सैफच्या तैमुरबद्दल वाचून बोअर झाला असाल तर इतिहासातला तैमुर वाचून घ्या.

WIKIPEDIA

भारताला विदेशी आक्रमकांचा मोठा इतिहास आहे. अनेक विदेशी आक्रमकांनी देशावर हल्ला केला आणि कधी काळी ‘सोन्याची चिडिया’ असणाऱ्या देशाची अमाप लुट केली. या विदेशी आक्रमाकांपैकीच मंगोल हे सुद्धा होते. मंगोल आक्रमकांची चर्चा जेव्हा कधी होते त्यावेळी चंगेज खानापासून सुरु झालेली चर्चा तैमुर लंगच्या नावावर येऊन थांबते आणि  त्याच्या लुटपाटीच्या कथा आपल्या अंगावर काटा उभा करतात. तैमुर लंग जितका क्रूर आणि निर्दयी होता तितकाच तो स्वभावाने विक्षिप्त आणि सनकी देखील होता. या विक्षिप्तपणाचंच एक उदाहरण म्हणजे तैमुरला सम्राट म्हणून एखादा प्रदेश जिंकून घेऊन त्यावर राज्य करण्यापेक्षा देखील जास्त रस लोकांच्या मनात आपल्याविषयी दहशत निर्माण करण्यात होता. आपलं नांव घेताच लोक भीतीने चळाचळा कापली पाहिजेत असं त्याला वाटत असे. आपल्या याच महत्त्वाकांक्षेपोटी जेव्हा त्याने दिल्लीवर हल्ला केला त्यावेळी त्याने प्रवासात अनेक ठिकाणी अभूतपूर्व लुटपाट केली होती आणि जिकडे तिकडे त्याच्या सैन्याच्या हिंसाचाराने थैमान घातलं होतं.

तैमुर लंग कोण होता..?

जगभरातल्या सर्वाधिक क्रूर शासकांपैकी एक म्हणून ज्याची ओळख आहे तो तैमुर लंग म्हणजे मंगोल साम्राज्याचा सम्राट होता. १४ व्या शतकातला या मंगोल शासकाने तैमुरी राजघराण्याची स्थापना केली होती. तो स्वतःला चंगेज खानाचा वारस मानत असे आणि लोकांनी देखील आपल्याला दुसरा चंगेज खान म्हणून ओळखावे अशी त्याची इच्छा होती. १३६९ साली समरकंद येथील मंगोल राजाच्या मृत्युनंतर तैमुरने मंगोल गादीवर ताबा मिळवला आणि पुढे मोठ्या प्रमाणात आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. १३९० च्या दशकात त्याने खुरासान, सीस्तान, अफगानिस्तान, फारस, अजरबैजान आणि कुर्दीस्तान हे प्रदेश मंगोल साम्राज्यास जोडले. पुढे १३९३ साली बगदाद आणि मेसोपोटेमिया जिंकून घेत १३९८ साली त्याने भारत मोहीम हातात घेतली आणि  भारताला देखील आपल्या साम्राज्यास जोडलं.

भारतावर आक्रमण.

WIKIPEDIA

इ.स. १३९८ साली तैमुरने भारतावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात त्याच्या काही सरदारांनी या मोहिमेस विरोध केला परंतु तैमुरने भारतात इस्लाम धर्माच्या प्रचारासाठी ही मोहीम आपण हाती घेत आहोत, असं सांगत या सरदारांना मोहिमेसाठी राजी केलं. त्यावेळी दिल्लीवर तुघलक साम्राज्याच्या महमूद याचं राज्य होतं. काफिर हिंदुविरुद्ध धर्मयुद्ध लढणं आणि त्यांची संपत्ती लुटून ती इस्लामी सैन्याच्या समृद्धीसाठी वापरणं, हे भारतावर आक्रमण करण्यामागचं आपलं उद्दिष्ट्ये असल्याचं तैमुर लंगने आपल्या ‘तुजुके तैमुरी’ या आत्मचरित्रात लिहिलंय. या मोहिमेसाठी सुरुवातीला तैमुरने पीर मोहोम्म्द या आपल्या नातवाला समोर पाठवलं होतं आणि नंतर जेव्हा त्याने मुलतान ताब्यात घेतलं तेव्हा स्वतः तैमुरने समरकंदहून भारताच्या दिशेने कूच केली.

