फिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरचा प्रवास घडवणारे सयाजी शिंदे.

“शूल” सिनेमासाठी कास्टिंग सुरु होतं. मनोज वाजपेयी या सिनेमाचा हिरो होता. रामगोपाल वर्मा हा सिनेमा प्रोड्यूस करत होते. नुकताच आलेल्या सत्या सिनेमानं या दोघांनाही स्टार बनवलं होतं. पिक्चरचा हिरो तर ठरला पण त्याच्या समोर मुख्य निगेटिव्ह रोल असलेल्या “बच्चु यादव” च्या भुमिकेमध्ये कोणाला घ्यायचं हा प्रश्न उभा होता. भूमिका दमदार होती. तेवढाच तयारीचा माणूस या रोल साठी हवा होता.

रामूची अमिताभ बच्चन बरोबर या रोलसाठी चर्चा सुरु होती पण काही कारणाने ते शक्य झालं नव्हतं.

एकदा मनोज वाजपेयींना एका मराठी नाटकाचं पोस्टर दिसलं. त्यातल्या अभिनेत्याच्या चेहऱ्यावरचे रासवट भाव, त्याचे एक्स्प्रेशन, त्याची देहबोली या रोलसाठी परफेक्ट आहेत हे जाणवलं. त्या अभिनेत्याला हुडकून काढण्यात आलं. रामगोपाल वर्माच्या ऑफिस मध्ये तो नट आपल्या स्कूटरवरून आला. तो जेव्हा ऑफिसमध्ये आला त्याची चालण्याची स्टाईल बघितल्या बघितल्या रामगोपाल वर्मानी ठरवलं, हाच असणार आपला बच्चु यादव !

त्या अभिनेत्याचं नाव होत सयाजी शिंदे.

काही रोल एकाद्या अभिनेत्यासाठी बनलेले असतात. सयाजी सरांच्या बाबतीतही असच झालं. अभिनयासाठी कित्येक वर्ष केलेल्या मेहनतीच चीज झालं. शूल मधल्या बच्चा यादवमुळे प्रेक्षकांचं प्रेम तर त्यांना मिळालंचं, शिवाय अनेक पुरस्कार देखील मिळाले.

एक काळ होता अबोली या चित्रपटातल्या भुमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.चित्रपटक्षेत्रात दिग्गज समजला जाणारा हा पुरस्कार घ्यायला सुद्धा सर आपल्या लाडक्या स्कूटरवरून गेले होते. ते आजही गंमतीन म्हणतात,

“माझ्यामूळं फिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरचा प्रवास घडला.”

सयाजी सरांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातलं वेळेकामठी. शेतकऱ्याच कुटुंब. कॉलेज जीवनापासूनच त्यांना नाटकात अभिनयाची आवड निर्मान झाली. घरच्या ओढाताणीच्या परिस्थितीमुळे पाटबंधारे खात्यात छोटी नोकरी केली पण आपल्यातला अभिनेता मरू दिला नाही. फक्त आवड आहे म्हणून स्टेज गाजवणे यापेक्षा त्याचा अभ्यास करणे , त्याच्या वेगवेगळ्या पैलूबद्दल वाचन करणे यावर त्यांनी भर दिला.

एकेकाळी कांजूरमार्गच्या झोपडीत राहणारे सयाजी शिंदे नाटकं वाचण्यासाठी शांत जागा शोधत शेवटी माटुंगा स्टेशनवर बसून राहायचे. साताऱ्यात आपण पाठ केलेले संवाद ऐकून दाखवायला कुणी नसलं की डोंगरावर जाऊन बसायचे. डोंगर त्यांना गॉडफादर वाटतो. डोंगराएवढा खंबीर  गॉडफादर चित्रपट किंवा साहित्यात दुसऱ्या कुणाचा असेल.

सयाजी शिंदेच  सिनेमा इतकचं कवितेवर प्रेम आहे आणि हे कवितेवरचं प्रेम अस्सल आहे. याचा पुरावा म्हणजे आपल्या सोबत असणाऱ्या मित्रांना त्यांनी ऐकवलेल्या शेकडो कवितेत स्वतःची एकही कविता कधीच ऐकवली नाही. कवितेवर एवढ निरपेक्ष प्रेम ही गोष्ट दुर्मिळ आहे. त्यांच्याविषयी सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे मराठीतल्या बैल या विषयावरच्या असंख्य कविता त्यांच्या संग्रही आहेत.

बैलावरच्या कविता एखाद्या अभिनेत्याने आपल्या व्यस्ततेतून गोळा कराव्यात आणि लोकांना आवर्जून वाचायला द्याव्यात ही खूप मोठी गोष्ट वाटते. स्वतःच्या कवितेत रमलेली माणसं खूप बघायला मिळतात. पण लोकांच्या कवितेत रमणारा माणूस बघितला की आपण म्युझियममधली एखादी मौल्यवान वस्तू बघतोय असं वाटतं.

बैल या विषयावर या कविता घेऊन मागच्यावर्षी साताऱ्यातल्या मित्रांसोबत त्यांनी कविता नाट्य केलं. त्यातल्या काही प्रयोगात भूमिका केली. बैल या विषयवरचं, एकूणच कृषीसंस्कृतीवरचं या प्रकारचं ते मराठीतलं पाहिलं नाटक असेल.

