राहुल गांधी होणे सोपी गोष्ट नाही.

तुम्ही झोपेतून उठलाय आणि नेहमीप्रमाणे थोड्याच वेळात तुम्ही मोबाईल चेक केला. तुम्ही पाहिलं की सगळीकडे तुमच्यावर विनोद केले जाताहेत, काही तेच तेच लोक शिव्या घालताहेत, फक्त तुम्हीच नाही तर तुमची आई, आजी, पणजोबा यांच्यावर पण शिवराळ भाषेत बोललं जातंय. तुम्हाला काय वाटेल? तुम्ही घाबरून जाल. तुम्ही पुन्हा कधी सोशल मिडिया काय मोबाईलच्या पण नादी लागणार नाही. पण तो हे सगळं गेली कित्येक वर्ष सहन करतोय. रोज.

त्याचं नाव आहे राहुल गांधी !

पुण्यात खूप ट्राफिक झालंय म्हणून देश सोडून जाणारे लोक आहेत. मावशीच्या मैत्रिणीच्या भावाची ओळख काढून परदेशात नौकरी मिळवण्यासाठी लोटांगण घालणारे आपण बघतो. पण ज्याला एका सेकंदात हा देश सोडून जाता येऊ शकतो आणि परदेशात आरामात राहता येऊ शकतं असा राहुल गांधी नावाचा माणूस पन्नाशीत आलाय पण आजही इथेच संघर्ष करतोय.

राहुल गांधी जिंकणार आहेत का हरणार आहेत? ते देशाचं नेतृत्व करू शकतात का? ते मोदींना पर्याय आहेत का? हे सगळे राजकीय प्रश्न आहेत. मुळात त्यांना मतदान करायचं तर संजय निरुपम, देवरा, कृपाशंकर सिंह असल्या माणसांना पुन्हा सहन करावं लागणार. दिग्विजयसिंह सारखे चेहरे पुन्हा पहावे लागणार. त्यामुळे राहुल गांधी यांच्याकडे नेते म्हणून बघण्यापेक्षा माणूस म्हणून बघायला पाहिजे.

ज्याच्या खानदानात सत्तर वर्षात कुणी देशासाठी लढायला गेलं नाही त्या माणसांनी देशासाठी राहुल गांधींच्या घरातल्या दोन माणसांना जीव द्यावा लागला याचा विचार केला पाहिजे. निदान वाह्यात अफवा पसरवण्याआधी तरी. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झाली ती त्यांनी देशासाठी एक कणखर भूमिका घेतली म्हणून. अतिरेक्यांवर कारवाई करताना जो कणखरपणा इंदिरा गांधी यांनी दाखवला होता तो गेल्या २५ वर्षातल्या एकाही नेत्याला दाखवता आला नाही.

राममंदिराच्या बाबतीत हा कणखरपणा दाखवता येऊ शकतो. बांधायला पण. तशी हिंमत दाखवावी लागेल. स्वतःची राजकीय कारकीर्द विसरून निर्णय घ्यावा लागेल. तसं करण्याची हिंमत दुर्दैवाने राम मंदिराच्या बाबतीत कुणी दाखवू शकत नाही हे आता सिध्द झालंय.

माझा जन्म १९८५ चा. मंदिर प्रश्न शाळेत असल्यापासून ऐकत आलोय. जवळच्या सगळ्या लोकांनी त्याच्यासाठी खूप काही झेललय. यातना सहन केल्या. आता मंदिर होणार म्हणून तीन चारदा सत्ता आली. पण दरवेळी फसवणूक झाली.

अर्थात वाजपेयी यांच्यापेक्षा मोदींकडून जास्त अपेक्षा होत्या. मोदी थेट बोलायचे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना असं वाटायचं की हा माणूस मंदिर बनवणार. हा माणूस देश बदलणार. असो. देश कुणीच बदलू शकत नाही याची आता खात्री झाली. पण गेली कित्येक वर्षं कर्तव्य असल्यासारखं राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याचं कारण काय याचा आता विचार करायची वेळ आली.

