एकही निवडणूक न हरलेले अरुण जेटलींचे नेहरूवादी सासरे.

अरुण जेटली, सध्याच्या पंतप्रधान मोदीजींच्या मंत्रीमंडळातील पंतप्रधानांच्या खालोखाल सर्वात शक्तिशाली मंत्री. भाजपा नेत्यांच्या पैकी सर्वात जास्त सुशिक्षित नेत्यांमध्ये जेटलींचा समावेश केला जातो. त्यांच शिक्षण बीकॉम एलएलबी झालय. यामुळेच त्यांना अर्थमंत्रालय सांभाळायला दिल. शिवाय वेळ पडेल तेव्हा संरक्षण मंत्रालय, माहिती प्रसारण खात, वाणिज्य खात वगैरे इतर खात्यांचा भार उचलावा लागतो तो वेगळाच.

संसद असो अथवा पत्रकार परिषद असो प्रत्येक ठिकाणी नोटबंदी सारख्या अडचणीच्या विषयानां देखील सावरायची जबाबदारी अरुण जेटलींच्यावर सोपवलेली आहे. तेही रोज आपल्या भाषणातून  नेहरूंनी काश्मीरप्रश्न कसा सोडवला नाही, कॉंग्रेसंने गेल्या सत्तर वर्षात काहीच केलं नाही, घराणेशाही केली, कॉंग्रेसचे आर्थिक धोरण कसे फसलेले आहे वगैरे वगैरे मुद्दे जनतेला सांगत असतात.

काही वर्षापूर्वी अरुण जेटली यांनी जम्मू काश्मीर मध्ये एका नेत्याची जन्मशताब्दी साजरी केली. याप्रसंगी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होती. या सर्वांनी त्या नेत्याचे तोंड भरून कौतुक केले. भाषणं झाली. कोण होता तो नेता? काय होत त्याच कार्य?

पंडीत गिरिधारीलाल डोग्रा. 

१७ जुलै १९१५ रोजी जम्मू मधील कठूआ जिल्ह्यातील भैया गावात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सरकारी शाळेत शिक्षण झालं. तिथे त्यांची हुशारी बघून वकिली शिकायला त्यांना लाहोरला पाठवण्यात आलं. गिरिधारीलाल डोग्रा कॉलेजमध्ये असतानाच गांधीजीनी सुरु केलेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेमात पडले.

याच काळात त्यांची ओळख  कॉंग्रेसचे जेष्ठ नेता सैफुद्दीन किचलू यांच्याशी झाली. त्यांच्या प्रभावाखाली आल्यावर गिरिधारीलालजीनी  कॉंग्रेस पक्षात अधिकृत काम करण्यास सुरवात केली. कॉंग्रेसच्या स्टुडंट युनियनच काम सांभाळणे अमृतसर येथील घराघरात जाऊन पक्षाची पत्रके वाटणे ही कामे ते करत.

कायद्याचं शिक्षण झाल्यावर ते जम्मूला परत गेले. लाला दिनानाथ महाजन या मोठ्या वकिलाच्या हाताखाली वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली. पण स्वातंत्र्यलढ्याची उर्मी शांत बसू देत नव्हती. गिरिधारीलाल डोग्रा यांनी जम्मू मध्ये एक साप्ताहिक सुरु केलं आणि कॉंग्रेसचे विचार, स्वातंत्र्याचे महत्व त्यातून लोकांपर्यंत पोहचवायला सुरवात केली.

१९४२ च्या सुमारास त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या माध्यमातून बेगारी सिस्टीमविरुद्ध आवाज उठवला. राजा चेनानी याला गरिबांवर अन्याय करणारी ही व्यवस्था मोडून काढायला भाग पाडलं. इथूनच जम्मू काश्मीरच्या राजकारणात गिरिधारीलाल डोग्रा या नावाला वलय प्राप्त झालं. शेख अब्दुल्ला यांच्या खालोखाल लोकप्रिय नेते म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं.

१९४७ साली ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य प्रदान केलं. पण सोबतच पाकिस्तानची निर्मिती करून एक तिढा निर्माण करून ठेवला.  पाकिस्तानी घुसखोरांनी आक्रमण करून काश्मीरचा प्रश्न  चिघळवला. अखेर काश्मीरच्या राजाने भारतात विलीन व्हायचे ठरवले. तत्कालीन परिस्थितीत काश्मीरच्या तडफदार शेख अब्दुलाला तिथला पंतप्रधान नेमण्यात आलं.

अब्दुल्लाने खेडोपाड्यात फिरून तिथल्या जनतेला धीर देत असलेल्या गिरिधारीलाल डोग्रा यांना श्रीनगर ला बोलवून घेतले आणि त्यांना काश्मीरचा अर्थमंत्री ही जबाबदारी दिली. तिथून पुढे जवळपास २७ वर्षे काश्मीरचं अर्थमंत्रालय डोग्रानी संभाळल.

त्यांनी आयुष्यभर एक ही निवडणूक हरली नाही.

गिरिधारीलाल डोग्रा हे स्वतःला कट्टर नेहरूवादी समजत. नेहरुंना सुद्धा जम्मू आणि काश्मीरमधल्या प्रश्नांची जाण असणाऱ्या या नेत्याचं महत्व माहित होत. डोग्रा साहेब आल्यावर त्यांना कधीही कोणीही न अडवता थेट माझ्या भेटीला घेऊन यावे अशी सूचना त्यांनी आपल्या असिस्टंटना दिलेली होती.

१९६४ साली नॅशनल कॉन्फरन्स हा पक्षच कॉंग्रेसमध्ये विलीन झाला. गिरिधारीलालजीनी दोनदा लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. इंदिरा गांधीनी त्यांना लोकसभा अध्यक्ष पद साभाळण्याची जबाबदारी दिली मात्र त्यांनी नम्र पणे नाकारली आणि आपल्या ऐवजी बलराम जाखर यांना करावे अशी सूचना इंदिराजींना दिली.

ते राष्ट्रीय खादी व ग्रामोद्योगचे अध्यक्ष होते. गांधीजीचे खादीचे विचार देशभर कसे रुजवता येतील यासंबंधीचे प्रयत्न डोग्राजी आयुष्यभर करत राहिले.

गिरिधारीलाल डोग्रा यांच्या मुलीचे त्याकाळातल्या दिल्लीतल्या उमद्या वकीलाशी लग्न झाले. त्याचे नाव, अरुण जेटली.

कधीही निवडणूक न हरलेले आयुष्यभर नेहरू विचारांचा, गांधी विचारांचा सेवक पाईक राहिलेले, साधे सरळ मार्गी लोकनेते गिरधारीलाल डोग्रा एकीकडे आणि कधीही निवडणूक न जिंकलेले उठता बसता देशासमोरच्या अडथळ्यांना गांधी-नेहरुंना जबाबदार ठरवणारे त्यांचे जावई जेटली दूसरीकडे.

हे ही वाच भिडू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here