लेखकातला माणूस समजून घेण्याची त्यांना आवड आहे. म्हणून रंगनाथ पठारे, भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या अनेक लेखकांच्या भेटीगाठी ते आवर्जून घेत असतात. त्यांनी एका रात्रीत बसून तुंबारा नावाचं नाटक लिहिलंय. सयाजी शिंदे लेखक म्हणूनही किती अस्सल आहेत ते तुंबारा वाचल्यावर लक्षात येतं. कारण एवढ्या लेखकांच्या गोतावळ्यात राहूनही तुंबाराची शैली अगदी स्वतंत्र आहे. त्यांची स्वतःची आहे. निसर्गाविषयी एवढ उत्तम आणि सखोल चिंतन मराठी नाटकांमध्ये खूप कमी वेळा आलंय .

सयाजी शिंदे यांच्या अभिनयाबद्दल आपण काय बोलणार? अमिताभचा आणि त्यांचा एक वेगळा रेकॉर्ड आहे.

अमिताभचा एक सिनेमा वारंवार चॅनल वर लागतो. सुर्यवंशम. सयाजी शिंदेंचे वेगवेगळे डबिंग केलेले पन्नास तरी सिनेमे कुठल्याही वेळी टीव्हीवर चालू असतात. त्यांनी दक्षिणेत एवढे सिनेमे केले यापेक्षा महत्वाचं आहे की दक्षिणेतले काही दिग्दर्शक सयाजी शिंदे सिनेमात असलेच पाहिजे असा हट्ट धरूनअसतात. कुणाला ते लकी वाटतात. कुणाला त्यांचं पात्र सिनेमात असणं आवश्यकच वाटतं. कुणाची त्यांनी सिनेमात असायलाच पाहिजे ही श्रद्धा असते.

खरंतर साउथमध्ये बाहेरच्या माणसाने एवढ काम करण ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. तमिळमध्ये भारती नावाच्या कवीची भूमिका त्यांनी केली. विद्रोही कवी, समाजसुधारक सुब्रमण्यम भारती यांची भूमिका सयाजी शिंदे यांच्या वाट्याला येणं ही महत्वाची गोष्ट आहे. या भुमिकेमुळे त्यांना दक्षिणेत अक्षरशः भारतींचे चाहते देवासारखी वागणूक देतात. कवितेवर प्रेम करणाऱ्या माणसाला एका कवीच्या भूमिकेने एवढा सन्मान मिळावा हा किती महत्वपूर्ण योगायोग आहे.

सयाजी शिंदे सर आपल्याला गेल्या काही वर्षात सह्याद्री देवराईमुळे वेगळ्या रुपात दिसताहेत. झाडावर प्रचंड प्रेम करणाऱ्या या माणसाला आपली सर्वोत्तम भूमिका गवसलीय असं वाटतं.

महाराष्ट्रात सहा सात ठिकाणी सह्याद्री देवराई उभी आहे. माणदेश, बीड, संगमनेर, औरंगाबाद सारख्या ठिकाणी लाखाच्या घरात झाडं लावली गेली, जगवली गेली. सह्याद्री देवराई हे सामाजिक कार्य आहे असं त्यांना वाटत नाही. तो आपला छंद आहे असं ते म्हणतात ही गोष्ट खूप महत्वाची आहे. प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याने समजून घेण्यासारखी आहे.

सयाजी शिंदे यांच्या चित्रपटातल्या कोणत्या भूमिका लोकांच्या लक्षात राहतील हे आपण आताच सांगू शकत नाहीत. पण सह्याद्री देवराई ही सयाजी शिंदे यांची दुष्काळ, पर्यावरण, पाउस आणि पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी घेतलेली ठाम भूमिका आहे.

त्यांची ही भूमिका महाराष्टात लाखो झाडांच्या रुपात मातीत मूळ घट्ट रोवून उभी आहे. शेकडो वर्षं ही भूमिका जिवंत राहणार आहे. सावली देणार आहे. फळ देणार आहे. एकतर मेणबत्ती पेटवून मोकळं व्हायचं नाहीतर टेंभा मिरवत फिरायचं असा हा काळ. त्यात त्यांनी झाडांच्या हिरव्यागार मशाली पेटवल्या हे खूप मोठं आणि जागृती निर्माण करणारं काम आहे.

कधी वेळ मिळाला तर सह्याद्री देवराईला नक्की जा. बीडला. ही सह्याद्री देवराई आज एखाद्या दीर्घ कवितेसारखी दिसते. लवकरच तिचं महाकाव्य होईल हे नक्की.

सयाजी सर हे आपल्या १२ तारखेच्या वर्षपुर्तीच्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून संवाद साधायला येणार आहेत. आता पाहुणे म्हटलेल सयाजी सरांनाही आवडणार नाही. आपल्या बोल भिडूच्या प्रत्येक टप्प्यावर सयाजी सर घरच्या माणसाप्रमाणे हक्काने आपल्या पाठीशी आहेत.

तर या आपल्या या लाडक्या भिडूशी गप्पा मारायला तुम्हीही नक्की या, १२ तारखेला मंगळवारी ठीक ५ वाजता पत्रकार भवन. बोल भिडूचा वाढदिवस जोरात साजरा करूया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here