द्रविड त्या दिवशी लॉर्डसवरची पैज हरला पण १५ वर्षांनी का होईना त्याने जिंकून दाखवलंचं!

गेली दोनशे वर्षे झाली लंडनच्या लॉर्डस स्टेडियमवर क्रिकेट खेळल जात पण अजूनही तिथलं आकर्षण जराही कमी झालेलं नाही.  खर तर लॉर्डस हे फक्त एक मैदान नाही तर क्रिकेटचा चालता बोलता इतिहास आहे. इथूनच एके काळी क्रिकेटचा कारभार एमसीसी क्लब तर्फे सांभाळला जायचा, तिथे एक म्युजियम आहे, लायब्ररी आहे. या ग्राउंडवरच्या प्रत्येक गोष्टीमागे काहीना काही ऐतिहासिक वारसा आहे,

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मैदानावर एकदा तरी खेळायला मिळायला हव आणि तिथ जमलेल्या कडवट इंग्लिश प्रेक्षकांच्यासमोर आपली बेस्ट कामगिरी करून दाखवावी हे अल्मोस्ट प्रत्येक खेळाडूच स्वप्न असते.

आणि जर आपलं पदार्पणचं लॉर्डसवर होणार असेल तर?

१९९६ सालच्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये अनेकांना हा चान्स मिळाला होता. यामध्ये होते द ग्रेट सौरव गांगुली, राहुल द्रविड, वेंकटेश प्रसाद, पारस म्हांब्रे, सुनील जोशी, विक्रम राठोड.

नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकप मध्ये सेमी फायनलमध्ये भारताची बरीच फजिती झाली होती. यामुळे चार वर्षाने इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकप ची तयारी आत्ता पासूनचं सुरु झाली होती. इंग्लिश कंडीशनची ओळख व्हावी म्हणून अनेक जुन्या खेळाडूना डच्चू देऊन नवे खेळाडू नेण्यात आले होते. फॉर्ममध्ये नसलेले संजय मांजरेकर, सलील अंकोला असे खेळाडू सुद्धा आपल्याला सिद्ध करण्यासाठी इंग्लंडला आले होते.

बर्मिंगहॅमला पहिली टेस्ट झाली तेव्हा यातल्या जोशी, प्रसाद, राठोड आणि म्हांब्रे या चार जणांना खेळण्याची संधी मिळाली. त्यातला फक्त वेंकटेश प्रसाद चांगला खेळला. त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात दोन विकेट घेतल्या. बाकी सचिन ने शतक मारले, इतरांनी मैदानात फक्त हजेरी लावली वगैरे वगैरे गोष्टी नेहमीप्रमाणे रीतसर झाल्या. भारत मॅच हरला.

पुढची मॅच लॉर्डस वर होणार होती. राखीव मध्ये बसलेल्या द्रविड आणि गांगुलीच्या आशा जागृत झाल्या आता आपल्याला चान्स मिळणार. झालंही तसच. संजय मांजरेकरला कट्ट्यावर बसवण्यात आलं, जोशीची सुद्धा सुट्टी झाली आणि त्यांच्या जागी हे दोघे आले.खरं तर द्रविड आणि गांगुली हे दोघेही तो पर्यंत डोमेस्टीक क्रिकेट मध्ये दिग्गज बनलेले होते. त्यांच्यात टॅलेंट आहे पण अजून तो आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध करता आल नव्हता.

गांगुलीला तर वनडे साठी १९९२ मध्येच चान्स मिळालेला पण एका सिरीज मध्ये त्याला बाहेर बसवण्यात आले. त्याने सिनियरला आपण राजघराण्यातला आहे हे कारण सांगून मैदानात पाण्याच्या बॉटल देण्यास नकार दिला असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. कारण काहीही असो गांगुलीला कटाक्षाने ५ वर्ष बाहेर बसवण्यात आले होते. त्याला आत्ता शेवटचा मौका मिळाला होता.द्रविडच्या बाबतीत वेगळेच घडले होते. त्याला या पूर्वी वनडे मध्ये संधी मिळाली होती पण तो खूप स्लो खेळतो अशी कारणे देऊन त्याला बाहेर केला होता.

आता या दोघांच ही कसोटी मधून पदार्पण होत होतं आणि तेही थेट लॉर्डस वर. च्यातल्या कोणालाही रात्री झोप लागली नसेल. द्रविड आणि वेंकटेश प्रसाद उद्याच्या सामन्यात काय होणार याबद्दल गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता त्यांच्यात लॉर्डस ऑनर्स बोर्डबद्दल विषय निघाला.

