काय होता, मानवत खून खटला…

सत्तरच्या दशकातील गोष्ट आहे. आधीच दुष्काळाने महाराष्ट्राला निम्म्यावर आणलं होत. सगळीकडे हाहाकार उडाला होता त्यातच एका गावामुळे लोकांना घरातून बाहेर पडायचं पण बंद पाडलं होतं.

गावाचं नाव मानवत.

मराठवाड्यासारख्या रखरखीत प्रदेशातील एक छोटं खेड. जिल्हा परभणी, तालुका पाथरी. या गावाने पूर्ण राज्याला धडकी भरवली कारण ही तसच होतं. मानवत मध्ये दर थोड्या दिवसांच्या अंतरावर लहान मुलींचे मृतदेह सापडत होते. डिसेंबर १९७२ पासून जवळपास तेरा महिन्यात अकरा खून झाले होते. विशेषतः दहा बारा वर्षांच्या मुलींचे. सगळे खून एकाच पद्धतीने केले गेले होते.

खून कोण करतंय कोणालाच काही थांगपत्ता लागत नव्हता. गावातली लोक एवढी घाबरली होती की कोणीच तोंड उघडायला तयार नव्हत. तपासाला दिशाच मिळत नव्हती. अखेर राज्याच्या गृहमंत्र्यांना स्वतः हस्तक्षेप करावा लागला.

मुंबईहून रत्नाकर कुलकर्णी या सीआयडीच्या बहादूर पोलीस ऑफिसरना या कामगिरीवर पाठवण्यात आलं. सुरवातीचा काळ त्यानाही कुठूनच काही सुगावा लागत नव्हता. हे खून रात्रीच्या वेळी करण्यात येत होते आणि हे मृतदेह गावाबाहेरच्या नाल्यात टाकले जात होते. अशातच एका मुलाचा खून झाला. या मुलाच्या खुनावेळी मिळालेल्या पुराव्यावरून धागे दोरे लागत गेले आणि छडा लागला.

तर या गावाजवळ एक पारधी वस्ती होती. मुलखाची गरिबी असल्यामुळे तिथे अनेक बरेवाईट उद्योग चालायचे. यातच एक धंदा चालायचा हातभट्टीचा. याची मालकीण होती, रुक्मिणी. असं म्हणतात ती खूप सुंदर होती. तिला तिच्या नवऱ्यान टाकलेलं. या पारधी वाड्यावर दारूसाठी रेग्युलर कस्टमर असणाऱ्या उत्तमरावचा जीव तिच्यावर आला.

एक दिवस ही रुक्मिणी पारधीवाड्यातून गायब झाली.

तिची शोधाशोध सुरु झाली. पण तिच्या बापाला ठाऊक होतं हे काम फक्त उत्तमराव करू शकतो. पण तो होतं गावातला मातब्बर असामी. त्याला जाब कोण विचारणार? तरी हात जोडून त्याच्यापुढे गेलेल्या पारध्यांना त्याने गुर्मीत सांगितले,

“होय मी पळवली आहे रुक्मिणीला, आणि तिला मी ठेवणार आहे.”

पारधी बिचारे परत गेले. काही दिवसातच रुक्मिणी परत गावात दिसू लागली. तिच्यासाठी उत्तमरावने गावाबाहेरचा भगीरथ मारवाड्याचा वाडा विकत घेतला आणि तिला तिथे ठेवले. रुक्मिणी तिथून आपला दारूचा धंदा करू लागली. उत्तमरावच्या छत्रछायेमुळे तिचा धंदा बहरला. पोलिसांचा छापा पडायचं बंद झाल्यामुळे तुफान पैसा मिळू लागला. सगळ्या सुखसोयी हात जोडून उभ्या होत्या पण रुक्मिणी खुश नव्हती.

रुक्मिणीला स्वतःचं मूल हवं होतं. तिच्या सगळ्या भावंडाना खंडीभर पोरं होती. उत्तमरावची खऱ्या बायकोपासून झालेली पोरं सुद्धा बक्कळ होती. पण रुक्मिणीलाचं गर्भ राहत नव्हतं. ती वैतागायची. एवढा कमावलेला पैसा शेवटी मालकाच्या सख्ख्या पोरांच्या उरावर टाकून जाव लागणार याच तिला दुःख होतं. त्यातच वेळे आधीच तिची मासिक पाळी बंद झाली. गावच्या डॉक्टरनी जुजबी उपचार केले पण काही उपयोग झाला नाही. मग शेवटचा मार्ग म्हणून ती देवदेव करायला लागली. त्यातूनच नवस गंडे दोरे करण्याचा तिला नाद लागला.

मानवत गाव हे खजिन्यासाठी फेमस आहे. असं म्हणतात की सोळाव्या शतकात अहमदनगरच्या निझामाच्या आक्रमणात अख्खं गाव रिकाम झालं होतं. लोक पळून जाताना आपली संपत्ती शेतात वगैरे पुरून गेले होते. त्या खजिन्याच्यामागे लोक आजही वेडे आहेत. हा खजिना शोधण्याच्या निमित्ताने बरेच तांत्रिक या गावात डेरा टाकून बसले होते.

रुक्मिणी याच तांत्रिकाकडे आशीर्वादासाठी जाऊ लागली. वेगवेगळे मांत्रिक तांत्रिक ट्राय केले. त्यानाही गुण येईना मग तिला भेटला गणपत साळवे.

