या पाच जणांच्या दहशतीने तुळशीबाग देखील ७ वाजताच बंद व्हायची ! 

मध्यंतरी आम्ही पॅराडाईज मध्ये बसलो होतो. जाळीच्या बाहेर पाऊस दिसत होता. आत्ता आहे असंच काहीस होतं. हित एक प्रकारचा अॅबनॉर्मलपणा असतो नेहमीचाच. याच वातावरणाचा फायदा घेवून समोरचा मित्र म्हणला, ते पाच जण इथच बसायचे. कोण पाच. जक्कल आणि त्याची गॅंग. इथच त्यांना अनेकांना मारायचे कट केले. खरखोट माहित नाही पण वातावरणाचा फायदा घेवून मित्रानं सांगितलेली गोष्ट जुळली. त्या जक्कल प्रकरणानंतर सुरू झाली ऑटो शंकर, रमण राघव अशा कित्येक पॅरा लोकांची कहानी.

पहिल्या भागात त्यातलीच ही पहिली गोष्ट, जक्कल आणि त्याच्या साथीदारांची अर्थात,

जोशी अभ्यंकर हत्याकांडाची.

१९७६ देशात इंदिरा पर्व असणारा काळ. या काळात पुणे आजच्या सारखं आक्राळ विक्राळ नव्हतं. आत्ता जशी निमशहरं आहेत तस पुण्याच एकंदरीत स्वरुप. डेक्कन वरुन कोथरुडला जायचं म्हणलं तरी सात नंतर माणसं धाडस करत नसत. पेठा आणि नव्याने झालेलं कोथरुड यांच्याभोवती शहराचा विस्तार. साहजिक माणसं देखील एकमेकांना नावाने ओळखत असत.

१५ जानेवारी १९७६ पुण्याचे प्रसिद्ध हॉटेल विश्वच्या मालक हेगडे यांचा मुलगा प्रकाश घरातून अचानक गायब झाला. पेन्शनरांच्या पुण्यासाठी ती ब्रेकिंग न्यूज होती. कर्ता मुलगा घरातून मुलगा गायब झाल्याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं.

३१ ऑक्टोंबर १९७६. विजयानगर कॉलनीतर राहणाऱ्या अच्युत जोशी आणि त्यांच्या पत्नी उषा यांची त्यांच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली. खून केल्यानंतर घरात अत्तर पसरण्यात आलं होतं तर खुनासाठी नॉयलॉनच्या दोरींचा वापर करण्यात आला होता. खून कसा झाला याहून अधिक चर्चा पुण्यासारख्या शांत असणाऱ्या शहरात खून करण्यात आल्याची होती.

या घटनेनंतर चालू झाली ती दहशत. खून कोणी केले, कशासाठी केले याचा काहीच थांगपत्ता नव्हता पण नुकत्याच फ्लॅट संस्कृतीचा, बंगल्याचा जन्म झालेल्या घरांमध्ये अघोषीत संचारबंदी झाली होती. लोक संध्याकाळी बाहेर पडत नव्हते. इतकच काय तर तुळशीबाग देखील त्यांच्या दहशतीने सात वाजताच बंद होत होती.

१ डिसेंबर १९७६. या काळ्या दिवसाने पुणे शहर हादरुन गेलं.

काशीनाथशास्त्री अभ्यंकर त्यांच्या पत्नी इंदिराबाई, नातू धनंजय आणि नात जाई तसेच त्यांच्या घरात काम करणाऱ्या सखुबाई वाघ या पाच जणांची हत्या करण्यात आली.

या पाच जणांची हत्या करण्याची पद्धत जोशी यांच्या हत्येसारखीच होती. एकाच टोळीने हे हत्याकांड केल्याचा संशय निर्माण झाला होता.

या घटनेला चार महिने झाले तोच २४ मार्चला अनिल गोखले या तरुणाचा मृतदेह येरवड्याजवळच्या नदित सापडला. बॅरेलमध्ये असणाऱ्या या मृतदेहाच्या जवळ देखील नॉयलॉनच्या दोऱ्या सापडल्या. हे खून एकच जण करत असल्याचं पक्कं झालं होतं पण कोण याचा माग सापडत नव्हतं.

या खूनानंतर बंडगार्डनच्या पोलिस स्टेशनमध्ये एक प्रकार सातत्याने होवू लागला होता. चार तरुण पोलिस स्टेशनमध्ये येत आणि आपल्या गायब झालेल्या अनिल गोखले या मित्राची सातत्याने चौकशी करत.

हे चार जण सातत्याने चौकशी का करत असावेत याचा संशय आला तो त्यावेळेचे सहाय्यक आयुक्त मधुसूदन हुल्याळकर आणि पोलिस इन्सपेक्टर माणिकराव दमामे यांना. त्यांनी या चौघांना ताब्यात घेतलं आणि वेगवेगळी चौकशी करण्यास सुरवात केली. चौकशी दरम्यान सुहास चांडक फुटला. माफिचा साक्षीदार होण्याच्या अटीवर त्यानं सगळे खून कसे केले याचा पाढा वाचायला सुरवात केली.

घटनेतला मुख्य आरोपी होता. जक्कल. राजेंद्र जक्कल. विक्षीप्त आणि कोणत्याही गोष्टीसाठी काहीही करणारा जक्कल त्याचे साथीदार दिलीप सुतार, शांताराम जगताप, मुनव्वर शाह आणि सुहास चांडक. चौघे अभिनव कॉलेजचे विद्यार्थी.

पैशासाठी केलं असा विचार केला तर खून करताना त्यांची जी पद्धत होती त्यावरुन पैसा हे एकमेव कारण वाटत नव्हतं. हे सगळं झालं होतं ते विक्षीप्तपणामुळे. जक्कलचा विक्षीप्तपणा आणि त्याच्यामुळे त्याच्या साक्षीदारांच्यात आलेला विक्षीप्तपणा.

पुढे पुण्याच्या कोर्टात त्यांना फाशीची शिक्षा घोषीत करण्यात आली. मुंबई कोर्ट व सुप्रीम कोर्टाने देखील त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली.  २७ नाव्हेंबर १९८३ ला चौघांना फाशी देण्यात आली. त्यानंतर नाना पाटेकरची भूमिका असणारा माफीचा साक्षीदार सिनेमा आला. यात नाना पाटेकरने विक्षीप्त जक्कल रंगवला. अनुराग कश्यप ने याच कथेवर पांच सिनेमा काढला.