महात्मा फुले ते वासुदेव बळवंत फडके अशा अनेकांना घडवणारे ‘क्रांतीगुरु वस्ताद लहूजी साळवे’

पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी एक गाव आहे त्याच नाव पेठ. लहूजी वस्ताद याचं हे मूळ गाव. लहूजीचां जन्म एका पराक्रमी मातंग कुटुंबात झाला. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्वजांना युद्धात केलेल्या कामगिरीबद्दल राउत ही पदवी देऊन गौरवले होते. साळवे घराण्याच्या शौर्य आणि पराक्रमाची परंपरा लहूजींचे वडील राघोजी साळवे यांच्याकडे वारसाहक्काने चालत आलेली होती .

असं म्हणतात राघोजी साळवे यांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात पुरंदर भागात “जिवंत वाघ’ पकडला होता. या पराक्रमाची बातमी पेशव्यांना समजली. साळवे घराण्याचा इतिहास पेशव्यांना समजला. त्यांनीही सन्मानपूर्वक राघोजी साळवे यांची शिकारखाना व शस्त्रागार प्रमुख म्हणून नेमणूक केली.  

१८१७ च्या खडकी मध्ये लढल्या गेलेल्या मराठा इंग्रज युद्धात राघोजी व २३ वर्षे वयाच्या लहुजी आपल्या मावळ्यांच्या सोबत सामील झाले . या लढाईत आपल्या तलवारीच्या जोरावर  त्यांनी बराच काळ इंग्लिश सैन्याला रोखून धरले. या बापलेकाचा पराक्रम पाहून इंग्लिश अधिकारी सुद्धा आश्चर्यचकित झाले होते. त्यांनी आपल्या सैन्याला राघोजीचा बंदोबस्त करायचा आदेश दिला.

एका सैनिकाने नेम धरून राघोजीना गोळी मारली. राघोजींचा रणांगणावर मृत्यू आला. मराठी सेनेचा या युद्धात मोठा पराभव झाला. युद्धज्वराने बेभान झालेल्या इंग्लिश सैन्याने वीर राघोजी साळवे यांच्या मृतदेहाची दगडाने ठेचून विटंबना केली. हे सर्व तरुण लहूजी भरल्या डोळ्यानी पहात होते. इंग्रजांच्या या क्रूर कृत्यामुळे त्याच्या मनात बदल्याची आग भडकली होती.

१८१८ साली दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या पराभवानंतर मराठी सत्तेचा अंत झाला. शनिवार वाड्यावर युनियन जॅक झळकला.

लहूजीनी आपल्या राघोजींची समाधी त्यांनी ज्या ठिकाणी देह ठेवला तेथेच उभारली आणि शपथ घेतली,

“जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी”

इंग्रज सत्ता उलथवून स्वराज्य निर्मिती करण्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य वेचले. त्यासाठी आयुष्यभर ब्रम्हचर्य स्वीकारले. देशसेवेसाठी अज्ञातवास, युद्ध, अशा अनेक मार्गांचा अवलंब करावा लागणार त्यामुळे भावनिक आमि प्रपंचवादी न राहता देशसेवा हाच माझा प्रपंच त्यांनी मानला व देशसेवेसाठी आयुष्य अर्पण केले.

लहुजींना माहित होते जगावर राज्य करणाऱ्या इंग्रजांवर मात करणे एवढे सोपे नाही. त्या साठी जहाल क्रांतिकारकांची एक नवी पिढी निर्माण करावी लागेल. आपल्या अंगी असलेले वंश परंपरागत युद्धकलेचे ज्ञान तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले.

लहूजीबाबांची ओळख वस्ताद अशी बनली. या तालमीत सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले

यातच होते महात्मा जोतीबा फुले. बालवयातच जोतीबा आणि त्यांचे मित्र सदाशिव गोवंडे हे लहूजी बाबांकडे प्रशिक्षण घेण्यासाठी येऊ लागले. तलवार दांडपट्टा निशानबाजी या मर्दानी खेळत ते चांगलेच तरबेज झाले. त्यांची प्रगती एवढी होती की जोतीबा जेव्हा दांडपट्टा फिरवीत तेव्हा त्यांचे कौशल्य पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडे. लहूजी वस्ताद यांना आपल्या या पठ्ठ्याचा खूप अभिमान होता.

महात्मा जोतीबा फुले यांच्या शिक्षणप्रसाराच्या चळवळीच्या पाठीशी ते ठाम पणे उभे होते. आपल्या समाजबांधवाना शिका, धीट व्हा आणि शोषणकर्त्यांना धडा शिकवा असा उपदेश ते नेहमी करत.

जोतिबा आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी सुरु केलेल्या मुलींच्या शाळेच्या पहिल्या विद्यार्थिनीमध्ये होती लहूजी वस्तादांची नातलग मुक्ता साळवे.

 मुक्ताचा ज्ञानोदय या मासिकामध्ये १ मार्च १८५५ ला “मांगमहारांच्या दुःखाविषयी निबंध” प्रकाशित झाला होता.  या निबंधात या चौदा वर्षाच्या मुलीने मांडलेले विचार आज जवळपास दीडशे वर्ष होऊनही आजही समाजाला विचार करायला लावणारे आहेत. त्यांचा उल्लेख आजही आद्य दलित लेखिका असा केला जातो. त्यांच्यासारख्या अनेक मांग महार जातीतल्या मुलीना त्यांचे पालक लहूजी वस्तादांच्या शब्दाखातर फुलेंच्या शाळेत पाठवत होते.

असे म्हणतात त्या काळात पुण्यात व परिसरात घडलेल्या प्रत्येक क्रांतिकारी चळवळीमागे लहूजी वस्तादांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग होता. उमाजी नाईकांपासून वासुदेव बळवंत फडके यांच्या पर्यंत अनेकांना त्यांनी मदत केली होती. वासुदेव बळवंत फडके हे त्यांचे पट्टशिष्य होते. १८५७च्या उठवावेळी देखील लहूजीचे शिष्य आणि सैनिक कनय्या मांग, धर्मा मांग, नाथ्या मांग, रोदिया मांग, बाबीया माग, यशवंत मांग यांनी भाग घेतला.

१७ फेब्रुवारी १८८१ रोजी संगमवाडी परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. पण वस्तादानी लावलेली क्रांतीची ज्योत त्यांच्या शिष्यांनी विझू दिली नाही. पुढच्या अनेक पिढ्या देशभक्तीचा हा वसा निरंतर तेवत राहिला.

हे ही वाच भिडू.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here