एकेकाळी लताची बदली सिंगर असणारी ही खरोखर लताला रिप्लेस करू लागली.

हिंदी फिल्म इंडस्ट्रीला जगात ओळखलं जात ते आपल्या सिनेमामधल्या गाण्यांमुळे.  नौशाद,आर.डी.बर्मन, रेहमान असे संगीतकार असो अथवा लता,रफी, किशोर,आशा असे गायक हे भारतीय प्रेक्षकांसाठी सुपरस्टार होते.

एक काळ असा होता की लता मंगेशकर फिल्मस्टारपेक्षा जास्त मानधन घ्यायच्या. त्यांच गाण म्हणजे पिक्चरची गाणी सुपरहिट असे समीकरणच होते. यामुळे असं झालं की सगळे निर्माते दिग्दर्शक लता दिदी आपल्या सिनेमात गाव्यात यासाठी त्यांच्या दारात धरणे धरून बसायचे. त्यांचे वर्षभराचे डेट बुक झालेले असत.

लता दीदींची गाण्यासाठी तारीख मिळवली म्हणजे पंतप्रधानाची अपॉइन्टमेंट मिळवण्यापेक्षा जास्त आनंद दिग्दर्शकांना व्हायचा. मिळेल ती तारीख घेऊन सगळे खुश होत. पण तारीख कित्येक महिन्यानंतरची मिळे. गाण्याचं रेकोर्डिंग होऊन शुटिंगला सुरवात करण्यास वेळ जाई.

मग कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून आयडिया आली की लता दीदींच्या आवाजाची वाट बघण्यापेक्षा दुसऱ्या एखाद्या सिंगरच्या आवाजात तात्पुरते गाणे रेकोर्डिंग करून घ्यायचे, त्या रेकोर्डिंगवरून गाण्याचं शुटींग करायचं आणि नंतर लता मंगेशकर यांच्या आवाजात फायनल रेकॉर्ड मिळाल्यावर सिनेमामध्ये वापरायचं. या डबिंगसाठी लता दिदींच्या आवाजाला मॅच करेल अशी गायिका हवी होती.

एकदिवस त्याकाळातले नंबर एकचे  संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना अशी एक सिंगर सापडली. नाव होत कविता कृष्णमुर्ती.

कविता कृष्णमुर्ती त्या काळात दाक्षिणात्य सिनेमामध्ये गाणी गायची. हिंदी सिनेमात संधी मिळालीच तर कधी कोरस मध्ये तर कधी  छोट्या सिनेमामध्ये तिचा आवाज ऐकायला मिळायचा पण स्वतःची अशी ओळख मिळाली नव्हती.

एक दिवस कविताला संगीतकार जोडीपैकी लक्ष्मीकांत यांनी आपल्या स्टुडियोवर भेटायला बोलावले. तिला डायरेक्ट लता मंगेशकर यांच्यासाठी डबिंग करणार का असा प्रश्न विचारला. खर तर कवितासारखी शास्त्रीय संगीताचा बकग्राउंड असलेली गायिका या श्रेय न मिळणाऱ्या कामासाठी तयार होईल असे त्यांना वाटत नव्हते.

पण कविताने डबिंगसाठी होकार दिला. लता मंगेशकर म्हणजे तिच्यासाठी देवाच्या जागी होती. ती म्हणाली,

” लता दीदींसारख्या महान गायिकेचा आवाज बनणे हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”

पण लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे गाण्याचं डबिंग करणारी म्हणून तिला हळूहळू बाकीच्या संगीतकारांनी तिला गाणे देणे कमी केले. लता मंगेशकर यांची जागा भरून काढता काढता कविता स्वतःची वेगळी ओळख विसरून गेली होती. 

अखेर कंटाळून तिने लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे आपल्याला संधी देण्याचा विषय काढला. ते तिला छोट्या सिनेमामध्ये चान्स देत होते पण मोठ्या बनरच्या सिनेमामध्ये गाण्यासाठी तिची तयारी झाली आहे  का याबद्दल त्यांना शंकाच होती. तरीही त्यांनी तिला आपल्या प्यार झुकता नही या सिनेमासाठी गाण्याची संधी दिली. गाणे होते ,

“तुमसे मिलकर न जाने क्यू”

पद्मिनी कोल्हापुरे आणि मिथुनदा यांच्या या सिनेमामध्ये हे गाणे ड्युएट मध्ये खुद्द लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं. लता मंगेशकर यांची या गाण्यावर छाप होती तरीही या गाण्याचं दुसर वर्जन गाण्याच शिवधनुष्य कविता कृष्णमूर्तीनी उचललं.

प्यार झुकता नही चे यश साजरा करताना

गाण हिट झालं. कविता कृष्णमुर्ती लता मंगेशकरच्या छायेतून बाहेर आली होती. तिला स्वतःची वेगळी ओळख मिळाली होती.

लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा कविता कृष्णमूर्तीच्या आवाजाच्या रेंजवर विश्वास बसला. त्यांनी आपल्या महत्वाकांक्षी सिनेमामध्ये “मिस्टर इंडिया”मध्ये चान्स दिला. या सिनेमामध्ये लता मंगेशकर यांनी एकही गाणे गायले नव्हते. कविताने गायलेलं “हवा हवाई” सुपरहिट झालं.

एकेकाळी लताची जागा भरून काढणारी प्रतीलता कविता कृष्णमूर्ती लताला खरोखरच रिप्लेस करू लागली. आर. डी. बर्मन यांच्या शेवटच्या सिनेमामध्ये १९४२ लव्ह स्टोरी मध्ये कविताने गायलेल्या “क्यू नये लग रहे ये धरती गगन” किंवा “प्यार हुआ चुपकेसे” या गाण्यानी इतिहास घडवला.  

ऐंशी आणि नव्वदचा दशक आपल्या मखमली आवाजाने गाजवला. हिंदी बरोबरच मराठी तमिळ तेलगु बंगाली अशा भाषेत सुमारे १४ हजाराच्या वर गाणी गायली. तीन फिल्मफेयर आणि अनेक पुरस्कार मिळाले.

कविताने प्रसिद्ध व्हायोलिनवादक एल.सुब्रमण्यम यांच्याशी लग्न केले आणि चित्रपटात गाणे कमी केले. तरीही आजसुद्धा एआर रेहमान सारखा आजच्या पिढीचा संगीतकार आपल्या रॉकस्टार या म्युजीकल सिनेमासाठी “तुम को पा ही लिया” या अवघड गाण्यासाठी आजही कविता कृष्णमूर्ती यांच दार ठोठावतो हेच तिच्या आवाजाचे यश आहे.

हे ही वाच भिडू.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here