यशवंतराव चव्हाणांनी देशाला “आयाराम-गयाराम” हा शब्द दिला….

आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरवात झाली. कालच मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. या विस्ताराची चर्चा झाली कारण गेली चार वर्ष विरोधी पक्ष नेते असणारे राधाकृष्ण विखे पाटील सत्ताधारी पक्षात मंत्री झाले. क्षीरसागर यांना देखील मंत्रीपद देण्यात आले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सभागृहाच्या पायऱ्यावर “जय श्री राम आयाराम-गयाराम” अशा घोषणा देत दोन्ही मंत्र्यांना लक्ष्य केलं.

साहजिक निवडणुकांच्या मुहूर्तावर आत्ता प्रत्येक पक्षातील आयाराम-गयाराम यांची संख्या वाढणार आहे, पण विषय असा आहे की हे आयाराम-गयाराम काय भानगडाय. इतिहासत गेलं तर सर्वात पहिला संसदेत पक्षांतर करणाऱ्या नेत्यांसाठी आयाराम-गयाराम हा शब्द यशवंतराव चव्हाणांनी वापरल्याचं दिसून येतं.

सर्वप्रथम तो कुणी वापरला आणि दल-बदलू नेत्यांसाठी वापरला जाणारा हा शब्द इतक्या मोठ्या प्रमाणात कसा रूढ झाला..?

याविषयी मात्र आपल्यापैकी खूप कमी जणांना माहित असण्याची शक्यता आहे. काळजी करू नकात, आम्ही आहोतच की.

तर ‘आयाराम-गयाराम’ हा शब्द ही भारतीय राजकारणाला हरयाणाची देण.

किस्सा आहे १९६७ सालातला.

हरयाणामधील हसनपूर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार गया लाल यांनी एकाच दिवसात ‘काँग्रेस टू नॅशनल फ्रंट व्हाया नॅशनल फ्रंट आणि काँग्रेस’ असा तीन वेळा आपला पक्ष बदलला होता.

हो, आम्ही गंमत नाही करत आहोत. गया लाल यांनी एकाच दिवसात ३ वेळा आपला पक्ष बदलला होता. हा एक नवीनच विक्रम त्यांनी आपल्या नावावर केला होता. राजीव रंजन यांनी राजकारणावरील १००० वस्तुनिष्ठ प्रश्नांचं एक पुस्तक लिहलेलं आहे, त्यात या प्रकरणावरील प्रश्नांचा समावेश आहे.

राजीव रंजन यांच्या पुस्तकातील प्रश्नावली

 

गया लाल हे काँग्रेसचे आमदार. १९६७ मध्ये त्यांनी आधी काँग्रेसमधून बाहेर पडून नॅशनल फ्रंट पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ते परत काँग्रेसमध्ये आले आणि पुन्हा ९ तासाच्या आत त्यांनी नॅशनल फ्रंटचे सदस्यत्व घेतले. या सगळ्या घडामोडी घडल्या एकाच दिवसांत.

गया लाल जेव्हा पहिल्या वेळी नॅशनल फ्रंटमधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये परतले त्यावेळी या घटनेची माहिती प्रसार माध्यमांना देण्यासाठी काँग्रेसचे नेते राव बीरेंद्रसिंग यांनी पत्रकार परिषदचं आयोजन केलं होतं. या पत्रकार परिषदेत राव बीरेंद्रसिंग हे गया लाल यांना घेऊन आले आणि त्यांनी जाहीर केलं की,

गयाराम अब आयाराम हो गये है

राव बीरेंद्रसिंग यांचं पत्रकार परिषदेतील हे विधान दुसऱ्या दिवशीच्या जवळपास सर्वच वृत्तपत्रांची हेडलाईन बनलं. तेव्हापासूनच हरयाणाच्या राजकीय क्षेत्रात हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ लागला.

राष्ट्रीय राजकारणात हा शब्द आणण्याचं श्रेय मात्र यशवंतराव चव्हाणांनाच.

यशवंतराव चव्हाण यांनीच १९६७ साली सर्वप्रथम संसदेत ‘आयाराम-गयाराम’ हा शब्द वापरला. आपल्या राजकीय संकृतीत आयाराम-गयारामांची संख्या वाढत चालली आहे, असं यशवंतराव संसदेत म्हंटले असल्याचं सांगितलं जातं. तिथूनच देशपातळीवर आयाराम-गयाराम हा शब्द फेमस झाला, व तो देशपातळीवर वापरला जावू लागला.

हे ही वाचा – 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here