नाही तर हा भाजपचा नेता मोदींना कडवी टक्कर असता…

सध्या गरमागरम चर्चा आहे की हिमाचलप्रदेशच्या भाजपा नेत्यांचा सेक्स व्हिडीओ व्हायरल झालाय. ही काही देशातली पहिली घटना नाही. यापूर्वी कॉंग्रेसचे प्रवक्ता अभिषेक मनु संघवी, कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री व तत्कालीन राज्यपाल एन.डी.तिवारी, युवा नेता हार्दिक पटेल अशी कित्येक उदाहरणे आहेत.

या व्हिडीओमुळे अनेक राजकीय नेत्यांचे करीयर संपले. बऱ्याचदा असे व्हिडीओ पसरतात यामागे त्यांनी केलेलं कांड तर असतेच पण त्यांच्या विरोधकानी केलेली स्कीम सुद्धा असते. अशीच एक स्कीम एका नेत्यावर पडली, नाही तर तो आता देशाच्या पंतप्रधाना टक्कर असता.

गोष्ट आहे २००५ सालची. 

अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार गेलं होतं. मनमोहनसिंग पंतप्रधान बनले होते. वयोमानामुळे वाजपेयीनी राजकारणातून सन्यास घेतल्यात जमा होती. त्यांचे वारस अडवाणी होते पण त्यानंतरचा नेता कोण असणार यात दुसऱ्या फळीमध्ये बरीच स्पर्धा होती. यात प्रमोद महाजन, सुषमा स्वराज आघाडीवर होतेच. शिवाय आणखी काही पडद्यामागची नावे होती ज्यांचा भाजपच्या राजकारणावर बराच मोठा प्रभाव होता यात होते संजय जोशी.

संजय जोशी हे मुळचे नागपूरचे मेकॅनिकल इंजीनियर. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार मनावर झालेले. इंजिनियरिंग कॉलेजची चांगली चालणारी नोकरी सोडून संघाच्या कामात झोकून दिल. लग्न केलं नाही, पूर्णवेळ प्रचारक बनले. त्याकाळच्या संघ नेतृत्वाने त्यांना गुजरात राज्याची जबाबदारी दिली.

संजय जोशी गुजरात मध्ये गावोगाव फिरून संघाची मुळे घट्ट करू लागले. लोकांचाही त्यांना प्रतिसाद मिळत होता. यातच त्यांना काही साथीदार भेटले यात एक नाव होतं नरेंद्र दामोदरदास मोदी. 

या दोघांचेही मॅन मॅनेजिंग स्कील बघून त्यांना संघाने भाजपाला मजबूत करायची जबाबदारी दिली. १९८८ साली दोघेही राजकारणात आले. याच दरम्यान देशभर लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रेचा धमाका सुरु केला होता. गुजरातमध्ये त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. अडवाणी यांनी हेरलं की गुजरातची यंग ब्रिगेड जबरदस्त काम करते.

त्यांच्या वरच्या जबाबदार्या वाढल्या. केंद्रातल्या मोठ्या नेत्यांशी खांद्याला खांदा लावून काम करताना संजय जोशी आणि नरेंद्र मोदी दिसू लागले. हे दोघे सच्चे दोस्त होते मात्र काम करण्याची दोघांचीही स्टाईल मात्र वेगळी होती. नरेंद्र मोदी सुरवातीपासून कॉम्प्युटर सारख्या मॉडर्न टेक्नोलॉजीचा वापर करून स्ट्रटेजी बनवण्यासाठी ओळखले जायचे. तर संजय जोशी हे आपल्या गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कासाठी फेमस होते.

१४ मार्च १९९५. गुजरात मध्ये पहिल्यांदाच केशुभाई पटेलांच्या रुपात भाजपाचा मुख्यमंत्री बनला. पण सरकार जास्त दिवस टिकले नाही. शंकरसिंह वाघेला यांनी बंड पुकारले. यात काही वर्षे गेली. १९९८ साली केशुभाई पटेल परत सत्तेत आले. त्यांनी पहिलं काम केलं नरेंद्र मोदींना गुजरातमधून बाहेर काढणे.  

इथेच पहिली ठिणगी पडली. मोदींची रवानगी केंद्रात करण्यात आली आणि यामागे पटेलांचे विश्वासू संजय जोशी आहेत हा समज मोदींनी करून घेतला. संजय जोशींवर अख्ख्या गुजरात राज्याची जबाबदारी टाकली होती.

मोदी या घटनेमुळे खुश नव्हते. त्यांना ठाऊक होते की संजय जोशी आपले पुढचे मोठे स्पर्धक असणार आहेत. त्यांच्यामागे नागपूर आरएसएसचं मोठ पाठबळ होतं. त्यामानाने मोदी यांना कोणाचा सपोर्ट नव्हता. तरी त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर दिल्लीमध्ये बस्तान बसवण्यास सुरवात केली. पक्षाचा प्रवक्ता सरचिटणीस या पदावर केलेल्या कामावरून अडवाणी यांचे ते लाडके बनले.

