परदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित पवार.

साल 2005-06

वेळ: तशी वाईटच.

एका मोठ्या बॅंकेत एक प्रतिष्ठित व्यक्ती शिरतो. हातामध्ये फाईल. त्यांना थेट बॅंक मॅनेंजरच्या केबीनमध्ये प्रवेश दिला जातो. समोरच्या व्यक्तीची ओळख कळताच बॅंक मॅनेंजर कॉफी सांगतो. त्या व्यक्तींच्या हातातील फाईल पाहतो आणि विषय फिरवत राहतो. कॉफी थंड होते तरी फाईलमधल्या मुद्यावर मॅनेंजर येत नाही. शेवटी कंटाळून ती व्यक्ती नमस्कार करते आणि मागे फिरते.

ती पहिली बॅंक नव्हती, ती पहिली कॉफी नव्हती आणि कपाटात बंद होणारी ती पहिली फाईल देखील नव्हती. प्रत्येक बॅंकेकडून या प्रतिष्ठित व्यक्तीला नकारच मिळत असे. कारणं वेगवेगळी होती पण महत्वाच कारण होतं या माणसाचा थेट स्वभाव. जे आहे ते तसच आहे हे सांगणारा हा माणूस. 

या माणसाच नाव राजेंद्र पवार. 

राजेंद्र पवार अर्थात शरद पवारांचे पुतणे. आत्ता तुमच्या मनात देखील सहज विचार येईल की पवार कुटूंबियातला व्यक्ती असून बॅंक एखाद्याची फाईल अडवू शकते ही न पटणारी गोष्ट. पण राजेंद्र पवार यांना फक्त “पवार” आडनावामुळे टाकलेला विश्वास आजही पटत नाही. कुटूंबाच नाव लावत असताना त्यासोबत असणाऱ्या जबाबदारीचं भान अधिक जपण्याचा प्रयत्न राजेंद्र पवार करतात. त्यामुळे व्यवहार हा फक्त राजेंद्र पवार या नावावर असणाऱ्या विश्वासातूनच करावा असं त्यांच स्पष्ट मत असतं, तिरकस शैलीत थेट बोलणारं हे व्यक्तिमत्व.

राजेंद्र पवार यांचे वडिल अप्पासाहेब पवार म्हणजे महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखान्यांच्या उभारणीचा कणा. प्रवरा कारखाना,  अकलुजच्या मोहिते पाटलांचा कारखाना, भवानीनगरचा कारखाना असे कित्येक सहकारी साखर कारखाने उभा करत असताना त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण आजही काढली जाते. अप्पासाहेब पवार हे कधीकाळी जंगल मोजणीदार म्हणून १०० रुपयांच्या पगारावर ग्वालेरला काम करत होते. प्रवरा कारखान्यामध्ये ज्यु. कृषी सहाय्यक म्हणून नोकरीला होते आणि पुढे याच कारखान्याचे ते MD देखील झाले होते. 

थोडक्यात स्वत:च कर्तृत्व स्वत: सिद्ध करायला लागतं हे राजेंद्र पवार यांच्या डोक्यात अगदी लहानपणापासून फिट्ट बसलेलं. 

2005 च्या काळात राजेंद्र पवार यांच्याकडे काय होतं तर एक पोल्ट्रीचा व्यवसाय. स्वत:च घर आणि शरद पवार आणि अप्पासाहेब पवार यांच्या विचार आणि कृतीतून शेतकऱ्यांसाठी कष्टाने फुलवण्यात येणारी बारामती अॅग्रो नावाची छोटीशी कंपनी. याचसोबत त्यांच्याकडे होते “राजूदादा” अशी हाक मारत अडीअडचणीला धावून येणारे हजारो शेतकरी.

पण सोबतच एक स्वप्न देखील होतं ते स्वप्न होतं स्वत:च्या शुगर फॅक्टरीचं.