लॉर्डस ऑनर्स बोर्ड हे तिथल्या ड्रेसिंग रूममधलं एक बोर्ड आहे. तिथे १८८४ पासून आत्तापर्यंत ज्या बॅट्समनने लॉर्डसवर शतक ठोकल आहे किंवा ज्या बॉलरनी तिथे एका डावात ५ विकेट पटकावले आहेत अशांची नावे लिहून ठेवण्यात आली आहेत. पहिल्यांदाच तिथे खेळणार असल्यामुळे द्रविड आणि प्रसाद या दोघानाही खूप उत्सुकता होती.

भारतातून आता पर्यंत तिथे विनू मंकड, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, कपिल देव, बिष्णसिंग बेदी, चन्द्रशेखर अशा अनेक दिग्गज लोकांची नावे तिथे झळकली होती. आपल सुद्धा नाव तिथ यावं अशी या दोघांची ही अपेक्षा असणे चुकीच नव्हत. तेव्हा गमती गमतीमध्ये द्रविड आणि प्रसादने एकमेकासोबत पैज लावली की आपल नाव त्या बोर्ड वर झळकवून दाखवायचं.

दुसऱ्या दिवशी सामना सुरु झाला. भारताची पहिली बॉलिंग होती. इंग्लंडने घरच्या मैदानात सहज बॅटिंग करत ३३४ धावा बनवल्या. श्रीनाथने 3 विकेट घेतल्या आणि त्याच्या जोडीला आलेल्या वेंकटेश प्रसादने द्रविडशी लावलेल्या पैजेला जागून ५ विकेट घेतल्या आणि आपले नाव ओनर्री बोर्डवर फायनल केले.

आता द्रविडचा नंबर होता. भारताची सुरवात नयन मोंगिया आणि राठोड यांनी खराब केली. त्यांनतर गांगुली आला. भरवश्याचा सचिनही यावेळी मोठा स्कोर करू शकला नाही.  सचिनपाठोपाठ अझर, जडेजा वगैरेही लवकर आउट झाले. गांगुलीचा हा पहिलाच सामना होता मात्र एखाद्या अनुभवी खेळाडूप्रमाणे त्याने इनिंग सावरून धरली.

तळातल्या सात नंबरला राहुल द्रविड आला. त्याने गांगुलीला सुंदर साथ दिली. गांगुलीने पदार्पणात लॉर्डसवर शतक ठोकण्याची कामगिरी केली. तो १३१ वर आउट झाला. 

गांगुली आउट झाल्यावर भारताची इनिंग लगेच संपेल अशी सगळ्यांना अपेक्षा होती. पण त्यांना कुठे ठाऊक होते की भारताची भिंत खुंटा गाडून उभी आहे. कुंबळे, श्रीनाथ आणि मग प्रसाद यांना घेऊन द्रविड लढतच राहिला. तब्बल २६७ बॉल खेळून द्रविड ने ९५ धावा बनवल्या पण शतकाला ५ धावा कमी असताना आउट झाला.

मॅच ड्रॉ झाली. अनेक विक्रम मोडले. काही नव्याने बनले. भारतासाठी सगळ्यात चांगली खुशखबर म्हणजे आपल्याला गांगुली, द्रविड , प्रसाद हे हिरे याचं मॅच मुळे सापडले.

पण द्रविड आणि प्रसादच्या पैजेचे काय? प्रसाद ही पैज जिंकला. त्याचं आणि गांगुलीचं नाव आलं पण राहुल द्रविडचं त्या बोर्डवर नाव आलं नाही. राहुलला खूप वाईट वाटलं असेल पण तो नेहमी प्रमाणे काही बोलला नाही. त्याबोर्ड वर नाव येणे म्हणजे तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात असे नाही हे राहुल ला ठाऊक होते.

गावस्कर सचिन, लारा, शेन वॉर्न अशा अनेक दिग्गजांचं नाव त्या बोर्ड वर नाही. आणि अजित आगरकर सारख्या बॉलरचं नाव फलंदाजांच्या यादीत आहे. तरीही राहुलच्या मनात बरीच वर्ष ही जख्म राहिली. त्याला काहीही करून तिथ नाव आणायचंचं होतं.

अखेर तो दिवस उजाडला.

आपल्या कारकीर्दीच्या संध्याकाळी २०११साली राहुलने लॉर्डसवर शतक मारून तिथल्या बोर्डवर आपले नाव कोरले. त्याच दिवशी त्यान प्रसादला फोन केला आणि आपल्या पैजेची आठवण करून दिली. एक वर्तुळ अखेर पूर्ण झालं होतं. पण त्यासाठी पंधरा वर्षे लागली. अखेर संयमाचे दुसरे नाव राहुल द्रविड आहे हेच खरं!

हे ही वाच भिडू.