सेकदांच्या काही भागात त्यांनी शेअर मार्केटमध्ये हजार कोटींचा घपला केलाय.

बोफोर्स कांड झालं आणि लोकांना कळालं की बोफार्स नावाच्या तोफा आहेत. राफेलच कांड झालं आणि लोकांना कळालं की राफेल नावाची विमान भारत विकत घेणार आहे. म्हणजे कसय कुठतरी काळा डाग असला की लोकांना बघायची सवय लागलेय. कायतरी कांड झालं की लोक बघतात आणि ती गोष्ट नजरेत येते.

आत्ता भारतापुरतं सांगायचं झालं तर नाव खराब असणारी सर्वात सुप्रसिद्ध गोष्ट कुठली तर शेअर मार्केट. आपल्या सारख्या सामान्य आणि पुष्कर श्रोत्रींच्या भाषेत अतिसामान्य नागरिकांना शेअर मार्केट कळालं ते हर्षद मेहता आणि केतन पारेख यांच्या कांडामुळे. चटकन पैसे मिळवण्याचा उद्योग. घर जाळून पैशाचा व्यापार करायचा उद्योग ते मराठी माणसाला यातला बिझनेस कळाला नाही म्हणून गुजराती माणूस पुढं गेला असले टाळ्याखावू वाक्य म्हणून शेअर मार्केटची ओळख.

तर शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारची लोक आहेत एकतर हे गुंतवणुकीला हे सर्वात चांगल माध्यम म्हणून दर लावणारे आणि दूसरे म्हणजे यात काही खरं नसतं म्हणून गप गुमाने शेती करणारे. आत्ता आम्ही तिसऱ्या लोकांबद्दल सांगतो. हे तिसरे लोक म्हणजे केतन पारेख, हर्षद मेहता यांच्यासारखे. हे योग्य डाव साधून मार्केटमध्ये घुसतात आणि कायमस्वरुपी आपल्या नावावर एक कांड करुन टाकतात.

आत्ता नमनाला घडीभर तेल सांडायच कारण म्हणजे असच एक कांड गेल्या आठवड्यात झालं आहे. शेअर बाजाराशी संबधित लोक सोडली तर त्याबद्दल जास्त कुणाला माहिती नाही. तसा घो़टाळा पण हजार कोट रुपयचाच आहे. पण त्यांनी ज्या पद्धतीने हे कांड केलय ते इंटरेस्टिंग आहे.

ज्यांना काहीच कळत नाही त्यांच्यासाठी फक्त इतकच सांगतो की, झालेलं काय तर या लोकांना शेअरचा रेट सेकंदाच्या फरकानं अगोदर कळत होता. त्या वेळेवर यांनी असा जुगाड केला की आत्तापर्यन्त हजार कोटी रुपये घश्यात घातले.

आत्ता अधिक माहितीसाठी नेमकं काय आहे प्रकरण ते सांगतो.

देशाचा दुसरा सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज असणाऱ्या NSE (National Stock Exchange) मध्ये सुमारे १००० कोटींचा घोटाळा झाला आहे. NSE हि स्टॉक ची खरेदी-विक्री करण्यासाठी असणारी एक यंत्रणा आहे. अत्यंत आधुनिक इलेक्ट्रॉनिक स्क्रीन आधारे ट्रेडिंग करून देणारी एक कंपनी म्हणून NSE चा उदय झाला.

शेअर्सची खरेदी विक्री म्हणजेच ट्रेडिंग करण्यासाठी NSE ने स्वतःच एक इंफ्रास्ट्रक्चर केलेलं आहे. NSE चा सगळा व्यवहार बघणारा एक स्वतंत्र सर्व्हर आहे. या मुख्य सर्व्हरच्या शेजारीच NSE ने काही ठराविक ट्रेडर्स ना Co-Location म्हणजेच मुख्य सर्व्हरच्या शेजारीच आणखी एक सर्व्हर उभा करण्याची परवानगी दिली आहे.

