आचार्य अत्रेंनी “दारू” वरुन विधिमंडळात धुमाकूळ घातला होता..

ते साल होतं १९५७ चं. त्या काळात गांधीवादी नेते मोरारजी देसाई राज्याचे मुख्यमंत्री होते. तर आचार्य अत्रे विधानसभेवर निवडुन आले होते. मोरारजी देसाई यांनी राज्यात दारूबंदी जाहिर केलेली. ज्याला घरात बसून मद्यपान करायचे आहे अशा व्यक्तिंना विशेष परवाने देण्यात आले होते.

तरिही राज्यात चोरटी दारूविक्री जोरात होतीच. परवान्याची विशेष परवानगी देण्यात आली असली तरी त्यातून मार्ग काढणारे अनेक महाभाग होते. 

राज्यात बंदी असून देखील घरटी दारू गाळण्याचे उद्योग सुरूच होते. विशेष परवान्याची दखल न घेता लोक घरात मस्तपैकी बैठक मारत होते आणि खुद्द आचार्य अत्रेच या दारूबंदीची विशेष टिंगल करत असत. थोडक्यात सांगायचं झालं तर राज्याने घेतलेल्या या दारूबंदीच्या निर्णयाचा जोरदार बाजार उठलेला होता. 

तरिही गांधीवादी नेते मोरारजी देसाई मात्र विधानसभेत दारूबंदीचा राज्याला किती मोठ्ठा फायदा झाला आहे हे सांगण्यातच व्यस्त असत.

असाच एका चर्चेत मोरारजी देसाई यांनी नेहमीप्रमाणे दारूबंदीच्या फायद्याची यादीच वाचायला सुरवात केली. मंत्रीमहोदय आणि विरोधकांच्या दारूबंदीवरुन मनमोकळ्या चर्चा होवू लागल्या. चर्चा आणि विवाद ऐन रंगात आला असतानाच त्यात भाग घेतला तो आचार्य अत्रे.

चर्चेत सहभागी होत म्हणाले,

मंत्रीमहोदय म्हणत आहेत ते एकदम बरोबर आहे. खरत राज्यात दारूंबदी झाली आहे. त्यांनी मला बाटलीच नुसतं नाव सांगण्याचा अवकाश मी लगेच ती बाटली घेवून विघानसभेत हजर करतो की नाही बघा. 

अत्रेंच्या या वाक्यावर सभागृहात हशा पिकला. अत्रेच्या या कोटीवर मंत्रीमहोदय शांत बसतील अस नव्हतं. मंत्रीमहोदयानी दारूबंदीचे फायदे पुन्हा एकदा सांगण्यास सुरवात केली ते म्हणाले, 

आत्ताच एका सभासदांनी बाटलीच नाव घ्या मी सभागृहात हजर करतो अस सांगितलं त्यांच म्हणणही बरोबर आहे. त्यांच्या गाडीत आणि घरात बाटल्या असाव्यात. एवढच नाही तर रात्री घेतलेल्या दारूचा वास अजूनही येत आहे. 

मंत्रीमहोदयांनी आचार्य अत्रेंना टोमणा मारून आपलं भाषण संपवलं पण आत्ता वेळ आचार्य अत्रे यांची होती. 

आचार्य अत्रे उभा राहिले आणि सभापतींना म्हणाले,

“मंत्रीमहोदयांनी आपल्या भाषणात माझ्या भाषणाचा उल्लेख केला आहे म्हणून मला बोलणं भाग आहे. सभापतींना मला बोलण्याची परवानगी द्यावी.” विशेष परवानगी घेवून आचार्य अत्रेंनी बोलण्यास सुरवात केली. 

अत्रे म्हणाले, 

“अध्यक्ष महोदय, माझं नाव न घेताच मंत्रिमहोदयांनी आपल्या भाषणात माझा उल्लेख केला. आपल्याकडं नवऱ्याचं नाव घेताना फक्त बायकाच लाजतात, एवढ ठावूक होतं. पण ते जावू दे. माझ्या गाडीत बाटल्या असल्याचा तसेच रात्रीची अजून उतरली नसल्याचा उल्लेख केला. मी त्यात थोडासा बदल करतो, मी इथं विरोधी पक्षात ते तिथं कॉंग्रेस पक्षात दोघात अंतरही बरच. योग्य अंतर ठेवा असा प्रचार-प्रसार करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या आमदारांना एवढ्या लांबून माझ्या तोंडाचा वास कसा काय आला ते कळालं नाही.

बरं !!! सकाळपासून मी त्यांना जवळ घेतल्याचही मला आठवत नाही. मी त्यांना जवळ घेतलं असतं ना तर त्यांना वास येण्याची शक्यता मी नाकारली नसती. 

हे ऐकताच सभागृह पुन्हा हशा आणि टाळ्यांनी दणाणून गेलं, यावेळी हशामध्ये मात्र कॉंग्रेसचे नेते देखील सहभागी झाले इतकच.

हे ही वाचा. 

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here