानांची मंत्रीपदाची खुर्ची हलत नाही.

लालू प्रसाद यादव एका सभेत असं म्हणाले की मी राम विलास पासवान सारखा हवामान तज्ञ मी जगात पाहिलेला नाही. लालू यादव यांच्या सारख्या मुरलेला राजकारणी असं म्हणतो त्याचे कारण असे आहे की सरकार कोणाचे ही असो राम विलास मंत्री असतातच.

१९८९ पासून ते आत्ता पर्यंत एखाद अपवाद सोडला तर राम विलास सलग केंद्रीय मंत्री आहेत. ही किमया त्यांनी त्यांच्या राजकीय हवामानाचा अचूक अंदाज बांधून सध्या केली आहे. लोकसभा निवडणुका सुरु होण्याच्या आधीच पासवान वाऱ्याचा अंदाज घेतात. कोणाचे सरकार बसू शकते याचं मूल्यमापन करून घेतात आणि त्या पार्टी बरोबर युती करून मोकळे होतात. त्यांचा राजकीय प्रवास पण अनेक अर्थानी वेगळा आहे.

पासवान यांचा जन्म ५ जुलै १९४६ चा आहे. पूर्वी बिहार मधल्या खगरिया जिल्ह्यातील एका लहानश्या गावातला. एका दलित कुटुंबात जन्मलेले पासवान बालपणापासूनच अभ्यासात हुशार होते. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बिहारची लोकसेवा परीक्षा दिली. त्यातून त्यांची निवड DSP – deputy superintendent of police म्हणून झाली, पण त्यांनी ते पद न स्वीकारता राजकारणात येण्याचा निर्णय घेतला.

पासवान यांनी संयुक्त सोशालिस्ट पार्टी जॉईन केली. तेव्हा पासून त्यांनी अल्पसंख्यांकांचा नेता म्हणून स्वतःला जनते समोर ठेवले. मग त्यात दलित तर होतेच पण गरीब हिंदू आणि मुस्लीम ही होते.

सन १९६९ साली त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकली. १९७० मध्ये या युवा नेत्याला पार्टीचा बिहार राज्याचा  जॉइन्ट   सेक्रेटरी  बनवले गेले. चारच वर्षात ते “लोक दल पक्षाचे” राज्याचे जनरल सेक्रेटरी बनले. याच काळात पासवान जय प्रकाश नारायण यांच्या संपर्कात आले. त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ लागले. पासवान आणीबाणीच्या विरोधातील मोहिमेत सक्रीय होते . याच काळात त्यांना तुरुंवास ही झाला. १९७७ ला ते जेल मधुन  बाहेर आले आणि इंदिरा विरोधी लाटेत थेट लोकसभेला  निवडून आले. हाजीपुर मतदारसंघातून जनता पार्टीच्या तिकिटावर  ते  विक्रमी मतांनी निवडून आले.

१९८० साली ते परत निवडून आले व त्यांनी दलित सेनेंची स्थापना केली आणि दलितांसाठी हिरहिरीने काम करू लागले.१९८९ साली ते परत हाजीपुर मधून नवव्या लोकसभेत निवडून गेले. तत्कालीन व्ही.पी.सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पहिल्यांदा मंत्री बनवण्यात आले. १९९१ ला कॉंग्रेस परत सत्तेत आली नरसिंह राव पंतप्रधान झाले या मंत्रिमंडळात मात्र पासवान नव्हते. १९९६ ला जनता पार्टी सत्तेत आली आणि  देवेगौडा यांच्या मंत्रिमंडळात पासवान यांना रेल्वे मंत्रालय देण्यात आले. पुढे एकाच वर्षात सरकार अल्पमतात येऊन पडले.

२००० साली त्यांनी स्वतःचा पक्ष काढला लोक जनशक्ती पार्टी तेव्हा पासून ते याच पक्षात आहेत.

राजकारण या काळात स्थित्यंतरातून जात होते पासवानांन  सारख्या मुरलेल्या राजकारणाने वाऱ्याची दिशा ओळखली अणि ते एन.डी.ए.मध्ये सामील झाले. एन.डी.ए ने  निवडणूक जिंकली अटल बिहारी वाजपायी पंतप्रधान झाले पासवान यांना दूरसंचार मंत्री करण्यात आले. २००४ची निवडणूक तोंडावर आली.

२००२ सालच्या गुजरात दंगलीं नंतर देशातील वातारण ढवळून निघाले होते. एकंदरीत वातावरण कॉंग्रेसच्या बाजूने होते. भाजपचं शायनिंग इंडिया पण गंडलं होतं. पासवान यांनी वातावरण लक्षात घेत लगेच पलटी मारली आणि यु.पी.ए  मध्ये आले. मनमोहन सिंग सरकार मध्ये परत मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. संपूर्ण पाच वर्ष त्यांनी मंत्रिपद भोगले.

प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या समवेत रामविलास पासवान इफ्तार पार्टी मध्ये

२००९ ला मात्र पासवान यांचा राजकीय अंदाज पूर्णपणे चुकला त्यांनी यु.पी.ए. सोडून लालूंना जवळ केले आणि स्वतःची हाजीपुरची सीट सुद्धा ते वाचवू शकले नाहीत. पुढील पाच वर्ष पासवान यांना सत्ते पासून वंचित राहावे लागले.

२०१४ ला देशभर मोदी लाट होती इतके दिवस सत्तेच्या उभे पासून दूर राहिलेले पासवान अस्वस्थ होते ते आयत्या लाटेवर स्वार झाले नसते तरच नवल. पासवान परत एन.डी.ए मध्ये आले त्यांनी स्वतःच्या सहा जागा निवडून ही आणल्या. त्यांना सार्वजनिक वितरण मंत्रालय मोदींनी दिले.

२०१९ ची निवडणूक जवळ आणि पासवान परत चालबिचल करू लागले. त्यांनी भाजप विरोधी वक्तव्य केली पण यावेळेस मात्र साथ सोडली नाही.  नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मोदींनी दमदार पुनरागमन केले आहे . पासवान या मंत्रिमंडळात सुद्धा मंत्री आहेत त्यांचे खाते ही तेच आहे.

खुद्द भाजपच्या मोठ्या मोठ्या मंत्र्यांची गच्छन्ती मोदी आणि अमित शहा जोडगोळीने केली पण पासवान आपल्या खुर्चीवर स्थिर राहिले. सत्तासुंदरीचा त्यांच्यावरचा लोभ कमी झालेला नाही आहे.

पासवान यांनी  मागास आणि अल्पसंख्यांक समाजाचा नेता म्हणून स्वतःची एक प्रतिमा बनवली आहे. त्यांना राजकीय वातावरणाची समाज तर आहेच त्याच बरोबर सत्तेत येऊ पाहणाऱ्या पक्षांना त्यांच्या या प्रतिमेचा निवडणुकीत  फायदा होतो आणि त्यांना बरोबर घेतले जाते.

पासवानांना स्वतःचं  उपद्र्व्य मूल्य अचूक माहित आहे ते त्याचा अचूक उपयोग करून घेतात. ते सर्वांशी संबंध ठेवून असतात राजकीय हवेचा अंदाज येताच ते पलटी मारत असतात. उद्या कॉंग्रेस सत्तेत आली आणि पासवान मंत्रिमंडळात दिसले तर भिडूनों आश्चर्य वाटू घेऊ नका.

हे ही वाच भिडू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here