खरंतर विचार केला नसता. पण नोटबंदी झाल्यावर एटीएमच्या रांगेत उभं राहून जे डिप्रेशन आलं, गोरक्षक असणार्या लोकांनी केवळ पाच वर्षात बेभान वागून आमची गोमाता बदनाम केली हे बघून जो मनस्ताप झाला, सरकारमधल्या मंत्र्यांनी जी बेलगाम बडबड केली ते बघून जी निराशा झाली ती कारण आहे.

ती निराशा कारण आहे राहुल गांधी या माणसाला माणूस म्हणून समजून घेण्याची. आपण एवढे निराश होऊ शकतो तर हा माणूस किती निराश झाला असेल. आपल्याला कुणी काही बोलत नाही. आपल्या घरातल्या कुणाबद्दल कुणी अपशब्द काढत नाही. आपण मित्रांशी संस्कृतीवर बोलतो. आपले मित्र हा देश किती सुसंस्कृत वगैरे बोलतात. आणि हेच मित्र राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या थरात रोजच्या रोज लिहित असतात.

राग आहे. ठीक आहे. एकदा नाही दहादा व्यक्त होऊ शकतो माणूस. पण रोज एखाद्या कारकुनासारखा सकाळ दुपार संध्याकाळ आपल्यातला कुणी राहुल गांधी, इंदिरा गांधी, नेहरू यांच्यावर कसा काय गलिच्छ आरोप करू शकतो?

एक जण शंभर किलोचा आहे आमच्यातला. त्याला चालायला येतोस का म्हणालो तर नाही म्हणतो. पण रोजच्या रोज सोशल मिडीयावर मात्र गांधी घराण्यावर न चुकता लिहितो. लिही बाबा.  पण खोटं का लिहितो? अभ्यास करून लिही. दोष शोधून काढ. वाचन कर. मला नवीन मुद्दा मिळाला तर मी पण कळवतो. पण खरं लिही. नेहरूंचे फोटोशॉप केलेले फोटो का टाकतो? तुला गल्लीतली पोरगी विचारत नाही. त्या माणसाच्या मागे विदेशातल्या बायका लागायच्या. त्यांची काय चूक आहे? खरंच लफडं सापडलं तर टाक ना सोशल मिडीयावर. खोटे फोटो का टाकतो?

राहुल गांधी यांच्याविषयी विचार करताना एकच गोष्ट जाणवली. एका मित्राने हेमा मालिनीचा शेतातला फोटो टाकला फेसबुकवर. त्याचा उद्धार करणारे शेकडो रिप्लाय आले. असं तर रोज राहुल गांधीसोबत घडतं. कुठून तो माणूस नव्या दमाने उभा रहात असेल? गेली पाच वर्ष राहुल गांधी फक्त विनोदाचा विषय आहेत. पप्पू आहेत. बटाट्यातून सोनं बनवणारे आहेत. अमुक आहेत . तमुक आहेत. पण त्यातले बहुतेक व्हिडीओ फेक आहेत. तरी त्यावर अशा प्रकारे लिहिलं जातं की तेच सत्य आहे.

या गोष्टीचा आता खरंच मनापासून कंटाळा आलाय. किती दिवस अशा खोट्या गोष्टी लिहित राहणार? लोक म्हणतात तुम्हाला चाळीस पैसे भेटतात. मला नाही भेटत. ज्यांना भेटत असतील त्यांचं माहित नाही. पण विनाकारण कुणीतरी लिहितंय म्हणून ते लाईक करण्यात, शेअर करण्यात मजा नाही.

