पाय दाखवणारे “हात”.

 

गेल्या आठ दिवसांत नाशिक ते मुंबई असा शेतकर्‍यांनी लाँग मार्च काढला. लोंढा प्रसारमाध्यमांनी या मोर्चाकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र सोशल मिडियावर वातावरण तापू लागलं. त्यामुळे लोंढा प्रसारमाध्यमांनाही लाँग मार्चच्या बातम्या द्याव्या लागल्या. अलका धुपकर या पत्रकार मैत्रीणीने यामध्ये कळीची भूमिका बजावली. फेसबुकवर सर्वप्रथम या मोर्चाचं प्रभावी छायाचित्रण आणि व्हिडीओ क्लीप्स अलकाने पोस्ट केल्या. मोर्चाची भव्यता व ऊर्जा सर्वांपर्यंत पोहोचू लागली. त्यातही अलकाने पोस्ट केलेले शेतकर्‍यांच्या पायांचे आणि चप्पलांचे फोटो कमालीचे प्रभावी ठरले.  

चालून सुजलेले शेतकर्‍यांचे पाय, तुटलेल्या चप्पल, रक्ताळलेले पाय, तुटक्या चप्पलांना कापडी चिंध्यांनी दिलेला आधार, काही चप्पल नसलेले पाय, काही फोटोंमध्ये पाय आणि चप्पलांच्या जोडीला आधाराची काठी, फक्त एका पायात चप्पल घालून चालणारी स्त्री ही सर्व कंपोझिशन्स या मोर्चात सहभागी झालेल्या लोकांबद्दल व त्यांच्या आर्थिक, सामाजिक स्थितीबद्दल भाष्य करणारी होती. त्यांच्या खडतर प्रवासाचं चित्रण करणारी होती. म्हणून आपण हादरलो, अंतर्मुख झालो. या प्रत्येक फोटोत एक गोष्ट होती. खरंतर या आदिवासी शेतकर्‍यांच्या प्रश्नाला कित्येक कंगोरे आहेत. या ठिकाणी अलका धुपकरचे फोटो तिची एक ठाम भूमिका आपल्यापर्यंत पोचवतात. ते या कष्टकरी शेतकर्‍यांची पाठराखण करणारे असतात.

 

फोटो काढण्यापुर्वी फोटोग्राफरला हा आशय दिसलेला असतो का? यावर माझं उत्तर असतं की आशय हा आजूबाजूच्या समाजात, वातावरणातच असतो. फोटोग्राफरला तो फक्त सौंदर्यदृष्टीने पकडता आला पाहिजे. फोटोग्राफी ही दृष्य कला असल्यामुळे तुमच्या फोटोमध्ये सौंदर्यशास्त्र आलंच पाहिजे. अलका धुपकर यांनी चालत येणार्‍या शेतकर्‍यांचे पाय ही एक कल्पना डोक्यात आणली आणि  फोटोत, व्हिडीओत चित्रीत केली. फोटोतील पाय ज्या शेतकर्‍याचे आहेत तो शेतकरी, त्याचा चेहरा आपल्याला फोटोत दिसत नाही. तरिही तो चेहरा प्रत्येकाला दिसतो. आपण आपल्या अनुभवाच्या आधारे प्रत्येक पायासोबत चित्रीत न केलेलं शरीर पहायला लागतो. त्यांचे चेहेरे, त्यावरची वेदना आपल्याला कल्पनेत दिसू लागते. शेतकर्‍याचं संपूर्ण व्यक्तीचित्र वा पोर्टेट काढता आला असता. पण हा रुढ वा वापरुन गुळगुळीत झालेला मार्ग टाळून, थोडी जोखीम पत्करून अलकाने फक्त पायांचे फोटो काढून फेसबुकवर पोस्ट केले. ते अल्पावधीत देशभर व्हायरल झाले. समाजातील विविध स्तरांतील लोकांनी ते शेअर केले. ही फोटोग्राफीची ताकद आहे. अशिक्षित माणूसही फोटो वाचू शकतो. छायाचित्र ही वस्तुस्थिती दाखवतात. समोर घडणार्‍या घटनांचा पुरावा दाखवतात. 

