किसमी चॉकलेट म्हणजे आपल्या हातात आलेलं पहिलं सॉफ्ट पॉर्न होतं.

लहानपणीच्या काही गोष्टी असतात ज्यांची साथ मोठे झाल्यावरही सोडवत नाही. याच पैकी एक म्हणजे पारले-जी आणि किसमी चॉकलेट.

किसमी चॉकलेट म्हणजे आपल्या हातात आलेलं पहिलं सॉफ्ट पोर्न होतं. तेव्हा ते न कळायचं निरागस वय होत. जेव्हा त्यावरचा फोटो म्हणजे एका मुलाला एक मुलगी किस करतीय हे कळायला बरीच वर्ष गेली.

गल्लीतल्या दहावीत शिकणाऱ्या मंग्याने शेजारच्या अकरावीतल्या सोनालीला किसमी चॉकलेट दिलं होतं आणि त्याबद्दल आधी सोनूचा आणि नंतर सोनूच्या बापाचा जोरदार मार खाल्ला होता. त्यावेळी कळालं की त्या चार आण्याच्या चॉकलेटची गंमत.

आपल्याला किसमी चॉकलेट भरपूर आवडायचं. फोटोसाठी नाही पण त्या गोड जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीमूळं. खिशाला परवडणार हे चॉकलेट वर्गात कोणाचा वाढदिवस असला तर हमखास उपयोगी पडायचं. गावाकडून येणारा काका खिसाभरून हे चॉकलेट घेऊन यायचा. याच किसमीचा मोठा भाऊ म्हणजे दोन रूपयाचा किसमी बार. मंग्यादादाला म्हणे मात्र पुढे कॉलेजला गेल्यावर किसमी बारने हात दिला म्हणतात.

पारले चॉकलेटबरोबर आणखी एक गोष्ट ज्यामुळे पारलेला जगात फेमस केलं ती म्हणजे,

“पारले जी बिस्कीट.”

पारले बिस्कीट आणि चहा यांच नवरा बायकोचं नात आहे. दोघांच एकमेकाशिवाय चालत नाही.आजारी असलेल्यांना भेटायला जायचं आहे पारलेजी लागणारच. आई घरात नाही चहा सोबत नाश्ता म्हणजे पारलेजी. हॉस्टेलमधलं जेवण सुद्धा पारलेजी च्या जीवावर पार पडलं आहे. थकलेल्या जीवाला ग्लुकोज मिळाव म्हणून पारलेजी. पारले हा सर्वात जास्त फेमस बिस्कीट ब्रँड आहे हे कळण्यासाठी “जी माने जीनियस” असायलाच पाहिजे असं काही नाही.

आजही पाच रूपयात मिळणारा हा पुडा गेली सत्तर ऐंशी वर्षे भारतातच नव्हे तर जगात सर्वात जास्त खपणार बिस्कीट हे बिरूद अभिमानाने मिरवतो.

गेली कित्येक वर्ष याचा मुखडा आहे तसाच आहे. पिवळ्या पांढऱ्या वेष्टनात गुंडाळलेलं गोड बिस्किटं. त्याच्यावर एका गोड मुलीचा चेहरा. ही मुलगी म्हणजे इन्फोसिसचे चेअरमन नारायणमूर्ती यांची बायको सुधा मूर्ती अशी गोड थाप अनेकांनी आपल्याला whatsapp वर फोरवर्ड केलेली असते. मात्र ते चित्र आणि ते whatsapp मेसेज आजूनही तसेच आहे.

सीमेवर लढणाऱ्या जवानांपासून ते कॉर्पोरेट कंपनीमध्ये मिटिंगनंतर सर्व्ह केला जाणारा चहा असो पारलेजी कोणताही गरीब श्रीमंत हिंदू मुसलमान काळा गोरा न पाहता आसेतुहिमाचल सगळ्यांची भूक भागवते.

अशा या जगप्रसिद्ध पारले कंपनीची सुरवात स्वदेशी चळवळीमधून झाली.

आज पासून जवळपास नव्वद वर्षापूर्वी १९२९ साली मोहनलाल चौहान यांनी मुंबईमधील पार्ले येथे गोळ्या बिस्किटाचा कारखाना सुरु केला. मोहनलाल चौहान हे त्याकाळात सुरु असलेल्या गांधीजींच्या स्वदेशी आंदोलनातून खूप प्रेरित झाले होते. त्याकाळात भारतात बिस्किटे फक्त ब्रिटिशांच्या कारखान्यात बनणारी मिळायची. अनेक भारतीय या बिस्किटामुळे आपला धर्म बाटेल या भीतीने त्याच्या पासून दूर असायचे.

मोहनलाल चौहान यांना आपल्या देशात आपण बनवलेलं बिस्कीट खपेल हे गणित लक्षात आलं. त्यांनी जर्मनीमधून बिस्कीट बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं होत. तिथूनच कारखान्यासाठी मशिनरी मागवल्या. सुरवातीच्या काळात बारा कामगार आणि घरातले सगळे मदतीला असा हा प्रवास सुरु झाला.

पुढे ज्या गावात या व्यवसायाचा श्रीगणेशा केला त्यावरून या बिस्कीटाला पारले हे नाव देण्यात आलं. साधारण याच काळात पारलेच्या चॉकलेटचं नाव किसमी देण्यात आलं. भारतात ग्लुकोझ बिस्कीट म्हणजे पारले एवढ समीकरण बनले.

ऐंशीच्या दशकात ब्रिटानियाने गब्बरसिंगच्या जाहिरातीतून पारलेला टक्कर देण्यासाठी ग्लुकोज बिस्कीट आणले. तेव्हाच ब्रिटानियाच्या बिस्किटाबरोबर कन्फ्युजन टाळण्यासाठी पारले ग्लुकोझ बिस्किटंच नाव पारले जी करण्यात आलं.

आजही पारलेची जादू कमी झालेली नाही. स्वादभरे शक्तीभरे पारले जी अबाल वृद्धांच्या मध्ये लोकप्रिय आहे. पारलेचं बिस्किटांचा कारखाना काही वर्षापूर्वी विलेपार्ले येथून इतरत्र पाठवण्यात आला. आजही तिथुन लोकल पास झाली की तो पारले बिस्किटाचा विशिष्ट सुगंध दरवळतो अस सांगतात.

हे ही वाचा.