मोठ्या प्रमाणत लुटपाट आणि अत्याचार.

तैमुरचं सैन्याने ज्यावेळी अफगणीस्तानमार्गे दिल्लीकडे कूच केली त्यावेळी या प्रवासादरम्यान सैन्याने आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे लुटपाट करायला सुरुवात केली. पंजाबचा सुपीक प्रदेश त्यांनी अक्षरशः उध्वस्त करून टाकला. अन्नधान्याची लुटपाट आणि जाळपोळ करण्यात आली. अनेक निष्पाप लोकांचा जीव घेतला गेला.

एक प्रसंग तर असा घडला की वाटेत त्यांना दिल्लीजवळ एक गांव लागलं. या गावातील लोक आपल्या धार्मिक परंपरेनुसार अग्निपूजा करत होते. स्वभावाने सनकी असणाऱ्या तैमुरला ही गोष्ट खटकली आणि त्याने आपल्या सैनिकांना सांगितलं की हे लोक धर्मविरोधी गोष्टीचं आचरण करताहेत. या लोकांना जगण्याचा काहीएक अधिकार नाही. सैनिकांना फक्त तैमुरच्या इशाऱ्याचीच गरज होती. तैमुरचा हा आदेश ऐकून त्याचे सैनिक निशस्त्र गावकऱ्यांवर जंगली श्वापदासारखे तुटून पडले आणि ज्या अग्नीची हे गावकरी पूजा करत होते त्याच आगीत त्यांना जिवंत जाळण्यात आलं. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं आणि हाडामासाची माणसे आगीच्या लोळात भस्मसात झाली.

दिल्लीच्या सुलतानाचा पराभव.

पानिपतजवळ तुघलक सुलतान मेहमूद याने आपल्या विशाल सैन्यासह तैमुरच्या सैन्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु या युद्धात त्याचा मोठा पराभव झाला. भयभीत झालेल्या तुघलक सुलतान मेहमूद याने संधी मिळताच युद्धभूमीतून धूम ठोकली. सुलतान मेहमूद पळून गेल्याने दिल्ली तैमुर लंगच्या ताब्यात आली.

दिल्ली विजयानंतरदेखील कौर्याची परिसीमा.

दिल्लीत प्रवेश केल्यानंतर देखील त्याने सर्वप्रथम लाखो लोकांना बंदिस्त केलं आणि एक एक करून त्यांची निर्घृणपणे त्यांची हत्या केली. पण तैमुर दिल्लीत देखील फार काळ थांबला नाही. अवघ्या काही दिवसातच त्याने उजबेकिस्तानच्या दिशेने कूच केली. उजबेकिस्तानच्या दिशेने जाताना वाटेत त्याने मेरठची लुट केली. भारतातून लुटलेली संपत्ती घेऊन तो समरकंदला पोहोचला. सोबत तो काही भारतीय कारागिरांना देखील घेऊन गेला. असं सांगतात की समरकंदमधील प्रसिद्ध जामा मस्जिद पण भारतातून नेण्यात आलेल्या कारागीरांनीच बांधली. भारतातून समरकंदला परतल्यानंतर तैमुरने १४०२ साली अंगोराच्या युद्धात अॅटोमन तुर्कांचा पराभव करत ही भूमी आपल्या साम्राज्यास जोडली. पुढे १४०५ साली चीनवर आक्रमण करण्याच्या तयारीत असतानाच त्याचा मृत्यू झाला.

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here