मोबाईल फोन फोटोजर्नालिझम आणि सोशल मिडिया यांचं हे अद्भुत कॉंम्बीनेशन आहे. हल्लीच्या काळात इतक्या प्रभावीपणे हे कोणी वापरलेलं माझ्या पहाण्यात नाही. अलका धुपकर यांच्या या फोटोंना मी मुद्दामच मोबाईल फोटो जर्नालिझम असं म्हटलंय. कारण डिजीटल कॅमेर्‍याने हे काम इतक्या वेगानं करणं शक्य झालं नसतं. सध्याचा काळ फार वेगवान आहे. जगभरातल्या फोटो जर्नालिझमला मोबाईल फोनने फार मोठी टक्कर दिलीय. पूर्वी एखादी घटना घडली की फोटोग्राफर्स कॅमेरा घेऊन तिथं पोहचायचे. फोटो काढून ते संबंधीत प्रेस ऑफीसला पाठवले जायचे. पण मोबाईल फोनमध्ये कॅमेरा आल्यापासून सगळी गणितं बदलली. घटना घटताना वा घडल्यावर काही मिनीटांत त्याचे फोटो सोशल मिडियायावरून जगभर व्हायरल होऊ लागले. या वेगाला पारंपारीक फोटो पत्रकारीता तोंड कशी देणार? मग कॅमेरा कंपन्यांनी त्यांचे कॅमेरे वायफाय केले. त्यावरून त्वरीत फोटो डाऊनलोक करता यावेत हा उद्देश. पण कॅमेर्‍यावर इंटरनेट कसं वापरणार? आणि इथेच मोबाईल फोन फोटो जर्नलिझमने पारंपारीक फोटो पत्रकारीतेला मागे टाकायला सुरूवात केली. मोबाईलवर फोटो काढला रे काढला की अल्पावधीत तो मोबाईलवरच पोस्ट प्रोसेस करून इमेल करता येतो किंवा समाजमाध्यामांवर पोस्ट करता येतो. अशी सोय डिजीटल कॅमेर्‍यात कुठेय 

अलका धुपकर यांच्या या फोटोच्या निमित्तानं आपल्याकडे किती प्रकारचं काम करण्याच्या शक्यता आहेत हे लक्षात येऊ शकतं. या माध्यमाची ताकद लक्षात येऊ शकते जी कित्येकांना अजून ध्यानी आलेली नाहीये. डिजीटल कॅमेरा व त्यावर काढलेले फोटो पोस्ट प्रोसेस करायला लॅपटॉप याची गुंतवणूक लाखाच्या घरात जाते. एवढं करूनही मोबाईल फोनवर जेवढ्या सहजपणे फोटो मेल करणं, समाजमाध्यामांवर टाकणं सोप्प व स्वस्त आहे तेवढं ते डिजीटल कॅमेरा व लॅपटॉपद्वारे नाही. आणि मोबाईलने ही गुंतवणूक अगदी पाच दहा हजारांवर आणून ठेवली. ही फार मोठी क्रांती आहे. 

विनोद मुन्ना नावाचा हैद्राबादचा एक फोटोग्राफर मित्र आहे. त्यानं तेलंगाणातील दुष्काळावर प्रचंड ताकदीची एक फोटो सिरीज केलीय. त्यानं अलकाचे हे फोटो शेअर केले होते. त्याचा त्याच दिवशी मला फोन आला. तो म्हणला की मला शेतकर्‍यांची ही परिस्थिती बघवत नाहीये. आपण दोघं मिळून मराठवाड्यात फिरूया. पुन्हा काम सुरू करूया. पैसे नसतील तर उघड्यावर झोपू पण काहीतरी करू. मीसुद्धा त्याला होकार कळवला. आता येत्या मे महिन्यात आम्ही मराठवाड्याची फेरी करू. फोटो काढू. त्यातून काही बदलेल की नाही माहित नाही.

पण मुद्दा बाकी काही बदलण्यापेक्षा आपण बदलण्याचा आहे. अलका धुपकरच्या  फोटोंनी ही ठीणगी टाकलीय. आज प्रत्येकाकडे मोबाईल फोन नावाचं यंत्र आहे. त्याची ताकद काय असू शकते ते अलका धुपकरच्या फोटोंच्या निमीत्तानं समजून घेण्याची गरज आहे.

1 COMMENT

  1. आधिच अलकांचे फोटो कळीज पिळवटणारे होते…. तरी जे बधिर झालेत त्याना या लेखातून तरी जाग येईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here