कवट्या महाकाळच्या कवटीमागचा खरा चेहरा कोणाचा होता माहिताय का ?

ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असते धेय्य अचूक
तोच दिपवू शकतो जगाला होऊन खरा धडाकेबाज..

धडाकेबाज. महेश कोठारे इन्स्पेक्टरच्या भूमिकेत नसणारा हा एकमेव पिक्चर असेल. या पिक्चरमध्ये दिग्दर्शक महेश कोठारेंनी आपली महेश ज्याधवगिरी चक्क अश्विनी भावे यांना दिलेली. चांगली गोष्ट हिच की इथेपण इन्स्पेक्टर उमा “ज्याधव” अस नाव होतं. महेश कोठारेंनी केलेल्या काही निवडक भारी पिक्चरमध्ये आजही हा पिक्चर टॉपला आहे. तसा हा पिक्चर शोलेची गावठी आवृत्ती होता. म्हणजे एक खाण त्यात कवटीचा मुखवटा लावून फिरणारा डाकू. एक थरार निर्माण व्हावा म्हणून त्याचं नाव कवट्या महाकाळ. त्यात काहीतरी फॅन्टेसी पाहीजे म्हणून बाटलीतला गंगाराम. आणि मग तीन दोस्तांची दुनियादारी.

असा शोले पिक्चरचं गावठी स्पूप म्हणजे “धडाकेबाज” सिनेमा.  

तरिही या पिक्चरची चर्चा आजही होत राहते. सिनेमातल्या दोन पात्रांची एक वेगळी ओळख आजपण चर्चेत असते. पहिला म्हणजे गंगाराम आणि त्याचावर देखील वरचढ ठरलेला कवट्या महाकाळ. कवट्या महाकाळ हे एक अती भारी कॅरेक्टर होतं. वाटलीच तर लहान मुलांना थोडीफार भिती वाटावी म्हणून महेश कोठारेंनी त्याला कवटीचा मुखवटा घातला होता.

आत्ता या कवटीमागं नेमकं कोण होतं ?

कटप्पाने बाहुबलीला का मारंल असल्या प्रश्नांची उत्तर काळाच्या ओघात मिळाली पण कवट्या महाकाळ नेमका कोण होता याच उत्तर काय मिळालं नाही. त्यातच परवा परवा मुंबईच्या बाजारात आदरणीय मुख्यमंत्र्याच्या भाषणाचा एक एडिट केलेला व्हिडीओ व्हायरल झाला. कवट्या महाकाळचा डायलॉग आणि सीएम साहेबांच भाषण अगदीच तंतोतत जुळत असल्याची जाणिव झाली आणि पुन्हा कवट्या महाकाळचं भूत आमच्या डोक्यावर बसलं.

मग म्हणलं, आत्ता बास झालं 28-29 वर्ष होत आली या काळात आपल्याला रे मिस्टेरियाचा खरा चेहरा दिसला, केन नं पण मास्क काढला, कटप्पाने बाहुबलीचा खून का केला ते पण कळलं पण हा बाबा कोण होता ते का कळत नाही मग आम्ही शोध घ्यायचा निर्धार केला,

तेव्हा उत्तर मिळालं, “बिपिन वर्टी.” 

आत्ता हे बिपिन वर्टी कोण ?

तर तुम्हाला झपाटलेला आठवत असेलच. तर या पिक्चरमधला खुबड्या खबीज आठवतोय का. तेच हे बिपिन वर्टी. कवट्या महाकाळची भूमिका केली होती ती बिपिन वर्टी यांनी. आणि शेवटपर्यन्त कवट्या महाकाळ हा मास्क काढणार नाही हे देखील ठरलं होतं. त्यामुळे खूप मोठ्ठा खलनायक निवडण्याची समस्या महेश कोठारे यांच्या समोर नव्हतीच. तसही बिपीन वर्टी हे त्या काळातलं चांगल नाव होतं. ते चांगले अभिनेते होतेच पण त्याहून ते चांगले दिग्दर्शक देखील होती. त्यांनी चंगू मंगू, फेकाफेकी, एक गाडी बाकी अनाडी, डॉक्टर डॉक्टर हे सिनेमे दिग्दर्शीत केले होते.

त्याचसोबत धुमधडाका, अशी हि बनवाबनवी, भूताचा भाऊ अशा पिक्चरमध्ये छोटेमोठे रोल केलेले. त्यानंतर त्यांना कवट्या महाकाळचा रोल मिळाला. तो देखील त्यांनी केला.

पण कवट्या महाकाळची स्टोरी इथेच थांबली नाही. काही वर्षांपुर्वी महेश कोठारेंनी देखील ट्विटरवर कवट्या महाकाळ म्हणजे बिपीन वर्टी हेच नाव सांगितलं होतं. पण सोबत असही सांगितलं की, पुढे बिपीन वर्टी यांच्या तारखांचा घोळ झाला आणि मग ज्युनियर आर्टिस्टनी तो रोल केला.

टोटल सहा-सात जणांनी हि भूमिका केली त्यामुळे इतर सहा जण कोण होते ते मी देखील सांगू शकणार नाही. 

पण IMDb वर पण बिपीन वर्टी यांनाच क्रेडिट देण्यात आलं आहे. शिवाय पिक्चरच्या पाट्यात देखील पाहूणे कलाकार म्हणून बिपीन वर्टी यांचा उल्लेख आहे.

बस्स इतकचं, एक झपाटलेलं कोडं अनेकांना पडलेलं होतं म्हणून आपलं सांगितलं की.

हे ही वाच भिडू. 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here