या सरळ स्वभावाच्या माणसाने शुगर फॅक्टरीची फाईल तयार केली. या काळात राजेंद्र पवार कित्येक बॅंकाच्या पायऱ्या चढत होते. पवार कुटूंबीय म्हणून प्रत्येकजण मदत करण्यासाठी सज्ज असायचाच पण ज्याचे वडिलच प्रसंगी महाराष्ट्र सोडून जंगल मोजणीदार म्हणून काम करुन स्वत:ला सिद्ध करणारे असतील असा माणूस दूसऱ्यांचीच काय तर कुटूंबियांची मदत घेणं देखील अशक्य होतं. स्वकर्तृत्व हा शब्द वडिलांसोबतच त्यांच्या नावाबरोबर जोडला गेला होता. याच काळात त्यांची मुलगी बाहेरच्या देशामध्ये शिक्षणासाठी होती. तिचा शिक्षणाचा खर्च, कंपनी चालवण्याची धडपड आणि आत्ता शुगर फॅक्टरी सुरू करण्याची धडपड असा तो काळ.

राजेंद्र पवार बाहेरच्या अडचणी बाहेरच मिटवत. घरातल्यांना त्याच्या त्रास होवून द्यायचा नाही. पण स्वत:च्या बायकोपासून या गोष्टी लपू शकत नाहीत. सुनंदा पवार या गोष्टी मुंबईत शिकणाऱ्या आपल्या मुलाला सांगत असतं. 

रोहित पवार हा तेव्हा 20 वर्षाचा कॉलेजचा तरुण होता. आपल्या बहिणभावां सारखचं बाहेर शिकायला जायचं अस या मुलाच स्वप्न होतं. त्यासाठी खर्चाचा हिशोब देखील त्यांनी मांडला होता. 15 लाखाचा हा खर्च होता. आपल्या वडिलांना हा खर्च सहज परवडू शकतो अस त्याला वाटायचं पण दिवसेंदिवस त्याच हे मत बदलत चाललं होतं. एक क्षण असा आला की या मुलाच्या पुढे दोनच पर्याय शिल्लक राहिले होते, एकतर बाहेर शिकायला जायचं. जे स्वप्न त्याने खूप वर्षांपासून पाहीलं होतं ते प्रत्यक्षात आणायचं, नाहीतर आपल्या वडिलांच्या सोबत खांद्याला खांदा लावून शुगर फॅक्टरी उभा करायला झटायचं.

रोहित पवार या ऐन विशीतल्या पोरानं तोच निर्णय घेतला जो तुम्ही आम्ही घेतला असता. जेव्हा घरात गरज असते तेव्हा पोरं जग सोडून घरी येतात. एका रात्री आपली फॉरेनला जायची स्वप्न कॉलेजच्या सॅकमध्ये गुंडाळून हा मुलगा बारामतीत परत आला. 

आत्ता प्रवास सुरू झालेला तो वडलांच्या खांद्याला खांदा लावून झटायचा. आपली स्वप्न मारून आपल्यासोबत हिमत्तीने लढण्यासाठी आपला मुलगा परत आला हि गोष्टच राजेंद्र पवारांना बळ देणारी ठरली. रोहित पवारांपुढे पहिला प्रश्न होता तो म्हणजे, शुगर फॅक्टरी उभा करणं आणि दूसरा प्रश्न होता बारामती अॅग्रोचा सेटअप नव्याने उभा करणे. नव्याने गोष्टी अंमलात आणून कंपनी फायद्यात घेवून जाणे.

तेव्हा रोहित पवारांच वय होतं 21 वर्ष, या वयात एक कंपनी पुन्हा नव्यानं उभा करण्याची जिद्द घेवून हा मुलगा कंपनीत आला. आपण मुंबईत शिकलो आहोत. या जून्या माणसांना काय कळतं या विचाराने पहिले सहा महिने कारभार झाला.

पहिल्या सहा महिन्याचा रिझल्ट काय होता तर रोहित पवार हे नाव सपशेल फेल ठरलेलं. 

