रस्त्याच्या दोन टोकांना जोडणारा प्रवास म्हणजे, “पतंगराव कदम”

copyright-bolbhidu.com

२०१७ सालच्या नोव्हेंबर महिन्यात पतंगराव कदमांची तासगाव शेजारी असणाऱ्या कवठ्यात सभा होती. स्टेजवर सांगली जिल्हाचं संपुर्ण राजकारण बसलेलं होतं आणि स्टेजवर बोलतं होते ते राज्याचं राजकारण कोळून पिलेले पतंगराव कदम.

नुकतच पतंगरावांना पलूसमध्ये झालेल्या कार्यक्रमाचं निमंत्रण नाकारलं गेलं होतं. पतंगराव नेहमीप्रमाणं जोशात होते, ते उभा राहिले आणि पहिलच वाक्य बोलले,

मी कुणाच्या आड येत नाही, आणि बोलवल्याशिवाय कुठं जात नाही !!!

पतंगरावाचं राजकारण सांगायला हे वाक्य पुरेसं आहे. तुम्ही कधी पुण्याच्या अलका टॉकीजच्या चौकात गेलात तर तिथ तुम्हाला दिसते ती पाच सहा मजली भारती विद्यापीठाची मुख्य इमारत. या इमारतीच्या पुढच्या चौकातून एक रस्ता टिळक रोडच्या दिशेने जातो. रस्ता म्हणजे छोटसं बोळच, या बोळात एक दहा बाय दहा ची खोली दिसते. दुसऱ्या मजल्यावर असणारी ती खोली.

या खोलीवर मोठ्या अक्षरात लिहलं आहे. भारती विद्यापीठाची स्थापना येथे झाली. रस्त्याच्या या दोन टोकांना जोडणारा प्रवास म्हणजे पतंगराव कदम.

सांगली जिल्ह्याच्या निम्या भागातून सागरेश्वरचा डोंगर जातो. एका बाजूला विस्तीर्ण कृष्णा नदीचं खोरं तर दूसऱ्या बाजूला घाटावरची लोकं. एका बाजूला ताकारीसारखं कृष्णेच्या काठावरचं गाव तर दूसऱ्या बाजूला कुसळात वसलेलं सोनसळ सारखं गाव. पतंगराव कदम याच सोनसळचे. एवढं सगळ सांगायचं कारण म्हणजे पतंगराव घाटावरचा माणूस. आजही नदीपट्यातील माणसं घाटावर मुली देत नाहीत.

मग जावयापेक्षा नेता जवळचा वाटणाऱ्या या जिल्ह्यानं पतंगराव सारखा घाटावरचा नेता कसा जन्माला घातला हे एक कोडच वाटतं.

सभेत उभा राहिलं की पतंगरावांच एक वाक्य नेहमी ठरलेलं असायचं, ते म्हणजे विश्वाची उत्पत्ती झाल्यापासून गावचा पहिला पदवीधर मीच.

खरतर हा विश्वास होता सामान्य कष्टकरी पोरानं एका कष्टकऱ्याच्या मनात पेरलेला. पतंगरावांनी कोणत्या वर्षी विद्यापीठ स्थापन केलं हे सगळेच सांगतील पण कोणी सांगणार नाही की, हा माणूस एस्टीचे पैसै वाचवायला चालत सोनसळ मधून कुंडलला जायचा. खूप कमी जणांना माहित असेल एस्टी चुकली म्हणून या माणसानं विट्याच्या पाण्याच्या टाकीवर रात्र काढली होती. खूप कमी लोकं येताजाता ती दहा बाय दहा ची खोली पहात असतील जिथं अजूनही लिहलं आहे,

“भारती विद्यापीठाची स्थापना येथे झाली”.

पतंगरावांच्या जाण्यानं कॉंग्रेसचं काय नुकसान झालं हे आज सांगण अवघड आहे, महाराष्ट्राचं काय नुकसान झालं याची गणित अनेकजण मांडत देखील असतील पण सामान्य घरातला पोरगा “पतंगराव कदम” होवू शकतो हे स्वप्न मात्र कोणीच साकार करु शकणार नाही अस वाटतं.

हे ही वाचा. 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here