प्रबोधनकार ठाकरेंनी काड्यापेटी घेतली आणि लग्नाचा मांडव जाळून टाकला.

प्रबोधनकार ठाकरे हे कर्ते समाजसुधारक. कर्ते म्हणजे कसे तर अन्याय दिसला तर भिडभाड न बाळगता ते ठोकून काढायचे. जो विचार मांडायचे त्याच विचारासाठी रस्त्यावर येवून संघर्ष करायचे. फक्त लिहण्यापुरते किंवा बोलण्यापुरते त्यांचे विचार नव्हते. त्यांच्या अशाच एका किस्याचा उल्लेख खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला होता. 

४ डिसेंबर १९८८ साली त्यांनी अकोला येथे भाषण केले होते. या भाषणाची सुरवातच त्यांनी केली होती की, माझी पत्नी म्हणाली थंडी आहे. सोबत स्वेटर घ्या.. माकडटोपी घ्या. पण मंत्रीमंडळात इतकी माकडं असताना माकडटोपी कशाला? 

या भाषणात त्यांनी नेहमीच्या ठाकरे स्टाईलने एकेकाचा पंचनामा करण्यास सुरवात केली. नवबौद्ध समाज, दलित समाज यांच्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करत असताना बाळासाहेब ठाकरे म्हणतात की, हुंडा बंदी पहिल्यांदा माझ्या वडिलांनी महाराष्ट्रात केली आहे.

याच विषयाला पुढे घेवून जाताना ते शारदा विवाहाला प्रबोधनकार ठाकरेंनी कसा विरोध केला होता ते सांगतात, 

ते म्हणतात, 

शारदा विवाह म्हणजे १६ वर्षांची पोरगी आणि ७५ वर्षांचा म्हातारा. त्या वेळी शिवसेना, शिवसैनिक अशा गोष्टी तेव्हा नव्हत्या. एकटा माणूस पण भन्नाट. अन्यायाची चिड भयंकर. 

एकदिवस प्रबोधनकार ठाकरे घरी आले. आईला विचारलं चहा झाला का? 

आई म्हणाली, चहा राहू दे. ते बघा पलीकडे मांडव पडलाय. 

प्रबोधनकार ठाकरे म्हणाले, कसला आहे. लग्नाचा आहे तर लग्नाला मांडव घालतात. 

त्यावर आई म्हणाली, अरे १६ वर्षाच्या पोरगीसोबत ७५ वर्षाचा म्हातारा लग्न करतोय. 

असं जातो म्हणून प्रबोधनकारांनी खिश्यात काडेपेटी टाकली आणि घरातून बाहेर पडले. पाठीमागून आई संभाळून म्हणू लागली पण ते ऐकण्याच्या स्थितीत देखील प्रबोधनकार ठाकरे नव्हते. 

प्रबोधनकार ठाकरे थेट मांडवाजवळ पोहचले. आणि मांडवातील लोकांना म्हणाले कुठाय तो थेरडा?

त्यावर लोकांची विचारलं तुम्ही कोण? 

प्रबोधनकार ठाकरे म्हणाले, मी असेल कोणीही..! तो थेरडा कुठाय? लग्न कस लावतात ते पाहतो. 

लोक विचारू लागले तुमचा संबंध काय आणि प्रबोधकार ठाकरे म्हणत होते पहिला तो थेरडा समोर आणा. मग मी काय करतो ते सांगतो. लोकांनी परत विचारलं काय कराल? पुन्हा प्रश्न ऐकताच प्रबोधनकारांनी खिश्यातून काडेपेटी काढली आणि संपुर्ण मंडप जाळून टाकला. त्यानंतर हे लग्न झालं नाही.

हे ही वाच भिडू.