एकीकडे शुगर फॅक्टरी उभा करण्यासाठी असणारी लोनची फाईल रोहित पवार या तरुणाकडे आली होती. दूसरीकडे कंपनीची जबाबदारी. सर्व स्वप्न गुंडाळून वडिलांसाठी आलेल्या या मुलाला वेगळं काहीतरी करायचं होतं पण वेगळ्याच्या नादात खूप गोष्टी फसत गेल्या. बॅंकेत लोनची फाईल तशीच होती. नाही म्हणायला या काळात रोहित पवारांची स्वत:च्या कष्टातून घेतलेली एक सेकंड हॅन्ड स्कोडा होती. हि गाडी घेवूनच ते शुगर फॅक्टरीच लोन मिळवण्याचा प्रयत्न करत असतं.

एका सेकंड हॅण्ड साध्या गाडीतून अवघा वीस बावीस वर्षाचा मुलगा यावा आणि त्याने शुगर फॅक्टरीसाठी लोन मागावं ही कुठल्याच बाजून व्यवहारिक गोष्ट नव्हती. 

याच काळात त्यांना एका कंपनीतच खूप पहिल्यापासून राबणाऱ्या एका व्यक्तिंचा सल्ला मिळाला, 

तूम्ही नवीन गाडी घेवून का जात नाही.

यावर रोहित पवारांच उत्तर होतं एका गाडीमुळे मला जज करणार असतील तर असा व्यवहार न झालेलाच बरा. 

त्यावर त्यांच उत्तर मिळालं, 

हे फक्त तूझ स्वप्न असतं तर व्यवहार न झालेला बरा देखील असता. पण शुगर फॅक्टरीच  स्वप्न कंपनीत कित्येक वर्ष काम करणाऱ्या प्रत्येक माणसाच देखील आहे, त्यातून कित्येकांचे संसार फुलणार असतील. त्यांच्या पोरांच शिक्षण होणार असेल तर ते फक्त तुझं स्वप्न रहात नाही. आज हे स्वप्न शेपाचशे लोकांच आहे, उद्या लोकं वाढतील, कदाचित कमी देखील होतील पण प्रत्येक निर्णय हा दूसऱ्यांसाठी देखील घेतलेला असतो याच भान जपलं पाहीजे.

त्या क्षणाला झेपत नसताना देखील रोहित पवारांनी एक चांगली गाडी घेतली, या गाडीमुळं काय झालं तर गाडीवरुन जज करणारी माणंस रोहित पवार या अवघ्या 22 वर्षांच्या मुलाबरोबर किमान बोलू तरी लागली. या बोलण्यामुळे रोहित पवार या तरुण पोरांचे विचार तरी पुढच्यांना कळू लागले. ओळख झाल्यानंतर, भेटल्यानंतर रोहित पवार एक गोष्ट आवर्जून लक्षात आणून देत की, समोरच्या व्यक्तीला त्याच्या फक्त दिसण्यावरुन जज करु नये.

काही काळात हा विश्वास वाढत गेला. ते लोकांना आपल्या आयडिया पटवून देवू लागले. अशाच विश्वासातून एक दिवस शुगर फॅक्टरीच्या लोनची फाईल मंजूर झाली. बॅंकेने जो विश्वास दाखवला तो सव्याज योग्यवेळी परतफेड करुनच रोहित पवार यांनी मिळवला. 

पहिल्या सहा महिन्यात डिप्रेशन तर गळालच होतं पण अजून एक गोष्ट शिकायला मिळाली होती, त्यांच्या कंपनीत कित्येक वर्ष काम करणाऱ्या त्या व्यक्तिंच्या सल्ला, की आपला एक निर्णय हजारों लोकांच भविष्य ठरवणारा असतो. हे पक्क डोक्यात ठेवून रोहित पवारांनी काम करायचं ठरवलं. त्या काळात हजारो कोटी टर्नओव्हर असणाऱ्या कंपन्या जून्याच पद्धतीने चालत असत. कंपनीची वार्षिक उलाढाल साठ कोटींपर्यन्त पोहचली होती. पण आपल्या कंपनीत आत्ता नविन काहीतरी करायचं, त्यामध्ये पारदर्शकता आणायची म्हणून रोहित पवारांनी शोध घेतला आणि उत्तर मिळालं ERP  सिस्टिम.

