गेली ९९ वर्ष एक बंगाली कुटुंब पंजाबमधल्या जालियनवाला बाग स्मारकाची देखभाल करतंय.

१३ एप्रिल १९१९ बरोबर शंभर वर्ष झाले या घटनेला.

बैसाखीचा दिवस होता. अमृतसर मध्ये नेहमीच्या उत्साहात तो साजरा होत होता. दुपारच्या वेळी मात्र शहरातल्या जालियनवाला बाग मैदानाकडे लोकांची रीघ लागली.

इंग्रज सरकारच्या अन्यायी रौलट कायद्याच्या विरोधात गांधीजीनी देशभर सत्याग्रह आंदोलनाचा लढा सुरु केला होता. पंजाबमधले मोठे कॉंग्रेस नेते डॉ. सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांची अटक झाली होती. जालियनवाला बाग परिसरात होणाऱ्या सभेमध्ये आंदोलनाची पुढची दिशा काय असणार याचं मार्गदर्शन होणार होत. हजारो देशभक्त या सभेला हजर होते.

जालियनवाला बाग म्हणजे एक बंदिस्त मैदान आहे. साधारण साडे चार वाजता सभा सुरु झाली. लोक तल्लीन होऊन समोर चाललेले भाषण ऐकत होते. इतक्यात पाठीमागे बुटांचा खाडखाड आवाज येऊ लागला. लोक मागे वळून बघू लागले. ब्रिटीश आर्मीची पूर्ण एक कवायती पलटण मैदानाच्या प्रवेशद्वारावर येऊन उभी होती. जालियनवाला बाग मधून बाहेर पडण्याचे ते एकमेव ठिकाण होते.

या पलटणीचा कमांडर होता जनरल डायर. मैदानात जमलेला अख्खा जनसागर स्तब्ध होऊन या शस्त्रबंद सैनिकांचं नेमक चाललंय काय हे वळून पाहू लागला. अचानक जनरल डायरचा आवाज घुमला,

” फायर !!”

त्याची पलटण आपली पोजिशन घेऊन तयारच होती. त्यांनी आदेश मिळता क्षणी गोळीबार सुरु केला. जालियनवाला बाग मध्ये एकच हलकल्लोळ माजला. कोणतीही पूर्वसूचना न देता हा गोळीबार केला जात होता. कोणालाही पळून जायची वाट, संधी काहीच नव्हती. स्र्त्रिया, लहानमूले, वृद्धव्यक्ती कोणावरही दयामाया दाखवली गेली नाही.

दहा मिनिटात जवळपास सोळाशेजण मारले गेले. तेवढेचजण जखमी झाले. निरपराध भारतीयांचं रक्त सांडल गेलं होतं.

यातच होते डॉ. शस्तीचरण मुखर्जी. मुळचे बंगालचे असलेले डॉक्टर मुखर्जी प्रॅक्टीसच्या निम्मिताने अलाहबादला शिफ्ट झाले होते. तिथेच गांधीजीनी सुरु केलेल्या स्वातंत्र्यलढ्यात ते ओढले गेले. आपल्या कार्यामुळे त्यांनी कॉंग्रसंचे तेव्हाचे अध्यक्ष मदनमोहन मालवीय यांचं लक्ष वेधून घेतलं . डॉ.मदनमोहन मालवीय यांनी या उत्साही कार्यकर्त्याला जालियनवाला बाग सभेच्या आयोजनाची जबाबदारी दिली होती.

 जेव्हा गोळीबार सुरु झाला तेव्हा डॉ. मुखर्जी स्टेजवर होते. जनरल डायरच्या बरसणाऱ्या गोळ्यापासून वाचण्यासाठी त्यांनी स्टेजवरच्या डायसचा आधार घेतला आणि कसेबसे स्वतःचे प्राण वाचवले.  त्यांच्या डोळ्यासमोर हा नृशंश नरसंहार झाला होता. तेव्हा बसलेला त्यांना धक्का खूप मोठा होता.