रुक्मिणीचा वाडा होता तिथे आवारात एक पिंपळाचे मोठे झाड होते. मांत्रिकाच म्हणण होतं की, या झाडावर मुंजाचं वास्तव्य आहे. आख्यायिकेनुसार मुंजाबा म्हणजे एक गरीब ब्राम्हण होता जो लग्न होण्यापूर्वी मेला होता. तो भूत बनून पिंपळावर वास्तव्य करत असतो. अशा या मुन्जाला सुंदर मुली आवडतं असतात. या मांत्रिक गणपत साळवेने रुक्मिणीला मुंजाला खुश करण्यासाठी मंत्रतंत्र देण्यास सुरवात केली.

रुक्मिणीची बहीण होती समिन्द्री. ती सुद्धा दारूच्या धंद्यात मदत करण्यासाठी रुक्मिणीच्या वाड्यावर राहायला होती. ती सांगते,

“आधी तर आम्हाला काही कल्पना नवती. सुरवातीला वाटायचं काळी बाहुली वगैरे जादू असेल. पण नंतर बोंदरवाडीच्या मांत्रिकाने रुक्मिणीला सांगितलं की मुंजाला भाग चढवावा लागेल.”

भाग म्हणजे नरबळी. रुक्मिणीला सांगण्यात आलं होतं की चार भाग चढवावे लागतील तेही कुमारिका मुलींचे.

तिथून सुरु झाला खुनाचा सिलसिला. उत्तमरावला खजिन्याच आमिष दाखवून यात सामील करण्यात आलं. पण बहुतांश वेळा तो दारूच्या नशेत वाड्याच्या माडीवर पडलेला असे. रुक्मिणीने त्याच्या विश्वासू गड्यांना धरले आणि ही भाग आणण्याची जबाबदारी दिली.

शंकर आणि सोपान नावाचे हे गडी कुठून कुठून शोधून दहा बारा वर्षाच्या मुली आणायचे. बऱ्याचदा या मुली कुठल्यातर पाडा वस्ती वरच्या असायच्या. त्यांच्या गुप्तांगाला चिरून त्या रक्ताने मुन्जाला अभिषेक घातला जायचा. झाल्यावर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली जायची.

गयाबाई, शकीला आणि सुगंधाबाई अशा तीन मुलीना एका पाठोपाठ एक मारण्यात आलं. तरी देवाचं समाधान होईना म्हटल्यावर चौथी मुलगी शोधण्यात आली नसिमा. ही दहा वर्षाची मुलगी सुंदर आणि गोरीपान होती. तिची निर्घुण हत्या तर केलीच पण तीच शीर मुंजाला प्रसाद म्हणून चढवण्यात आले.

तरीही मुंजा काही प्रसन्न झाला नाही. त्यात नुकताच जेलमधून सुटून बाहेर आलेला रुक्मिणीचा भाऊ तुक्या सुद्धा सामील झाला. मग त्यांच्या क्रूरतेला निर्बंधचं उरला नाही. त्यांनी गर्भवती महिलांच पोट चिरून त्यातल्या बाळाचा देखील नरबळी दिला. हे खुनामध्ये इतके तरबेज झाले होते की एकही पुरावा ते मागे सोडत नव्हते. अशातच एकदा त्यांना कोंडीबा नावाच्या मुलाने हे खून करताना पाहिलेत अशी शंका आली. त्यामुळे त्याला संपवण्याची जबाबदारी समिन्द्रीवर देण्यात आली.

याच खुनामुळे या हत्याकांडाचे धागे दोरे मिळाले.

त्या काळात सगळीकडे भीतीदायक वातावरण झालं होतं. पेपरमधून रोज बातम्या येत होत्या. बायका पोरीना घरातून बाहेर पडायचं सुद्धा मुश्कील झालं होतं. वाड्यावस्त्यांवर तरुणमुले पहारा ठेवू लागली. धट्टीकट्टी माणसे देखील संध्याकाळ नंतर एकट बाहेर पडायला घाबरू लागली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच सीआयडीच्या पोलीसाना मुंबई बाहेरच्या खटल्यांसाठी पाठवण्यात आलं होतं. त्यांनी हे सगळे प्रकरण उकरून काढले.

जेव्हा रुक्मिणीला शंका आली की आपली कृष्णकृत्ये बाहेर येत आहेत तेव्हा ती चन्द्रपूरला देवदर्शनाच्या नावाखाली पळाली. पण पोलिसांनी त्यांना धरून आणले. आणि या सगळ्या खेळाचा पर्दाफाश झाला. पूर्ण महाराष्ट्राने सुटकेचा निश्वास टाकला.

या मानवत हत्याकांडाचा खटला बरेच वर्ष गाजला. उच्च न्यायालयात यशवंत चंद्रचुड हे न्यायाधीश असताना त्यांनी निकाल जाहीर केला. यात रुक्मिणीबाई आणि उत्तमराव यांनी प्रत्यक्ष खून केलेला नसल्यामुळे त्यांना फाशी होऊ शकली नाही. शंकर माफीचा साक्षीदार बनला तर सोपानला फाशी सुनावण्यात आली. याच खटल्याने बी.जी. कोळसे पाटील हे वकील म्हणून प्रसिद्धीस आले. पुढे त्यांनी जोशी-अभ्यंकर खून खटला देखील यशस्वीपणे हाताळला.

हे ही वाच भिडू. 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here