राहुल गांधीच्या जागी स्वतःला ठेवून बघायचं कारण हेच आहे की कुणीही या गोष्टीचा शिकार होऊ शकतं. अगदी शप्पथ खरं सांगतो. मला आवडायची उर्मिला मातोंडकर. आवडायची म्हणजे अजूनही आवडते. शाळेत असल्यापासून आवडते. मासुम, रंगीला, भूत, कौन, दौड अशी न संपणारी यादी आहे. आता तिची काय चूक आहे? तिने फक्त कॉंग्रेसकडून निवडणूक लढवायची ठरवली म्हणून माझ्या मित्रांनी तिला थेट मुसलमान, देशद्रोही वगैरे ठरवलं. इथे माझं डोकं खराब झालं.

म्हणजे उद्या कुणीही विरोधात बोलायचंच नाही का? प्रत्येकाचा राहुल गांधी आणि उर्मिला मातोंडकर करणार का? राहुल गांधी आपल्या योगी आदित्यनाथपेक्षा जास्त इम्प्रेसिव्ह आहे हे कबूल करायला हवं की नको आपण? उर्मिला आपल्या स्मृती इराणी पेक्षा कायच्या काय समजूतदार आणि विद्वान वाटते हे खाजगीत तरी मान्य करूया की नको? हेमा मालिनीपेक्षा तर जास्त सेन्सिबल वाटते की नाही? आपल्याकडे हुशार स्त्री कोण? सुषमा स्वराज? आपण त्याना फक्त ट्वीट करायला लावलं पाच वर्षं. आणि बोलायाला कोण? स्मृती इराणी. आपण चुकतोय असं वाटत नाही? राहुल आणि उर्मिलाबद्दल आता लोक चांगलं बोलताहेत.

आपण मान्य केलं पाहिजे. बदनामी करू. टीका करू. पण मुद्दे जरा ठोस पाहिजेत. निदान मी तरी शोधतोय. कारण मला लाज वाटते स्मृती इराणी ज्या धर्माची आहे त्या धर्माचा असूनही राहुल गांधीना मुसलमान म्हणायला. कारण मला लाज वाटते लग्नावरून उर्मिलाला मुस्लीम ठरवण्याच्या नादात आपल्याच कित्येक नेत्यांचे मुस्लीम कनेक्शन उघड होतील. त्यापेक्षा आपण खरे खरे आरोप करूया. एकदा स्वतःला राहुल गांधींच्या जागी ठेवून बघू. कारण फक्त चाळीस पैसे किंमत असेल तर सोशल मिडिया उद्या दुसर्या कुणाच्या ताब्यात पण जाऊ शकतो. तेंव्हा आपलं काय होईल? .

प्रत्येक माणसाकडून शिकण्यासारख असतं. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी संघर्ष करायचा, कितीही नकारात्मकता असली तरी खंबीर रहायचं, अपयशाने डगमगून जायचं नाही. लढत रहायचं. या गोष्टी राहुल गांधींकडून शिकण्यासारख्या आहेत. राहुल गांधी यांच्यासाठी या देशाचा पंतप्रधान होणं सोपं नाही. पण आपणही विचार केला पाहिजे की राहुल गांधी होणं हे सुद्धा वाटतं तेवढं सोपं नाही.

हे ही वाच भिडू

15 COMMENTS

 1. मस्त लिहले आहे.असे वाटले की तू काय तर खरचं वेगळे लिहले आहेस आणि खरचं विचार करायला लावलास…मला तर कोणी रागाने पाहिले तरी वाद होतात आई वडिलांबद्ल्ल तर लांबच….
  खुप गोष्टी शिकन्या सारख्या आहेत राहूल गांधी कडून