२००१मध्ये त्यांच्या अखंड प्रयत्नातून अखेर केशुभाई पटेलांना गुजरात मुख्यमंत्री पदावरून काढलं गेलं. त्यांनी भूज भुकंपावेळी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही, तिथे बराच भ्रष्टाचार झालाय शिवाय त्यांचे वय झाले आहे असे आरोप झाले. नरेंद्र मोदी वाजत गाजत गुजरातच्या मुख्यमंत्री पदी आले आणि संजय जोशींची रवानगी केंद्रात झाली.

इथेच संजय जोशी आणि नरेद्र मोदी हा संघर्ष टीपेस पोहचला. २००२ला गोध्रा हत्याकांड आणि नंतरची गुजरात दंगल झाली. असं म्हणतात की संजय जोशीनी मोदींची प्रतिमा भ्रष्ट करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. याच दरम्यान त्यांचे समर्थक व मंत्री हरेन पंड्या यांची हत्या झाली. ही राजकीय हत्या असल्याचा आरोप झाला.

वाजपेयी मोदींवर चिडून होते. फक्त लालकृष्ण अडवाणी यांच्या पाठींब्यामुळे मोदी सत्तेत कायम राहिले. त्यातच दिल्लीतली सत्ता देखील गेली. याच प्रमुख कारण २००२च्या दंगलीत वाजपेयी सरकारची डागाळलेली प्रतिमा हे कारण सांगितलं जात होतं. संजय जोशी तो पर्यंत दिल्लीत ताकदवान नेता बनले होते. वाजपेयींच्या खास गटात त्यांचा समावेश होता. प्रमोद महाजन यांच्या सोबत ते भाजपचे राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवत होते.

आणि याच दरम्यान ती सीडी आली.

भारतीय जनता पार्टीला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच सेलिब्रेशन चालू होतं आणि संघाचे लाडके नेते संजय जोशी यांचे नाजूक स्थितीतील अवस्थेची सीडी वाटण्यात येत होती. हा एका स्टिंग ऑपरेशनचा भाग आहे असं सांगण्यात येत होतं. अख्ख्या भाजपमध्ये खळबळ उठली. संजय जोशींना राजीनामा द्यावा लागला. हा एकप्रकारे मोदींचा विजय मानला गेला.

नंतर याबद्दल बरेच आरोप झाले. ही सीडी बाहेर काढण्यामागे उमा भारती आहेत अशी चर्चा होती. या सीडीमध्ये जो व्यक्ती दिसतोय तो संजय जोशी नसून कोणी वेगळाच आहे असं बोलल गेलं. सीबीआयला मिळालेल्या निनावी पत्रात या मागे एन्काऊंटरमध्ये मारला गेलेला सोहराबुद्दीन शेख याचा हात होता असं लिहिलं होतं. बीके चौबे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने देखील या आरोपाची पुष्टी केली. पण तपासात यात काही तथ्य आढळले नाही.

संजय जोशी राजकारणातून एकाकी पडले. पुढे नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यावर संजय जोशी यांना परत आणण्याचा प्रयत्न झाला. पण यावरून मोदी आणि गडकरी यांच्यात वाद झाले. पुढे जेव्हा २०१४ सालच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आणि मोदी हेच भाजपाला सत्तेत आणु शकतात याचा अंदाज आला तेव्हा भाजपने त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्यात आली.

तेव्हा मोदींची एकमेव अट होती की संजय जोशी मला निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपमध्ये दिसता कामा नयेत.

आज संजय जोशी हे नावसुद्धा देशाच्या राजकारणाच्या चर्चेत येत नाही. ते दिल्लीत एका छोट्या घरात राहतात. अजूनही आरएसएसच कार्य करत असतात. मध्यंतरी गुजरात निवडणूकीवेळी हार्दिक पटेलचा सेक्स व्हिडीओ व्हायरल झाला होता तेव्हा माध्यमांनी संजय जोशी यांची प्रतिक्रिया विचारली, तेव्हाही त्यांनी हे राजकारण असल्याचे सांगितले. त्यात त्यांनी अप्रत्यक्षरित्या मोदीशहा जोडी यामागे असल्याचा इशारा ही केला होता.

ते काहीही असो. संजय जोशी यांच्या बरोबरचे नरेंद्र मोदी सध्या पंतप्रधान आहेत. त्यांनी दुसऱ्यांदा आपली सत्ता परत आणली आहे. आणि संजय जोशी ज्यांना संघाचा पाठींबा होता, ज्यांची क्षमता होती, वरच्या नेत्यांमध्ये उठबस होती असे संजय जोशी एका व्हिडीओ सीडी मुळे राजकारणातून बाहेर फेकले गेलं. नाही तर भाजपामध्ये आज मोदी शहांची एवढी एककेन्द्री पॉवर बनली आहे तीच्या पुढे संजय जोशींच्या रुपात मोठे आव्हान असते.

हे ही वाच भिडू.

2 COMMENTS

  1. जी व्यक्ती आपल्याला वरचढ ठरू शकते तिचा येनकेन प्रकारेण एनकाउन्टर करायचा हे सर्वज्ञात आहे. राजकारणात तर हे नेहमीचे आहे. खरे समोर येतेच, पण झालेले नुकसान भरून निघत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here