या मागचा उद्देश असा की, मुख्य सर्व्हरवर असणारा प्रचंड डेटा प्रोसेस होऊन येण्याच्या आधीच या Co-Location च्या आधारे ठराविक ट्रेडर्सना त्यांना हवा असलेला डेटा इतरांच्या आधी मिळवू शकत होता. Co-Location चा फायदा तर या ब्रोकर्स ना मिळतच होता पण यात भर म्हणून NSE च्या बॅकअप सर्व्हरचा ऍक्सेस देखील या ब्रोकर्स ना देण्यात आला

स्वतःचा सर्व्हर असणाऱ्या कोणत्याही मोठ्या यंत्रणेकडे मुख्य सर्व्हर बरोबरच बॅकअप सर्व्हर देखील असतो जेणेकरून कधी जर मुख्य सर्व्हर मध्ये काही अडचणी आल्यास बॅकअप सर्व्हरचा वापर करून काम पुढे सुरु ठेवण्यात येईल. या बॅकअप सर्व्हरचा ऍक्सेस देखील या ठराविक ब्रोकर्सना देण्यात आला होता.

आत्ता या ठिकाणी किडे करणारे ब्रोकर्स आले. त्यांनी काय केलं तर NSE  मध्ये ट्रेडिंग करणाऱ्या ब्रोकर्सना शेअर्सच्या  माहिती ज्यावेळी मिळायची त्याआधी काही मिलिसेकंद त्याच शेअरचा रेट यांना मिळू लागला. या माहितीच्या आधारावर म्हणजेच शेअर्सच्या खरेदी विक्रीचा दर आधीच समजल्यामुळे या सेकंदाच्या काही भागात हे ट्रेडर्स ट्रेडिंग करून करोडो रुपये मिळवत होते.

जे ब्रोकर्स मोठं-मोठ्या इन्व्हेस्टर्स कंपनींसाठी काम करत असत जे एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर शेअर्सची खरेदी विक्री करत असतात त्यांचं या घोटाळ्यात भरपूर नुकसान झालं. कारण डेटाचा ऍक्सेस मिळालेले हे ठराविक ब्रोकर्स ज्या शेअर्स ची मागणी जास्त आहे त्याच्या किंमती ओळखून खरेदी विक्री करत होते.

बर हा घोटाळा चर्चेचा विषय का ठरला तर साध्या IT कंपनीच्या सर्व्हरपर्यन्त पोहचणं देखील कठिण असतं. पण इथे तर NSE चा सर्व्हर होता. NSE तील उच्चपदस्थ अधिकारी सामील असल्याशिवाय हा घोटाळा होणं शक्य नव्हतं. SEBI ने केलेल्या चौकशीत देखील NSE मधल्या मोठ्या अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेतच. देशातील दुसरा जगातील ११ वा शेअर बाजार असणाऱ्या NSE चे प्रमुख अधिकारी पैशासाठी ब्रोकर्सची हातमिळवणी करतात, इतकंच नाही तर घोटाळ्याची एक नवीन तितकीच धोकादायक पद्धत शोधून काढतात ज्यात इतक्या महत्वाच्या आर्थिक डेटा सोबत छेडछाड करण्याची परवानगीच या ब्रोकर्स ना देण्यात येते हे आत्ता काळजी करणार ठरलं आहे.

खरतर या प्रकरणात व्हिसल ब्लोअरचं आभार मानलं पाहिजे ज्याने हा घोटाळा सुरु आहे याचा इशारा दिला. हे प्रकरण जर लवकर समोर आलं नसत तर NSE सारख्या संस्थेला खूप मोठा आर्थिक फटका बसला असता ज्याच्या परिणाम आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला असता, अस सांगण्यात येतं. असो बडें बडें देशो मैं ऐसें छोटे मोठे घोटाळे तो होते ही रहतें हैं.

हे ही वाच भिडू. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here