खाजगीत दिलेल्या शब्दाला शास्त्रीजी जागले आणि तडकाफडकी त्यांनाच मुख्यमंत्री केलं..

साल १९६२.

यशवंतराव चव्हाणांना दिल्लीवरून बोलवणं आलं. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून त्यांना जावं लागलं. ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावल्याचं’ वर्णन करण्यात आलं.

पण नव्यानं निर्माण झालेल्या महाराष्ट्राचं काय?

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा झडू लागल्या.

तात्काळ वसंतराव नाईक यांच नांव पक्कं करण्यात आलं. आदल्या रात्री वर्षा बंगल्यावर शपथविधीसाठी कोणत्या रंगाचा सुट घालावा याची चर्चा चालू होती, मात्र अचानक एका रात्रीत संभाव्य मुख्यमंत्री बदलण्यात आले. याबाबत महेश भोसले यांनी एका दिवाळी अंकात आठवण सांगितली आहे.

ते म्हणतात,

“मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांच नांव  निश्चित झालं होतं. जेव्हा वर्षा बंगल्यावर दुसऱ्या दिवशीच्या  शपथविधीसाठी कोणता सुट घालायचा याची चर्चा चालू होती, तेव्हा त्या चर्चेत मी देखील सहभागी होतो. ही चर्चा आटोपून तोंड गोड करुन मी रात्री नऊ- साडेनऊच्या सुमारास कन्नमवारजींच्या बंगल्यावर पोहचलो.”

पुढे ते लिहतात,

कन्नमवार यांच्या घरी जेवण झाल्यानंतर ते म्हणाले, मला मिळालेल्या आश्वासनाचा सर्वांनाच विसर पडला. अगदी तुम्हाला पण !

त्यांचा हा शब्द ऐकताच महेश भोसले यांनी तात्काळ लालबहाद्दुर शास्त्री यांना फोन लावला. लालबहाद्दुर शास्त्री यांना महेश भोसले म्हणाले,

“कन्नमवारजी को आपने आश्वस्त किया था की, चव्हाणजी के बाद आपकों मुख्यमंत्री बनाऐंगे.”

तिकडून शास्त्रीजी म्हणाले,

“अच्छा हुआं आपने याद दिलाया. मैं दस मिनिट मे फोन करता हूं.”

इतकं म्हणून शास्त्रीजींनी फोन ठेऊन दिला. त्यानंतरच्या दहा मिनिटातच पुन्हा फोन वाजला. फोन कन्नमवार यांनी उचलला. समोरून शास्त्रीजी म्हणाले,

“आप कल मुख्यमंत्रीपद की शपथ लेंगे.”

त्यानंतर शास्त्रीजी महेश भोसले यांना म्हणाले,

“धन्यवाद, आप याद नही दिलातें तो हमारे हाथ से अन्याय हो जाता”

पुढे ते सांगतात की, उत्तरप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते गोविंद वल्लभ पंत यांनी महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी त्यांना शब्द दिला होता. दिलेला हा शब्द जेव्हा कन्नमवारांनी आठवून दिला तेव्हा तात्काळ निर्णय घेत कन्नमवारांना  मुख्यमंत्री करण्यात आलं.

ही त्यावेळची राजकीय संस्कृती होती. राजकीय नेते आपल्या शब्दासाठी जगणारे आणि दिलेल्या शब्दाला जागणारे होते. हा शास्त्रीजींचा मोठेपणा होता आणि शास्त्रीजींच्या शब्दाला मान देऊन मुख्यमंत्रीपदाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानंतर देखील पक्षनिष्ठ राहिलेल्या वसंतराव नाईकांचा देखील मोठेपणा होता. आजच्या काळात अशी घटना बघायला मिळणं दुर्मिळच.

हे ही वाचा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here