‘पद्मिनी’च्या मोहापायी लालबहादूर शास्त्रींनी देखील कर्ज काढलं होतं.

साल १९६४. स्थळ पंतप्रधान कार्यालय.


भारताचे पंतप्रधान वर्तमानपत्र चाळत होते. तेव्हा त्यांना एक जाहिरात दिसली. जाहिरात भारतात नव्याने लँच झालेल्या एका कारची होती. छोटी सूटसुटीत एक कुटुंब निवांत प्रवास करेल अशी ती कार पंतप्रधानांना आवडली.  त्यांच्याकडे स्वतःची कार नव्हती. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाप्रमाणे त्यांचंही स्वतःच्या चारचाकीचं  स्वप्न होत आणि त्यात वावग ही काय नव्हतं.  


जाहिरातीत गाडीची किंमत होती बारा हजार रुपये. लगेच आपल्या सेक्रेटरीला आपल्या बँक खात्यात किती पैसे आहेत बघायला सांगितल. सात हजार रुपये होते. 


आता काय करायचं? रात्री घरी आल्यावर बायका पोरांपुढे त्यांनी हा कारचा विषय काढला. बायको म्हणाली बजेटमध्ये बसत नाही तर मग नको आपल्याला कार. पण प्रधानमंत्र्यांच गाडीवर मन बसलं होत. ५००० रुपये कमी पडत होते. 


आजकाल मंत्र्यालासुद्धा प्रचाराला हाक मारल्यावर उद्योगपती विमान दारात आणून उभी करतात. इथे तर खुद्द पंतप्रधानांना कार साठी थोडे पैसे कमी पडत होते. एका इशाऱ्यावर कोणी पण एक सोडून दहा कार दारात आणून उभ्या केल्या असत्या. पण हे पंतप्रधान पडले पक्के गांधीवादी. त्यांनी बँकेच ५००० रुपयांचं कर्ज घेतलं आणि तीच कार विकत घेतली.


ते पंतप्रधान होते कै. लालबहादुर शास्त्री. कार होती फियाट ११००D. आणि पंतप्रधानांना कर्ज देणारी बँक होती पंजाब नशनल बँक. हो तीच निरव मोदीमुळे बदनाम झालेली.


पुढे एका वर्षात शास्त्रीजींचे निधन झाले. त्यांच्यानंतर पंतप्रधान बनलेल्या इंदिरा गांधीनी हे कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव ठेवला. पण शास्त्रीजीच्या त्यांच्याप्रमाणेच स्वाभिमानी असलेल्या पत्नीने याला नकार दिला. त्यांनी पुढच्या चार वर्षात हळूहळू हे कर्ज फेडून टाकले. आजही हि कार दिल्लीच्या लालबहादूर शास्त्री संग्रहालयात जपून ठेवलेली आहे.


खुद्द पंतप्रधान शास्त्रीजीनी कर्ज घेऊन विकत घेतलेली फियाट कार.


फियाट ने भारतात ही कार बनवण्याचे लायसन्स दिले होते सोलापूरचे महान उद्योगपती वालचंद हिराचंद यांच्या प्रिमीयर या कंपनीला. प्रीमियरने ही गाडी बनवण्याचा कारखाना मुंबईच्या कुर्ला इथे सुरु केला. फियाट ११००D मध्ये भारतीय ग्राहकांच्या दृष्टीने थोडेसे बदल केले .


आणि गाडीचं नाव दिले “प्रिमियर पद्मिनी”.

राजपुताण्याच्या शौर्याच्या त्यागाचं प्रतिक असलेली महाराणी पद्मिनी. कोणत्याही सेनेची भावना न दुखावता ही कार भारताच्या रस्त्यावर धावू लागली. सत्तर आणि ऐशीच्या दशकात पद्मिनीचेच राज्य होते. 


त्याकाळात अँम्बेसेडर ही एकमेव गाडी फियाट पद्मिनीच्या स्पर्धेमध्ये होती. पण अँम्बेसेडरच्या स्टाईलमध्ये थोडासा पुढारीपणा होता पण  पद्मिनी सर्वसामान्य छोट्या कुटुंबाचीची कार होती. आपल्या पैकी बऱ्याच जणानी आयुष्यात ते बसलेली पहिली चारचाकी म्हणजे प्रिमियम पद्मिनी असेल. धर्मेंद्र, मामुट्टी, आमीर खान पासून खुद्द मेगास्टार रजनीकांत पर्यंत अनेकांची ही पहिली कार होती.


पद्मिनीचे राज्य मारुती येई पर्यंत टिकले. नव्या जमान्याची स्वस्त सूटसुटीत मारुतीवर मध्यमवर्गीयांची उडी पडली. पण म्हणून पद्मिनी बंद पडली का ?


पद्मिनीला जगवले आर्थिक राजधानी मुंबईच्या टॅक्सीवाल्यांनी. किंवा मुंबईच्या टॅक्सीवाल्यांना पद्मिनीनेच जगवले असंही म्हटल तर चुकीचं ठरणार नाही. अंगावर नेसलेली काळी साडी आणि डोक्यावर घेतलेला पिवळा पदर अशा वेषातली पद्मिनी टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांची शान बनली.

जागतिकीकरणाच्या वाऱ्यात ताशी १२५ किमी वेग असणारी पद्मिनी टिकणारच नव्हती. प्रीमियर कंपनीने १९९७मध्ये त्याचे प्रोडक्शन थांबवले. 

आज पण मुंबईमध्ये कुठे कुठे तरी ओला उबरच्या गर्दी मध्ये एखादा सरदारजी काळ्यापिवळ्या पद्मिनी टॅक्सी मध्ये भाडं घेऊन निघालेला दिसतो. तेव्हा वाटतं की शास्त्रीजींच्यासारखी एखादी मध्यमवर्गीय फॅमिली त्यात बसली असेल. बायको लोकलच्या ऐवजी टॅक्सी मधून जाण्याबद्दल अजूनही नवऱ्याला चार गोष्टी सुनावत असेल. तिचा डोळा मीटरकडे असेल आणि नवरा मात्र थाटात पोरांना रस्त्यावरची मज्जा दाखवत असेल.

हे ही वाच भिडू.