 2. राहुल गांधी होणं खरच सोपं नाही पण वडील आणि आई देशासाठी मरण पावल्या म्हणून राहुल ला देशाचा पंतप्रधान बनवणं पण योग्य नाही, आज कलेक्टर व्हायला रात्रं दिवस अभ्यास करून स्वतःला सिद्ध करावा लागतं तरीही काही लोकांना यश मिळत नाही कारण कलेक्टर ही खूप जबाबदारीच पद आहे, तसंच आजी आणि वडिलांच्या पुण्याईवर पंतप्रधान पदासाठी स्वतःला दावेदार मानणाऱ्या राहुल गांधींची पंतप्रधान बनण्याची खरंच योग्यता आहे असा आपल्याला वाटतं का? मला मान्य आहे की त्यांच्या वर दिवस रात्र ट्रोल केले जातात आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो ते नक्कीच चुकीचं आहे तरीपण पन्नास वर्ष्याच्या व्यक्तींना शोभेल असं ते वागतात असा तुम्हाला वाटतं का?

 3. राहूल गांधी ला माणूस म्हणून बघा, हे म्हणणे ठीक आहे, पण मग एकतर तसा दृष्टीकोन सगळ्यां साठी घेतला पाहिजे. माणूस म्हणून पहाता नरेंद्र मोदी यांचे आयुष्यही अजिबात सोपे नाही. राहुलला गांधी कुटूंबात जन्म घेतल्यामुळे जो जन्मजात असामान्य फायदा आहे तो पण लक्षात घेतला पाहिजे. किंबहूना जिथे प्रत्येकाने स्वतःला सिध्द करणे अपेक्षित असते तिथे राहूल गांधी ची कामगिरी काय हे तपासून पहाणे सगळ्यात महत्वाचे आहे. कारण पंतप्रधान पदावर बसण्यासाठी कामगिरी हाच निकष असतो, माणूस किती चांगला आहे हा नव्हे. आता, टिका सहन करणे हाच जर कामगिरी चा निकष मानला तर मग कदाचित या लेखातला विचार मान्य करावा लागेल. पण राहुल येवढ्या टीकेचे धनी का आहेत? पप्पू हे काही राहुलला पाळण्यात ठेवलेले नाव नाही ही त्यांची स्वतःची कमाई आहे.

 4. जो राहूल प प्र मनमोहन सिंघ यांनी राष्ट्रपतींकडे पाठवलेल्या वतहूकूमाचे भेण्डोले भरत पत्रकार परिषदेत फाडून फेकून देऊन देशाच्या अत्युच्च पदाचा घोर अपमान करतो , तेसुढ्हा प . प्र . प्रदेश दौऱ्यावर असताना , त्याची काय लायकी आहे प .प्र . व्हायची ? बस हा एक मुद्दा पुरेसा आहे ! शिवाय हा गृहस्थ फुटीरतावाद्यांना पाठीशी घालतो त्याची मल्लीनाथी हे करतात तेंव्हा त्यांचीच चीड येते ! कोठे इन्द्राचा ऐरावत आणि कोठे गागाभट्टाचि तट्टाणि !

 5. किती मोजक्या आणि नेमक्या शब्दात सांगितलं! You r absolutely right…

 6. पण किमान website वर तरी योग्य मराठी वापरा.. पैसे मिळतात हो.. भेटत नाहीत..

 7. खूप छान !! काही इतर लेख पण वाचलेत ..त्या नंतर लिहावास वाटले की वरील सारे संशोधन करून मुद्धेसुद लिहणे काही सोपी गोष्ट नाही आहे !!

 8. गेली साथ वर्ष सत्ता उपभोगली ना या राहुप गांधींच्या फॅमिली ने ना?
  आणि आम्ही सहन केलंच ना या फॅमिली ला?
  जर राहुल गांधी होणं सोपं नाही तस सामान्य जनता म्हणून काँग्रेस काळात जगणं सोप नव्हतं.

  त्यामुळे *बोल बिडू अडमीन* लिहायचं म्हणून लिहू नको विचार करून लिहीत जा. सामान्य माणसाबद्दल त्याच्या त्रासाबद्दल पण लिहीत जा नाही जमत असेल तर लिखाण बंद करा. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here