ERP अर्थात इंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग. त्या वेळी भारतात खूप मोठ्या आणि हातावर मोजण्यासारख्या काही ठराविक होत्या ज्यामध्ये SAP ब्रॅण्डच्या ERP सिस्टिमचा अवलंब केला जात असे. या सिस्टिम अंतर्गत ह्युमन रिसोर्स, मॅन्युफॅक्चरिंग, सप्लाय चेन, सर्व्हिस या सर्व गोष्टींवर एकत्रित कंट्रोल ठेवला जातो.

मॅनेंजमेंट मधली हि गोष्ट त्या वेळी मोठमोठ्या कंपन्या वापरण्यास तयार नव्हत्या पण आपण हे करुच म्हणून त्यांनी SAP ची ERP सिस्टीम लावली. पहिल्याच टप्यात सिस्टिम फेल झाली.

बघ तूला सांगत होतो. शहाणपणा करु नको जे आहे तसच चालवं म्हणत चार माणसं सल्ले देवून गेले.

रोहित पवारांनी पुन्हा सिस्टिम लावली आणि पुन्हा ती सिस्टीम फेल झाली.

चाराचे आठ झाले. मापं काढणारे चेष्टा करु लागले. पुन्हा त्यांनी तिच सिस्टीम लावली. तिसऱ्या वेळेला सिस्टीम पास झाली. आणि रोहित पवार हे दूसऱ्यांदा यशस्वी झालं.

जुन्या गोष्टी न सोडता नवं शोधलं पाहीजे हे रोहित पवार या तरुणाला वयाच्या 22 व्या वर्षी कळलं. जुन्या गोष्टी जपत असताना आजोबांनी आणि वडिलांनी कंपनीचे जे इथिक्स संभाळले तेच पुढे घेवून जाण्याच काम रोहित पवारांनी केलं. आज बारामती अॅग्रोचा हजारो कोटींचा टर्नओव्हर आहे, शुगर फॅक्टरी बद्दल बोलायचं झालं तर रोहित पवार हे इंडियन शुगर मिल्स असोशिएशनचे संपुर्ण भारताचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत आणि सर्वात महत्वाच म्हणजे आयुष्याचा चांगला आणि वाईट दोन्ही काळ पाहीलेले आहेत.

आपण नेहमीच शुन्यातून पुढे आलेल्या लोकांचा संघर्ष वाचत आलो आहोत. त्या संघर्षाला महत्व देखील असत पण आहे त्या दहा रुपयांच्या नोटेला शंभराची नोट करणं, सोबत असणाऱ्या दहा माणसांचे शंभर माणसं करण आणि हे करत असताना तेवढाच खरेपणा जपणं हा देखील एक संघर्ष असतो. रोहित पवारांचा संघर्ष देखील असाच आहे. म्हणूनच वाईट काळात सोबत असणारी ती माणसं आजही रोहित पवारांसोबत हक्काने उभा असलेली असतात.

आपल्यासारख्या ना शहरी ना ग्रामिण, ना हूशार ना गंड असणाऱ्या स्वप्न पाहणाऱ्या अधल्या मधल्या भिडू लोकांसोबत संवाद साधण्यासाठी ते खास येत आहेत दिनांक १२ मार्च रोजी ठिक पाच वाजता. पत्रकार भवन हॉल, नवी पेठ पुणे येथे. 

हे ही वाच भिडू. 

3 COMMENTS

  1. हो ह्या गोष्टीचे आम्ही साक्षीदार आहोत दादा पहाटे ५ वाजता आले की रात्री २ वाजेपर्यत काम करत आसत आनि त्याच फलीत आज दिसतय कंपनी मोटी झालीच पन आमच्या सारख्या हाजारो जनांनचे संसार चांगल्या पदतीने चालू आहेत माझ्या सारख्या किरकोळ दिवानजी काम करणाऱ्या मानसाला ३० ट्रकचा मालक बनवले आनि आजुनही मदत करत आसतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here