मैदानात पसरलेले मृतशरीर , तिथे वाहिलेले आपल्या देशबांधवांच्या रक्ताचे पाट त्यांना रात्री झोपू देत नव्हते. जालियनवाला बाग मध्ये मेलेले लोक कोणी अपराधी नव्हते. त्यांनी आपल्या देशासाठी प्राण वेचले होती. त्यांचा सन्मान झालाच पाहिजे, येणाऱ्या प्रत्येक पिढीला या सांडलेल्या रक्ताचं महत्व कळाल पाहिजे या विचारांनी डॉ. मुखर्जी यांना झपाटल.

तेव्हाच बातमी आली की ब्रिटीश सरकार जालियनवाला बाग इथे कपड्याचे मार्केट सुरु करणार आहे. तिथे झालेल्या घटनेच्या आठवणी पुसण्याचा हा प्रयत्न होता,

डॉ. मुखर्जींनी कॉंग्रेसच्या सभेत जालियनवाला बाग इथे स्मृतीस्थळ उभे करण्याचा विषय उपस्थित केला. यासाठी ती जागा विकत घ्यावी लागणार होती. कॉंग्रेसने मान्यता दिली. जेव्हा जालियनवाला बाग विक्रीसाठी लिलाव केला गेला तेव्हा कॉंग्रेसने त्यात सहभाग घेतला. ५.६५ लाखाला ही जागा पडणार होती.

गांधीजीनी पूर्णदेशभरात शहिदांच्या स्मृतीस्थळासाठी देणगी देण्यासाठी आवाहन केले. घरोघरी फिरून डॉ. मुखर्जी व इतर कार्यकर्त्यांनी जवळपास ९ लाखाची लोकवर्गणी गोळा केली. मुखर्जी यांच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण करण्यासाठी पंजाबच्या इंग्रज सरकारने त्यांना अटक केली. पण त्यांच्या सहकाऱ्यांनी हे कार्य थांबू दिल नाही. 

जालियनवाला बाग हत्याकांड ही भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वेगळे वळण देणारी घटना होती. इथल्या मातीने भगतसिंग, उधमसिंघ अशा क्रांतीकारकांना देशासाठी शहीद होण्याची प्रेरणा दिली. लाखो करोडो राष्ट्रभक्त तयार केले.

मुखर्जी यांची सुटका झाल्यावर त्यांची जालियनवाला बाग शहीदस्मारक समितीच्या सेक्रेटरीपदी नेमणूक झाली. आज शंभर वर्ष झाली पिढ्यानूपिढ्या हे बंगाली कुटुंब पंजाबमधल्या या स्मारकाची देखभाल करत आहे.

डॉ.शस्तीचरण मुखर्जी यांचे नातू सुकुमार मुखर्जी जालियनवाला बाग परिसरातल्या एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहतात. या स्मारकाची देखभाल करणे, तिथे येणाऱ्या पर्यटकांपुढे शहिदांच्या स्मृती जाग्या करणे. नव्या पिढीला आपल्या इतिहासाची ओळख करून देणे. वेळोवेळी तिथले प्रश्न सरकार दरबारी पोहचवणे हे कार्य ते करत आहेत.

ऐंशीच्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तानवादी चळवळीचा आगडोंब उसळला होता. अमृतसरमध्येच सुवर्णमंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांवर भारतीय लष्कराने कारवाई केली. या दहशतवाद्यांच्या उपद्रवाची झळ जालियनवाला बाग स्मारकावरही पडली.

मुखर्जी कुटुंबियांना जालियनवाला बाग इथून निघून जाण्यास सांगितलं गेलं. पण देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात लढण्याचा वारसा असलेले हे मुखर्जी तिथून हलले नाही. त्यांनी या दबावाला झुगारून दिल आणि देशाच्या एकतेच आदर्श उदाहरण प्रस्थापित केलं.

आज सुकुमार मुखर्जी जालियनवाला बाग इथे आपल्या ९० वर्षाच्या आईसोबत राहतात. त्यांच्या दोन्ही मुलींचं लग्न होऊन त्या आता सासरी असतात. सुकुमार मुखर्जी म्हणतात,

” आजोबांनी उचलेली देशाकार्याची, त्यागाची मशाल  प्राणापणाने सांभाळली आणि पुढेही आयुष्यभर हा वारसा सांभाळणार यात कोणतीही शंका नाही.”

हे ही वाच भिडू.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here