नेहरूंच्या सांगण्यावरुन वैमानिक बिजू पटनायक इंडोनेशियात घुसले..

ते नेहरूंचे मित्र होते. त्याहून अधिकची ओळख म्हणजे ते थोर स्वातंत्रसेनानी होते. ते ओरिसाचे दोन वेळा मुख्यमंत्री देखील राहिले होते आणि त्याहूनही खास गोष्ट ते वैमानिक होते. ते साधेसुधे वैमानिक नव्हते तर त्यांच्या वैमानिक असण्याचा फायदा भारताला होतं होता. 1947 च्या सुमारास श्रीनगरचे विमानतळावर पाकिस्तानी टोळीवाल्यांनी कब्जा केल्याची बातमी होती. अशा काळात त्यांनी धावपट्टीवर विमान उतरवून शीख रेजिमेंटमधील सैनिकांची सुखरूप सुटका केली होती.

त्यांच नाव होतं बिजयानंदा पटनायक अर्थात बिजू पटनायक. 

राजकारणाच्या इतिहासात ज्याप्रमाणे बिजू पटनायक यांचा उल्लेख केला जातो तसाच उल्लेख युद्धाच्या मैदानात देखील केला जातो. म्हणूनच इंडोनेशिया सरकारने त्यांना भूमिपुत्र किबातासोबतच देशाचा सर्वोच्च नागरी देखील दिला. हा किस्सा त्यांच्या याच साहसाचा.

1948 साल होतं. त्या काळात इंडोनेशियावर डचांच वर्चस्व होतं.

डच कोणत्याही परस्थितीत इंडोनेशियावरील आपला हक्क सोडण्यासाठी तयार नव्हते. पुढे जावून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष झालेले डॉ. सुकार्णो आणि इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यासाठी झटणारे सुल्तान शहरयार हे इडोनेशियात सक्रिय होते. इंडोनेशियातून बाहेर पडून आतंराष्ट्रीय स्तरावर आपल्या मागण्या पोहचवण्यासाठी डॉ. सुकार्णो आणि सुल्तान शहरयार प्रयत्न करत होते. मात्र इंडोनेशियाच्या हवाई आणि समुद्री मार्गावर डच सैनिकांनी पुर्ण वर्चस्व ठेवले होते.

कोणत्याही परस्थितीत इंडोनेशियामधून डॉ. सुकार्णो आणि सुल्तान शहरयार यांना बाहेर आणायला हवं आणि इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याचा जोर वाढवायला हवा अस पंडित नेहरूंच मत होतं. डॉ. सुकार्णो आणि सुल्तान शहरयार यांना इंडोनेशियातून बाहेर काढण्याची हि जबाबदारी नेहरूंनी ज्यांना दिली ते होते बीजू पटनायक. 

1948 मध्ये बीजू पटनायक आपले ओल्ड डिकोटा नावाचे विमान घेवून सिंगापूर मार्गे इंडोनेशियाच्या दिशेने झेपावले. इंडोनेशियाच्या हद्दीत घुसताच डच सैनिकांनी त्यांचे विमान पाडण्यासाठी शक्य त्या गोष्टी केल्या. याच गडबडीत त्यांना आपले विमान जकार्ताच्या जवळील एका भागात उतरावे लागले. या ठिकाणी इंधनाची कमतरता भासली. जपानच्या सैन्याने पुढाकार घेत त्यांच्या विमानासाठी इंधनाची सोय केली. मजल दरमजल करत ते इंडोनेशियाच्या हद्दीत घुसण्यास यशस्वी ठरले.

नेहरूंनी सांगितल्याप्रमाणे ते सोबत येताना डॉ. सुकार्णो आणि सुल्तान शहरयार यांना घेवून भारतात परतले. त्याच रात्री सुल्तान शहरयार, डॉ. सुकार्णो आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यात एक गुप्त बैठक झाली आणि इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले. 

पुढे, इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा झाला आणि डॉ. सुकार्णो हे इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती बनले. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी बिजू पटनायक यांना आपल्या देशाचे नागरिकत्व बहाल केले. सोबतच त्यांना भूमिपुत्र नावाचा किताब देखील देण्यात आला.

इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यास 50 वर्ष पुर्ण झाल्यानंतर बिजू पटनायक यांना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अर्थात ‘बिंताग जसा उताम’ देवून गौरवण्यात आले. आजही बिजू पटनायक यांच्या आठवणी इंडोनेशियाचा नागरिक याच कारणामुळे जपतो.

हे ही वाचा.