या माणसापुढं रोमियो पाणी भरायला जायचा, तर राजेश खन्ना लाजनं चक्काचूर व्हायचा..!!!

प्रद्युम्न कुमार महानंदिया.

तुमच्या आमच्या सारखाच. दोन हातांचा आणि दोन पायांचा हाडामासांचा माणूस. भारतातल्या एका कोपऱ्यात बसून चित्र काढणारा. एवढा एकच गुण त्याचा सांगता आला असता, जर का ती भारतात आली नसती. जर का हा तीच्या प्रेमात पडला नसता. जर का त्यानं पुढला इतिहास लिहला नसता…

ते प्रेमातलं दिलअसतं ना ते झाडावर कोरायला नसतं. ते घेऊन जगायचं असतं. असंच तीच्यावर प्रेम केलेल्या त्याची ही गोष्ट. 

तर या कथेची सुरुवात होते १९७५ सालापासून.

ओडीशातील एका खेडेगावातील दलित कुटुंबात जन्मलेल्या प्रद्युम्नने आपलं चित्रकलेचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. दिल्लीतील ‘कॅनॉट प्लेस’ भागात तो लोकांचे पोर्ट्रेट बनवून देण्याचं काम करत होता. आपल्या चित्रकलेतील कौशल्यामुळे त्याने अल्पावधीतच नांव कमावलं होतं. कुठल्याही व्यक्तीचं पोर्ट्रेट फक्त १० मिनिटांत बनवून देण्यासाठी तो प्रसिद्ध होता.

‘शार्लट वॉन शेडविन’ ही १९ वर्षीय स्वीडन पर्यटक आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत भारत फिरायला आली होती. फिरता-फिरता ती ‘कॅनॉट प्लेस’ परिसरात पोहोचली तेव्हा तीला पी.के. बद्दल ऐकायला मिळालं.

कुतुहूल म्हणून ती पी.के.ला भेटायला गेली आणि आपलं पोर्ट्रेट बनवायला सांगितलं. पी.के. नी बनवलेलं पोर्ट्रेट तर शार्लटला आवडलं नाही, पण ते दोघं मात्र एकमेकांना पहिल्याच नजरेत आवडून गेले.

एका नजरेतलं प्रेम होतं ते…

पी.के. दलित समाजातून आला होता. लहानपणापासून त्याची आई त्याला परीची गोष्ट सांगायची. ती म्हणायची एका जंगलात एक राजकुमारी आहे. ती तुला घेऊन जाईल. गरिबीत असणारा हा आईचा राजकुमार मग राजकुमारीची स्वप्न रंगवायचा. मग त्याची आई गोष्टीत खरेपणा येण्यासाठी राजकुमारीचं वर्णन करायची. सोनेरी केसांची, गुलाबी गालांची राजकुमारी.

असाच एक दिवस होता.

ओरिसाची तीच झोपडी. पी.के. तिच्या झालेल्या बायकोला घेऊन झोपडीच्या दाराशी आला. सोन्याच्या केसाची, गोरिपान राजकुमारी. आपला राजकुमार तीला घेऊन घरी आलेला पाहून तीला काय वाटलं असेल ते माहित नाही. पण पोराचं स्वप्न पुर्ण झालं होतं.

दिल्लीच्या कॅनॉट प्लेसच्या एका कोपऱ्यावर तीचं चित्र काढताना तो तिच्या आणि ती त्याच्या प्रेमात पडले होते. लग्न केलं होतं. आत्ता शार्लट ओरिसाची सुनबाई झाली होती.

सगळं चांगल चालू झालं. दोघं संसाराला लागले पण शार्लटला स्वीडनला जायचं होत. तीनं तस पी.के. ला सांगितलं. ती परत गेली. आत्ता पी.के. तीची वाट पाहू लागला. पत्र यायची. बोलणं व्हायचं. ती म्हणायची मला येता येणार नाही पण तू ये….

मी तिकीट पाठवते. पण आपला पी.के. तीनं पाठवलेल्या तिकीटावर जायला तयार नव्हता. आपणच पैसे जमवावेत आणि जावं हा विचार त्यानं केलेला. पण रस्त्यांवर चित्र काढून कोण विमानाचं तिकीट घेत का ?  त्यानं प्रयत्न केले पण शक्य नव्हतं.

पी.के. नं ठरवलं. आपण सायकलवरुन स्वीडनला जायचं…

होय प्रेमात, युद्धात सगळ माफ असतं. असले धाडसी आणि येडे निर्णय घेणं देखील.

कदाचित असे काहीतरी करण्यालाच प्रेम म्हणत असावेत.

पी.के. नं सायकल घेतली. त्याची ती गुलाबी सायकल. पी.के. सुसाट सुटला !!!!

अंतर होतं. ५००० किलोमीटर. पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, तुर्की, बुल्गारिया, जर्मनी, ऑस्ट्रीया, डेन्मार्क आणि स्वीडन असा तो रस्ता.

दिवस होता २२ जून १९७७ चा. दिल्लीच्या त्या उन्हाळ्याच्या वातावरणातून यानं स्वीडनच्या दिशेनं सायकल वळवली. तेव्हा हजारों वर्षांपासून दिल्लीवर स्वाऱ्या करणाऱ्या योद्ध्यांचे आत्मे पण लाजले असतील. आम्ही स्वाऱ्या केल्या पैशासाठी, सत्तेसाठी… आणि हा जातोय प्रेमासाठी….

रोजचं पन्नास शंभर किलोमीटर. शक्य होईल ते अंतर पी.के. सायकलवरुन कापत होता. सुमारे पाच महिन्यांनंतर हा पठ्या स्वीडनमध्ये पोहचला.. 

प्रेमातला ‘फकिर’ माणूस आपल्या राजकुमारीला शोधत स्वीडनमध्ये गेला होता. तो तिथं  पोहचला तेव्हा समजलं की आपली राजकुमारी खरतर स्वीडनची देखील राजकुमारी आहे. एका राजघण्यातून येणारी शार्लट. ५००० किलोमीटर तुडवून आलेला पी.के. शांत बसणाऱ्यातला तर नव्हताच. त्यानं प्रयत्न केले. पोलिसांनी त्याला रोखलं.

त्याच्या नशिबांन एक दिवस ही बातमी शार्लटला समजली. ती धावून आली…

त्याला वाटलं होतं ही राजकुमारी आपल्याला  नकार देईल पण ती आली. ती भेट होती प्रेमाची. ‘दिल’ घेऊन जगणाऱ्या दिलवाल्या माणसाची…

दोघांनी लग्न केलं. पी.के. स्वीडनचा राजा झाला. पण ते स्वत:च्या हिम्मतीनं. त्यानं चित्र काढली. मोठ्ठा चित्रकार झाला. आज पी.के. च नाव स्वीडनचे प्रख्यात चित्रकार म्हणून घेतलं जातं. जगभरात त्याच्या चित्राचं प्रदर्शन भरतं. ओरिसा सरकारनं त्यांचा स्वीडनमधले भारताचे सांस्कृतिक दूत म्हणून कौतुक केलं .

 

 

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here